Monday 27 January 2014

१५ ऑगस्ट आणि अमेरिका

अमेरिकेत १५ ऑगस्ट म्हणजे इंडिया डे, इतिहास इथे कोणाला जास्त माहित नाही, तसा आपल्या देशातही म्हणा सध्याबऱ्याच जणांना १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन की प्रजासत्ताक हे माहित नाही तो भाग वेगळा. तर सांगायची गोष्ट अशी कि सातासमुद्रापार, इकडे आपला 'इंडिया डे' जल्लोषात साजरा केला जातो. इथल्या भारतीय संस्था वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अमेरिकन सरकारच्यामदतीने आयोजित करतात. 
भारताच्या स्वातंत्र्य दिवशी इथे तर काही सुट्टी नसते म्हणुन त्या नंतर येणाऱ्या रविवारी न्युयॉर्क  मधील रस्त्यातुन स्वातंत्र्यदिनाची परेड काढली जाते. न्युयॉर्क मधील इम्पायर स्टेट इमारत जी सध्याची शहरातली १०६ मजली उंच इमारत आहे त्यावर तर १५ तारखेला चक्क तिरंग्याची रोषणाई करतात.

मी १५ तारखेच्या रात्री होबोकेनच्या वॉटरफ्रंटवरुन इम्पायर स्टेट इमारत बघायला गेलो. इथुन रात्रीची न्युयॉर्क सिटी  बघण्यात एक वेगळीच मजा आहे. आपण नदीच्या ह्या किनाऱ्यावर आणि समोर विजेच्या प्रकाशात सजलेली न्युयॉर्क,  उंचच उंच इमारती आणि वेगवेगळ्या रंगातली रोषणाई. आज तर आणखीच मजा होती ती म्हणजे शहराच्या सर्वात उंचावर आपल्या देशाचा तिरंगा. विचार केला होता त्यापेक्षाही अतिशय उत्कृष अशी ती इमारत पुर्ण शहरांच्या इमारती मध्ये उठुन दिसत होती. सर्वात उंचीवर भगवा प्रकाश, त्यानंतर पांढरा पट्टा आणि त्याखालोखाल हिरवा. बरेच भारतीय वॉटरफ्रंटवर इम्पायार इमारत बघायला येत होते.  ह्या इमारती वर प्रत्येक दिवशी त्या त्या दिवशाच्या महत्त्वानुसार रोषणाई करतात.




नंतरच्या रविवारी मी  न्युयॉर्कच्या परेड गेलो. ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा हजारे आणि विद्या बालन उपस्थित राहणार होते. परेडचा रस्ता पूर्ण भारतीयांनी गजबजलेला होता. काही अमेरिकन पण परेड  पाहण्यासाठी आले होते. इथल्या पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या सुनियोजित बंदोबस्तात परेड दिमाखात चालु होती. मी पोहचलो तेव्हा परेडला नुकतीच सुरुवात झाली होती. कुठलातरी मिस अमेरिकन इंडिया असा काहीतरी होता. इथे काही स्पर्धा असेल त्यातल्या विजेत्या मुली असतील. त्या नंतर मी छान अशी जागा शोधुन परेड बघण्यासाठी उभा राहिलो. रथ एकमागून एक येत होते. पण ते बघुन हळुहळू भ्रमनिरास होऊ लागला कारण मुख्य म्हणजे देखावे हे भारताविषयी माहिती देणारे नसुन एका प्रकारे जाहिराती होत्या.स्टेट बँक ऑफ इंडिया, सोनी टीवी, बँक ऑफ बरोडा असे रथ, रथांवर एखाद दुसरा महात्मा गांधी, सुभाषचंद्र भोस ह्यांचे फोटो आणि हे रथ डीजेच्या बॉलीवुड  संगीताच्या तालावर पुढे सरकत होते. पुढे पुढे हद्द म्हणजे एक रथ तेलंगना राज्य निर्मितीच्या बाजुने असणारा आणि त्यानंतर एक रथ अखंड आंध्र टिकवा म्हणून घोषणा देणारा. अरे हा तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करत आहात की विभाजन दिन. त्यात पुढे राजकीय पक्षांचे रथही होते.  कॉंग्रेस, आप पार्टी.








मला सर्वात जास्त आवडलेला रथ म्हणजे भारताच्या संस्कृतीची खरीखुरी ओळख करून देणारा रथ आणि तो म्हणजे 'जय भारत ढोल ताशा पथक' ह्यांचा. ह्यांचा रथ जेव्हा परेड मध्ये सामील झाला तेव्हा संचलनात खरी जान आली. पथकाच्या सुरुवातीला दोन भगवे झेंडे दिमाखात डौलत येत होते. त्यानंतर ताशांचा कडकड आवाज आणि पाठोपाठ ढोल,  पथकामध्ये महिलाही नऊवारी साड्या नेसुन सामील झाल्या होत्या,  त्यांच्या  हातात लेझीम , सगळ्याचं लक्ष सहज वेधुन घेत होता, त्यांनी मुख्य गर्दीच्या ठिकाणी रथ आला तेव्हा जी काही ताल धरली ती तर लाजवाब, एका क्षणाला तर असे वाटले कि गणपतीच्या मिरवणुकीतच उभे आहोत. त्यांनी पुर्ण न्युयॉर्कचा तो रस्ता दणाणून सोडला. लेझीम, फुगडी, ढोल, ताशा सर्वांनाच नवीन होत. सर्वानीच ह्या पथकाची वाहवा केली आणि त्यांनीच खरी म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख अमेरिकेला करून देण्याचा  प्रयत्न केला . रथावर एक चिमुकला शिवाजी महाराजांच्या पेहरावात उभा होता.





ह्यांचा रथ पुढे सरकल्यावर मग पुन्हा तेच यादव महासभा, जय भीम, युप्प टीवी वगैरे.

सगळे रथ संपल्यावर सर्वांची पावले रस्त्याच्या टोकाला असलेल्या स्टेजपाशी वळली. जिथे काही कार्यक्रम होणार होते आणि अण्णा हजारे हि तिथेच येणार होते. मी सुद्धा तिकडे जाण्यास निघालो तर रस्त्यात मला जय भारत ढोल ताशा पथकाचे  कार्यकर्ते  सामानाची आवरावर करताना करताना दिसले. मी त्यांच्याशी जाऊन गप्पा मारू लागलो. त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे कश्या साध्य केल्या, सराव कुठे आणि कशी केली ह्याची माहिती घेतली. त्याच वेळी इतरही काही लोक त्यांच्याशी येऊन माहिती घेऊ लागले. त्यानंतर तर त्यांना स्टेज वर परफोर्मंस देण्यास निमंत्रितही केले. 

मी स्टेज कढे निघालो. तिथे भारतीय खाद्यपदार्थांचे दुकानेही लागलेली होती जिथे भयंकर गर्दी होती आणि नियोजन तर बिलकुल नव्हते. सगळे तिथे तुटून पडले होते. कसाबसा मी त्या गर्दीतून स्वतःसाठी एक बिर्याणी घेतली. नंतर स्टेजवर चालणारे कार्यक्रम बघायला गेलो. तिथे भांगडा ग्रुपचे डान्स परफोर्मंस चालू होते, त्यानंतर गरबा डान्स. ढोल तशा पथकाचा परफोर्मंस हि जबरदस्त झाला त्यांनी अपेक्षेप्रमाणे इथेही अप्रतिम ताल सादर केली.




थोड्यावेळानी विद्या बालन स्टेजवर आली पण अण्णा हजारे काही आले नाहीत, ते विद्या बालन बरोबर स्टेज वर येणार पण कसे, असो. थोडफार इकडच्या तिकडच्या गप्पा आणि आपल्या येणाऱ्या सिनेमाचा प्रमोशन करून झाल्यावर ती पुढच्या वर्षीही परत येईन असे सांगुन निघाली. अश्या कार्यक्रमात हि मंडळी मुख्य म्हणजे आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठीच येतात. ती निघाल्या निघाल्या लोकांनी लगेच एकच गलका केला, विद्या एक परफोर्मंस हवा, मग तिनेही थोडेसे आढेवेढे घेत डर्टी पिक्चरच्या गाण्यावर २-३ ठुमके दिले आणि आली तशी निघून गेली. परत १-२ लोकल परफोर्मंस झाल्यावर शेवटी एकदाचे अण्णा मंचावर आले. त्यांचा सत्कार झाल्यावर त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि त्यांच्या शैलीत भ्रष्टाचारावर भाषण द्यायला सुरुवात केली. लोकांनी हि मनमुरादपणे त्यांना दाद दिली. भाषण संपल्यावर ते तिथून निघाले तसा मीही तिथून निघालो. मी स्टेजच्या पाठीमागच्याबाजूला आलो तर अण्णांची गाडी तिथेच उभी होती. त्यांना कडेकोट बंदोबस्तात गाडीत बसवले. त्या वेळी काही अमेरिकन लोकांनी त्यांचा हा लवाजमा पाहिला आणि मला कुतुहलाने विचारलं कि कोण आहेत. मी हि थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला कि "He is great Indian Leader" तर त्यावर त्यांनी मला विचारला "Is he President of India?" मग मला तर काय सांगाव हेच समजल नाही. मी आपला नाही म्हणालो आणि तिथून काढता पाय घेतला. 




मी तर म्हणेन हा मजा आतापर्यंतचा सर्वात इंजोय केलेला स्वातंत्र्य दिन होता. दिल्लीची नाही तर न्युयॉर्कची  परेड आणि अण्णा हजारे, विद्या बालन.  आणखी काय!!!

No comments:

Post a Comment