Monday 6 January 2014

Atlantic City, New Jersey

अटलांटिक  सिटी, मजा-मस्ती आणि उत्साहाने भरलेले असे अमेरीकेतील न्युजर्सी राज्यातील शहर. न्युयॉर्क पासून फक्त २-३ तासाच्या अंतरावर असल्यामुळे एका दिवसात हे शहर फिरून होण्याजोगे आहे.
या शहरची विशेष ओळख म्हणजे इथे असणारे कॅसिनो आणि सुंदर असा समुद्रकिनारा, ह्या शहरात जवळपास १२ कॅसिनोज आहेत. आठवडाभर काम करून थकल्यावर एक दिवस इथे येऊन कामाचा ताण घालवण्यासाठी उत्कृष्ट जागा.

न्युयॉर्क  सिटी मधुन इथे यायला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या बस कंपनी, ट्रेन किवा स्वत:ची गाडी असेल तर २-३ तासाची ड्राईव्ह. त्यातल्यात्यात अकाडेमी नावाच्या कंपनीची बस सेवा उत्तम. $४० मध्ये परतीचे तिकीट आणि त्यात अटलांटिक शहरात $३० चे कॅसिनोज मध्ये खेळण्याचे कुपन मिळतात.  म्हंजे  तसा बघायला गेलो तर फक्त $१० मध्ये तिकीट मिळते.

मी आणि माझ्या पत्नीने एका शनिवारी तिथे जायचे  ठरवले. शनिवारी ९ च्या दरम्यानची बस आम्हाला मिळाली. तसा घरातून निघताना १० च्या बसचा विचार केला होता पण १ तास आधीची मिळाली कारण बिलकुल गर्दी नव्हती. मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा बस साठी भली मोठी रांग होती. त्यावेळी तिसऱ्या बस मध्ये नंबर लागला होता आणि आता पहिलीच बस भेटली होती.

बसने न्युयॉर्क  सोडले की आजुबाजूला फक्त गर्द अशी झाडी. पानगळतीचा हंगाम असल्याने रस्त्याचा दुतर्फा निसर्गाने रंगाची उधळण केलेली होती. पानांचा वेगवेगळा रंग आकर्षित करत होता. असा  २-३ प्रवास केल्यावर आमची बस अटलांटिक सिटी मध्ये आली, बसचा शेवटचा थांबा हा कॅसिनोच होता. आमची बस 'ताज महाल' नावाच्या कॅसिनो मध्ये गेली. हो 'ताज महाल', ह्या कॅसिनोचा इंटेरिअर पुर्ण भारतीय मुघल साम्राज्याप्रमाणे केलेले आहे. प्रत्येक कॅसिनो आपली अशी स्वतःची ओळख इथे जपतो. सीझर नावाच्या कॅसिनोचा इंटेरिअर रोमन साम्राज्याला शोभेल असा आहे. बस थांबल्यावर बसचालक लगेच तुम्हाला उतरून देणार नाही तो बसचा दरवाजा बंद करून कॅसिनोच्या माणसाला घेऊन येतो जो बसची तिकीट चेक करून प्रत्येकाला कॅसिनो मध्ये खेळण्याचे कुपन देतो. इथे माझी अंधश्रद्धा मला सांगत होती ह्या कॅसिनोच कुपन घेऊ नकोस कारण मागच्या वेळी ब्याली  नावाच्या कॅसिनो मध्ये मी $३५ जिंकलो होतो आणि मला पुन्हा तिथेच जायची इच्छा  होती. पण त्याने गाडीचं दारच अडवलं असल्यामुळे माझा नाइलाज झाला.

अटलांटिक  सिटी मध्ये मुख्यत्वे ३ गोष्टी फिरण्यासारख्या आहेत, एक म्हणजे कॅसिनो, दुसरा समुद्रकिनारा आणि तिसरा फिरण्यापेक्षा खिशाला कात्री लावणारा मोठ्या कंपनीजची आउटलेट्स . आम्ही प्रथम समुद्रकिनारी जायचा ठरवले. हवामान तसं थंड असल्यामुळे किनारा शांत शांत होता. उन्हाळ्यात मात्र इथे धमाल असते. पार्टीज, समुद्रातले खेळ इत्यादी चालू असतात. त्यावेळी किनार्यावर बर्यापैकी गर्दी असते. उन पडलेलअसेल तर इथल्या लोकांसाठी ती एक पर्वणीच असते. मग काय एकच काम, पाण्यात मनसोक्त डुंबणे आणि मग वाळूवर पडून बीयरचे घोट घेत ऊन शेकत बसायचे . पण सध्या हे सगळ बंद होते. किनाऱ्याला  लागुनच बोर्डवॉक बनवलेला आहे. बोर्डवॉक म्हणजे लाकडाचा पायी चालण्यासाठी बनवलेला मार्ग. बोर्डवॉकला लागुनच बरेच छोटी मोठी दुकाने आणि कॅसिनोज आहेत. बोर्डवॉक वरून एक फेरफटका मारला की जवळ जवळ सगळी अटलांटिक  सिटी फिरलो असा आपण म्हणु शकतो. तिथल्या एका मॉल मध्ये संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे आहे ज्याचा शो दर तासांनी मोफत असतो आणि बाजूला एका सरकारी इमारतीवर रात्रीचा लाइट शो असतो तो सुद्धा मोफत.

इथल्या कॅसिनोज मध्ये लहान मुलांना बंदी आहे तर त्यांच्यासाठी एक छोटासा आपल्या इकडे जत्रेत जसे खेळ असतात तश्या खेळांचा कॅसिनो आहे. जिथे खेळण्यासाठी पैसे टाकायचे असतात पण आपण पैसे न जिंकता वस्तु जिंकतो. तिथेही थोडावेळ आम्ही धमाल केली.

मग त्यानंतर आम्ही ताजमहाल कॅसिनो मध्ये गेलो ज्या कॅसिनोची कुपन मिळाले होते.  हि माझी दुसरी वेळ असल्यामुळे काही त्रास झाला नाही पण जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तर सर्वप्रथम काही समजेच ना की काय चालू आहे. भला मोठा तो कॅसिनो आणि बऱ्याच प्रकारचे खेळ,  काय खेळायच आणि कसा खेळायचं, काहीच कळेना, थोडावेळ असेच इकडे तिकडे फिरत बसलो. आपण हॉलीवूड सिनेमात पाहिलेले जवळपास सर्वच खेळ तिथे होते. म्हणूनच तर अटलांटिक सिटीला अमेरिकेतील पुर्व किनारपट्टीवरील जुगरांची राजधानी म्हणुन हि संबोधतात. पत्त्यांचा टेबल, आकड्यांचा चक्र, अजून बरेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळांचे टेबल होते आणि ह्या खेळामध्ये बेटिंग पण जबरदस्त चालू होती. मी मग तेव्हा आपली एक स्वयंचलित मशीन निवडली होती. जिचा फक्त खटका ओढायचा आणि स्क्रीन वर येणारे कार्ड बघायचे. जर त्यांच्या नियमात ते बसत असतील तर मशीन लगेच आपल्याला आपण जिंकलो म्हणून सांगते आणि आपल्याला जिंकलेले पैसे काढायची संधी देते अन्यथा ते पैसे पुढच्या डावासाठी आपण वापरू शकतो. एका डावावर $ ०:२५ पासून ते आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढे पैसे आपण लावू शकतो आणि जर आपण जिंकलो तर त्या पटीत  आपल्याला पैसे परत मिळतात. शेवटी म्हंटलाच आहे ना 'High Risk High Gain'.

मी पुन्हा एकदा अशीच मशीन निवडली आणि आमच्या सौंना नियम समजावून दिले. पहिल्यांदा ती माज्या बाजूला बसून माझे डाव पाहत बसली. माझा खेळून झाल्यावर तिने तिला मिळालेले कुपन खेळायला सुरु केले आणि बघता बघता तिने $३० चे $८० केले. त्यानंतर आम्ही दुसरे मशीन बघितले आणि असेच थोडाफार वेळ खेळून सगळ्या मशीनची मजा लुटली. पण दुसऱ्या मशीनमध्ये जिंकण्याचे प्रमाण कमी, त्यामुळे पुन्हा अंधश्रद्धा जागृत झाली आणि ज्या मशीन मध्ये जिंकलो तिथेच परत खेळायचं असा हिने ठरवलं. परत त्याच ठिकाणी परत आलो तर ती जागा कोणी एका दुसरीने घेतली होती, म्हणुन आम्ही बाजूच्या जागी बसून वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती उठल्यावर बायकोने लगेच ती जागा पटकावली आणि खेळु लागली पण ह्यावेळी नशीब म्हणावी तशी साथ देत नव्हता. आणि त्यात ती आधीची बाई परत मागे येऊन उभी राहिली आणि विचारतेय 'Any Luck??'. शेवटी हि वैतागुन उठली आणि ती बाई लगेच तिथेच बसली. तिची हि श्रद्धा त्या मशीन बरोबर जोडली असेल. आम्ही पुन्हा दुसऱ्या खेलाजवळ गेलो आणि एका मशीन मध्ये तर मी $१ चा डाव लावला आणि मला त्यातून $१४ परत मिळाले. डाव जिंकला कि मजा येते आणि वाटत जास्त पैसे लावले असते डावावर तर किती फायदा झाला असता आणि असा विचार करून पुढच्या डावावर आपण जास्त पैसे लावतो आणि नेमके हरतो आणि हरल्यावर असे वाटते कि पुढच्या खेपेस तर नक्कीच जिंकु आणि परत हरतो असे ५-६ डाव खेळले कि १ जिंकतो. शेवटी सगळा नशिबाचा खेळ आहे. ज्याने आपली सीमा ओळखली तो वाचतो नाहीतर काहीजण वाहवत जातात आणि सगळा गमावुन बसतात.

त्यानंतर जिंकलेले पैसे खर्च करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही आउटलेटस मध्ये गेलो. ह्यामध्ये नाइके, अदिदास, राल्फ लॉरेन, अरमानी, गुची, अल्डो, रोलेक्स आणि बरेच असे ब्र्यान्डेड वस्तूंची दुकाने आहेत. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे जास्त फिरता आलं नाही पण थोडीफार खरेदी करुन आम्ही आमची बस पकडण्यासाठी तिथुन निघालो. दिवसभर मजा केल्यावर आता परत जायची वेळ आली होती. खरच चांगला अनुभव होता. मुख्य म्हणजे काहीही गमावलेलं नव्हता आणि थोडेफार कमावुनच परत निघालो होतो.

शेवटी ह्या मजेशीर आठवणी मनात घेऊन परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो












No comments:

Post a Comment