Wednesday 14 December 2016

अलिबाग - बेबीमुन

बेबीमुन, अलीकडेच ह्याची चर्चा जास्त सुरु झाली आहे. लग्नानंतर जोडपं हनिमुनला जातात तस आता तुमच्याकडे गुडन्युज असल्यावर बाळ व्ह्यायच्याआधी जोडप्याने एकत्र फिरायला जाणं.  एक छानशी सुट्टी फक्त दोघांनीच एकत्र घालवायची. मी ही संकल्पना कुठेतरी पेपरात वाचली तेव्हा आम्हीही गरोदरच होतो (आम्ही म्हणजे अर्थात माझी बायको :) ). मला ही कल्पना आवडली आणि मी सुद्धा जवळपासची बेबीमुनसाठी डेस्टिनेशन्स शोधु लागलो. त्यातच आमचा लग्नाचा वाढदिवसही जवळच होता. मग दोन्ही गोष्टी एकत्रच होतील. घरच्यांनाही कल्पना आवडली. तेवढाच रोजच्या गोष्टीतून बदल आणि तरतरीत सुद्धा वाटेल. पण रिस्क नको म्हणून जवळच डेस्टिनेशन ठरवायचं विचार झाला.
मुंबईच्या जवळपास, सोपं आणि उत्तम म्हणजे 'अलिबाग'. मला अलिबागला जाऊन बरेच वर्ष झाली होती आणि मंजुश्रीही इतक्यात तिथे गेली नव्हती. मग ठरलं तर - अलिबाग. मित्रांजवळ तिथल्या हॉटेल्सची चौकशी सुरु केली. तीन-चार नावे भेटली त्यातलंच एक पसंत केलं. इंटरनेटवरून त्या हॉटेलची माहिती भेटली. प्रतिक्रया पण छान होत्या. मग लगेच फोन लावुन बुकिंग कन्फर्म केली. शनिवार ते सोमवार असे ३ दिवस आरामात घालवायचे.
पण शनिवारी अलिबागला गोवा रोडवरून जायचं म्हणजे प्रचंड ट्रॅफिक. त्यापेक्षा आरामात दुपारी घरातुन निघायचं तोपर्यंत पेण, वडखळनाका मोकळा होईल असा अंदाज होता. आम्ही दुपारचे २ वाजले तरी घरातच होतो. तेवढ्यात एक फोन आला. तो फोन हॉटेलमधून होता. "तुम्ही दुपारी हॉटेल मध्ये जेवणार आहात का? कारण हॉटेलचा किचन बंद होईल". आता त्याला कुठे सांगू आम्ही अजुन घरीच आहोत. त्याला सांगितलं कि आम्ही २ तासात पोहोचु. जेवणाची काळजी नाही, आम्ही जेवलोय म्हणून फोन ठेवून दिला.
प्रवासाला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे रस्त्यात जास्त ट्रॅफिक नव्हती. मध्ये एका ठिकाणी चहासाठी थांबुन वडखळनाका मागे टाकलं. मध्येच खरमरीत रस्ता तर मध्येच एकदम चांगला पण त्यातल्यात्यात चांगलाच म्हणावा लागेल. अलिबाग जवळ आल्यावर मोबाईलवर जीपीएस चालू केला. हॉटेलच नाव टाकुन जीपीएस जसा सांगत होता तसतसे आम्ही जात होतो. "टेक राईट टर्न, आफ्टर १०० मीटर्स टेक लेफ्ट टर्न" अस करत करत आम्ही एकदम जंगलातच आलोय असा भास झाला. सरळ हॉटेलवाल्याला फोन लावला. तो म्हणाला बरोबर आहे या तसेच पुढे. २ मिनीटांनी आमचा जीपीएस "युवर डेस्टिनेशन इज ऍट द राईट." आणि उजवीकडे हॉटेल होतं.
एकदम उत्तम लोकेशन. समोर वर्सोली बीच, आजुबाजूला झाडं, रहदारीपासून दूर आणि हॉटेलही छोटच, फक्त ८-९ रूम्स. म्हणजे तिथेही वर्दळ नव्हती.






आम्ही पोहचलो तेव्हा ५ वाजले असतील. सूर्य मावळतीकडे झुकला होता. हॉटेल्सचे सोपस्कर पुर्ण करुन आम्ही दोघे किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो. मंद वारा, समुद्राच्या लाटांचा आवाज, किनाऱ्यावर मुलांचा रंगत आलेला क्रिकेटचा डाव अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण होतं ते. अस वाटत होतं की ही वेळ पुढे सरकुच नये पण सुर्यदेव थोडी ऐकणार होते. तो आपला हळुहळु पश्चिम क्षितिजावर आला आणि पाण्यात शांतपणे दिसेनासा झाला. संधी प्रकाशात समुद्रातल्या होड्या किनाऱ्यावर विसावत होत्या. क्रिकेटचा डावही आटोपण्यात आला. भेळ, पाणीपुरीवाल्यांकडे गर्दी वाढली. आम्हीही एक-एक भेळ घेतली आणि हॉटेलवर परत आलो. तो पर्यंत अंधार झाला होता. रात्रीच्या जेवणात चांगला सीफुडचा आस्वाद घेतला.  
दुसऱ्या दिवशी आरामात आवरुन चहा-नाश्ता झाल्यावर आम्ही अलिबाग फिरायला बाहेर पडलो. सर्वात आधी अर्थातच घरी फोन. सर्व उत्तम आहे, तब्येत बरोबर आहे, काही त्रास नाही. फोन झाल्यावर गाडी बिर्लामंदिराच्या दिशेने काढली. बिर्ला मंदिर जेमतेम ३० किमी पण छोटा रस्ता आणि थोडेफार खड्डे म्हणून आम्ही आरामातच गाडी पुढे नेत होतो. अलिबाग-मुरुड/जंजिरा रस्त्यावर रेवदंडा मागे टाकल्यावर एक खाडी पुल ओलांडून लगेच बिर्ला मंदिरासाठी डावीकडे वळायचं. मंदिराबाहेर आपल्याला नेहमीप्रमाणेच हारवाले भेटतील जे तुम्ही गाडीतुन उतरल्या उतरल्या मागे लागतात. गेट मधुन आत गेलात कि फोटोग्राफीला मनाई आहे. मंदिर टेकडीच्या माथ्यावर आहे आणि तिथपर्यंत जायला पायऱ्या. पायऱ्यांच्या बाजूने गार्डन्स. आम्ही पोहचला तेव्हा नुकतच मंदिर बंद झालेलं. तरी दरवाज्याच्या जाळीतुन मुर्तीच दर्शन झालं. मुख्य मंदिर गणपती आणि रिद्धी-सिद्धी दोन्ही बाजुला, सभोवताली शंकर-पार्वती आणि राधा-कृष्ण ह्यांचेही छोटेखानी गाभारे आहेत. अगदी सुंदर मंदिर, मंदिराचे कर्मचारी स्वच्छतेची विशेष काळजी घेत असतात. मंदिराच्या परिसरात थोडास फिरुन झाल्यावर खाली परत आलो. एक-एक नारळपाणी आम्ही दोघांनी घेतला आणि परत अलिबागला फिरलो.



रेवदंड्याचा किनारा एकदम छान आहे अस ऐकलं होतं, म्हणुन रेवदंड्याला पोहचल्यावर गाडी शहरात घुसवली. अगदी निमुळते रस्ते त्यात रविवारचा बाजार, रस्तावरची रहदारी. आम्ही कदाचित रस्ता चुकलो होतो आणि त्यात गर्दीमुळे खुप वैताग आला. मग सरळ रेवदंडा बीचच बेत रद्द करुन पुढे निघालो आणि नागाव बीचवर आलो. सूर्य चांगलाच वर आला होता आणि उन्हाचे चटके बसत होते. गाडी पार्किंग पण एकदम उन्हात भेटली. बीच एकदम गजबजलेलं. रविवार म्हणजे मुंबई-पुण्याचे पर्यटक इकडे जास्त येतातच. समुद्राला ओहोटी असल्याने पाणी एकदम आत होत आणि समुद्रकिनारा त्यामुळे अजुनच मोठा वाटत होता. घोडागाडी, बनाना राईड, मोटारबोट असा सगळं काही त्या बीचवरआहे. परफेक्ट फॅमिली पिकनिक स्पॉट. सीफुड आवडणाऱ्यांची तर मजाच मजा. बीचवर लाईनने हॉटेल्स आणि सगळ्या हॉटेल्स मध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी मेनु मध्ये वर. म्हणजे मेनुच तो आहे. लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. व्हेज आणि चिकन थाळी पण आहे. आम्ही मस्त पापलेट थाळीवर ताव मारला. एकदम छान पापलेट फ्राय, त्याबरोबर कोळंबीचा रस्सा, तांदळाची भाकर आणि भात. पोटभर जेवुन झाल्यावर आम्ही परत अलिबाग मध्ये आलो.






अलिबाग बीच वर जास्त वर्दळ जाणवली नाही. शाळेच्या सहलीतली मुलं आणि मोजके पर्यटक. बहुतेक करून सगळे नागाव, काशीद बीच वरच जास्त जात असतील. अलिबाग बीचवरुन समोर कुलाबा किल्ला दिसतो. मी ऐकलं आहे कि ओहोटीच्यावेळी आपण चालतही किल्ल्यात जाऊ शकतो. खरं काय ते मला नाही माहीत. तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही परत हॉटेलवर आलो कारण मुख्य म्हणजे आम्हाला बीचवर प्रीनॅटल फोटोशुट करायचा प्लॅन होता आणि आमचा हॉटेल होतं ते बीच उत्तम होतं.





चहापाणी झाल्यावर आम्ही बीचवर आलो आधी मी मंजुश्रीचे एकटीचे फोटो घेतले. आम्ही त्यासाठी गुगल वर आधीच बरेचसे पोझेस बघून ठेवले होते. त्यातले जे जमतील तसे फोटो काढले. आता वेळ आली ती दोघांचे फोटो काढायचे आणि त्यातच खरी मजा होती. कारण आमच्या दोघांचे फोटो कोण काढणार? बीच वर आम्ही आमचा फोटो कोण काढु शकतो, हा विचार करत येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे नजर टाकु लागलो. एक १५-१६ वर्षाची मुलगी आपल्या आईबरोबर बीचवर फिरत होती. आम्ही विचार केला हि काढु शकते, तिला कदाचित आवडेल आणि तिला विचारलं. पण आमच्या अपेक्षेपेक्षा उलट तिने थोडीसी नाराजी दाखवताच कॅमेरा हातात घेतला. तिने फक्त २ फोटोतच आम्हाला कॅमेरा परत दिला आणि निघून गेली. आम्ही विचार केला काय झाला हिला , आमचे पोजेस पण साधेच होते. जसा काय आम्ही हिला .... जाऊदे!! मग एक नवरा-बायको आपल्या ३-४ वर्षाच्या मुलाबरोबर बीचवरुन हॉटेलवर पार्ट जात होते. आमच्याच हॉटेल मध्ये थांबले होते आणि मुंबईतुन आलेले वाटले. त्यांना गाठलं. त्यादोघांमधल्या तिने उत्साहाने कॅमेरा घेतला. आम्ही पुन्हा पोजेस द्यायला सुरुवात केले आणि तिनेही फोटो काढले. कॅमेरा परत देताना तिने विचारलं "न्युली मॅरीड?". मी फक्त मंजुश्रीच्या पोटाकडे बघितलं आणि तिला कळलं . एवढा वेळ तु आमचे फोटो काढत होती तुला कळलं नाही. कमल आहे बाबा! ती पुढे गेल्यावर आम्ही एवढे हसलो आणि मनोमन सुखावलो की ३ वर्षांनंतरही लोकांना आम्ही न्युली मॅरीड वाटतो. अजूनही आमची फोटोंची हौस भागली नव्हती. २-३ पोजेस अजुन डोक्यात होत्या. मग २ मैत्रिणींना पकडलं. त्यांनी मात्र काहीही आढेवेढे न घेता आमचे पाहिजे तसे फोटो काढले आणि जाताना शुभेच्छाही देऊन गेल्या. मग जवळच दगडावर बसुन आम्ही काढलेले फोटो बघितले. पाहिजे तसे बऱ्यापैकी फोटो निघाले होते. सुर्य मावळेपर्यंत तिथेच बसून राहिलो आणि हॉटेलवर परत आलो.


सकाळी उठून आम्ही मुंबईला निघालो. अगदी मनासारखी सुट्टी झाली होती. आता परत अलिबागला येऊ तेव्हा आम्ही दोघांचे 'चार' झालेले असु हो चार! जे त्या दोन मैत्रिणींनाही आमच्या एका पोज वरून लगेच समजलं.

मयुरेश मांजरे
+९१ ९८६९७५६३३०

Saturday 10 September 2016

कळसुबाई - नाईट ट्रेक

महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं? हा प्रश्न जेव्हा मला चौथीच्या भुगोलात विचारला जायचा तेव्हा मला नाही वाटत मी कधी त्याचं बरोबर उत्तर दिल असेल.
त्यानंतर नववीला असताना सामान्यज्ञान ह्या विषयावर शाळेत एक परीक्षा होती त्यात भारतातले सर्वात उंच शिखर कुठलं ह्या प्रश्नावर मी बिनधास्त कळसुबाई हे उत्तर देऊन बाहेर आलो होतो आणि हे फक्त मीच नाही तर मला थोडाफार जास्त येत असं जे कोणी वर्गात समजत होते त्यांनाही पर्यवेक्षकाची नजर चुकुवून कळसुबाई लिहा हे सांगितलं. एखाद्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर एवढ्या आत्मविश्वासाने कोणीही सांगितलं नसेल.
त्यानंतर कॉलेजात गेल्यावर ट्रेकिंगला जायचे प्लॅन सुरु झाले. तेव्हापासूनच एकदातरी कळसुबाईवर चढाईचा बेत आखायचा हे पक्क केलं.
पण मनातला हा बेत बरेच वर्ष मनातच राहिला
एके दिवशी असच वर्तमानपत्र वाचताना एक बातमी वाचली की एका जोडप्याने आपलं लग्न कळसुबाईवर केलं. त्यांनी जवळपास ३०-४० वेळा शिखर सर केलं होत आणि आता तर चक्क लग्नच शिखरावर. कमाल आहे ह्यांची.
योगायोगाने ह्याच जोडप्याचा नंबर मला मिळाला आणि त्यांच्याकडुन व्हाट्सऍपवर शिखराची माहिती काढली.
त्यांनी आम्हाला सांगितलं कि तुम्ही नाईट ट्रेक करा आणि सकाळी कळसुबाई वरून सूर्योदय बघा. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरुन सूर्योदय पाहण्याची कल्पना जाम आवडली.
बस आता अजुन उशीर नाही, लगेच माझ्या चांडाळ चौकडीला विचारलं
त्यातला एक मित्र आधी गेला होता पण नाईट ट्रेक ची कल्पना सगळ्यांना भारी वाटली.
शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधुनच परस्पर लोकलने जाण्याचं ठरल. शुक्रवारी रात्री ट्रेक, शनिवारी दुपार पर्यंत परत खाली, संध्याकाळी घरी आणि रविवारी आराम. 
आमच्या चौकडी मधल्या एकाने अपेक्षेप्रमाणे आम्हाला टांग दिली आणि आम्ही तिघेच उरलो. त्यात मग माझा मेव्हणा आम्हाला जॉईंट झाला आणि पुन्हा आमची चौकडी तयार झाली. 
शुक्रवारी सकाळी घरुन निघताना बॅग भरुन घेतली. ट्रेकचे कपडे, खाण्यासाठी थोडंफार आणि कॅमेराने बॅग टम्म फुगली.
दिवसभर कामात लक्ष लागत नव्हतं, ग्रुपवर सुद्धा आमचे मेसेजवर मेसेज चालु होते.
"वेळेवर पोहचा"
"ट्रेन चुकुन द्यायची नाही"
"गर्दीची वेळ असेल पण कसही करुन ट्रेन मध्ये चढायचच"
ट्रेक पेक्षा जास्त साहस आम्हाला आम्ही जी ट्रेन ठरवली होती ती पकडण्यासाठी दाखवावी लागणार होती.
ऑफिस मध्ये पण सगळे जण,
"वो ट्रेन पकडणे वाले हो, आप की तो वाट है आज"
"तुम्ही कल्याणला जाऊन ती ट्रेन पकडा"
"पुढे गर्दी कमी असते, तिकडे चढ"
असे बरेच सल्ले ऑफिसच्या मित्रांनी दिले.
ह्या सगळ्यामुळे खरोखरच मोठ्या मोहिमेवर चाललो आहे असा वाटायला लागलं.

आम्ही सगळ्यांनी मग ट्रेन पकडण्यासाठी प्लॅन केला,
एकाने ही कसारा लोकल सीएसटीवरुनच पकडायची, म्हणजे नो टेन्शन.
बाकी आम्ही दोघांनी ठाण्यावरुन कल्याणला जायचं आधीच्या लोकलने ज्यात गर्दी कमी असेल आणि मग मागुन येणारी कसारा लोकल पकडायची. कल्याणला थोडी गर्दी उतरेल मग चढायला जमेल.
अजुन एक आम्हाला कल्याणलाच भेटणार.
एकदम प्रॉपर आखणी बस आता होऊन जाऊदे.

संध्याकाळी तयारी करुन ऑफिसमधुन निघालो. ठाणे स्टेशनला पोहचलो. इथे आम्ही लोकल पकडण्याचा केलेला प्लॅनला पहिला तडा बसला. म्हणजे तुम्ही कितीही फुलप्रुफ प्लॅन केला आणि तो ऐनवेळी फिस्कटला नाही तर मग तो प्लॅन कसला.
माज्याबरोबर सागर ठाण्यावरुन कल्याणला येणार होता त्याचा कुठेही पत्ता नव्हता. अरविंद जो सीएसटीवरुनच लोकल पकडणार होता त्याने लोकल पकडली होती.
मी एकटाच पुढे कल्याणला गेलो आणि सागरला सांगितलं आता तु ठाण्यावरुनच पकड ती लोकल.
मी कल्याणला पोहचलो, थोडाफार नाश्ता केला.
सागरने ठाण्यात लोकल पकडण्याच दिव्य साकारलं होत, म्हणजे प्लॅन पुर्वपदावर.
लोकलची वेळ झाली, विजय अजुन आला नव्हता, त्याला फोन लावला तर तो दोन मिनिटात पोहचेल बोलला, त्याला सांगितलं "तु ये लवकर आणि जिथे भेटेल तिथे लोकलमध्ये चढ नंतर आपण भेटू."
मी प्लॅटफॉर्मवर आलो. प्लॅटफॉर्म आधीच माणसांनी भरून गेला होता. मी गर्दीत जाऊन उभा राहिलो. विजयचा अजून पत्ता नव्हता.  लोकल आली आणि हा एकच गोंधळ.
"ए उतरुन द्या आधी"
"झोपला काय उतर लवकर"
"अरे चाल आतमध्ये"
उतरणाऱ्यांची आणि चढणाऱ्यांची रेटारेटी सुरु झाली. नशिबाने मी अश्या ठिकाणी उभा होतो जिथे मागच्या लोंढ्याने मला 'सुखरूप' लोकलच्या आतमध्ये नेऊन ठेवलं.
आतमध्ये चढलेले जशी जागा भेटेल तसे स्वतःला फिट करायचा प्रयत्न करत होते, जे अजुन चढले नव्हते ते गर्दीला आत ढकलत होते.
ह्या सगळ्यात तुमच्या कानावर असंख्य अश्या शिव्या कानावर पडतील. जर तुम्हाला शिव्या येत नसतील किंवा शिव्यांचा स्टॉक वाढवायचा असेल तर ह्या ट्रेन ने नक्की प्रवास करा. ३-४ मिनिटांनी लोकल हलली. डब्यामध्ये आता मुंगी शिरायलाही जागा नव्हती. पुढच्या स्टेशनला शहाडला थोडी गर्दी कमी झाली तेव्हा फोन बाहेर काढता आला आणि फोनाफोनी सुरु झाली. विजयची लोकल चुकली होती. प्लॅन फसला होता.  अरविंद, सागरना सांगितलं कि मी लोकलमध्ये आहे. नंतर टिटवाळा गेल्यावर तर लोकल पुर्णपणे खाली झाली. आरामात बसायला जागा मिळाली.
आम्ही पावणेनऊच्या आसपास कसाऱ्याला पोहचलो होतो. विजयला कल्याणवरून पुढची कसारा लोकल मिळाली होती जी साडेनऊला पोहचणार होती.
कसाऱ्यावरुन आम्हाला कसारा- अकोले एसटी पकडुन कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गाव गाठायचं होत. पण साडेनऊ नंतर बारीला जाण्यासाठी एसटी नव्हती किंवा खाजगी गाडीही नव्हती. बारी गावात भाऊ अवस्कर ह्यांच्याशी आमचं बोलणं झाल होत. तेच आमची रात्रीच्या जेवणाची आणि नाईट ट्रेक साठी गाईड देणार होते.
आम्ही बारीच्या भाऊंना फोन करुन झालेला प्रकार सांगितला. कसारा ते बारी हे दीड तासाचं अंतर असेल पण भाऊ स्वतः त्यांची गाडी काढून आम्हाला घेण्यासाठी निघाले. साडेनऊ वाजता विजय मागच्या लोकलने  पोहचला, तोपर्यंत १५-२० मिनिटांनी भाऊपण आले आणि आम्ही गाडीतुन बारीला निघालो.
कसारा ते बारी रस्ता तसा एकदम चांगला. रस्त्यात इगतपुरी, घाटातली वळणे. अंधारामुळे बाहेर जास्त काही दिसलं नाही. घोटीच्या पुढे रस्ता एकदम चिडीचुप, निर्जन.
बारी जवळ येताच भाऊंनी आम्हाला कळसुबाई शिखरावर चालु असलेली विजेचा दिवा दाखवला.
"बापरे एवढ्या वर जायचंय"

बारीला पोहचल्यावर साडेअकरा पर्यंत जेवणं उरकली. जेवण आपलं साधं घरगुती पण चविष्ट.
त्यानंतर एक नेहमीचा ठरलेला टोमणा,
"तुम्ही मुंबईवाले काही खात नाही, खावा पोटभरुन. शिखर चढायचं आहे तुम्हाला"

भाऊंनी आमच्याबरोबर येणाऱ्या गाईडची ओळख करून दिली आणि ते झोपी गेले. गाईडने सांगितलं कि वर पोहोचायला ४-५ तास लागतील, थोडा आराम करा मग निघु आणि ते ही डुलकी काढु लागले. हवेत गारवा होता. हिवाळ्याचे दिवस होते ते. आम्ही थोडावेळ पत्ते कुटत बसलो. मग रात्रीच्या अंधारात थोड फोटो काढण्याचा टाईमपास केला.
१२:३० कधी वाजले कळलच नाही. मग निघणाच्या निर्धाराने गाईडना उठवलं आणि म्हंटल चला आता.

"गणपती बाप्पा ...... मोरया"

भाऊंच्या घराच्या मागुनच एक छोटा रस्ता सुरु होतो, त्या रस्त्यावरुन चालायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी मुख्य बारी गावात आम्ही आलो. आता पर्यंत रस्त्यावरचे दिवे आणि गावातले दिवे आमच्या सोबतीला होते. आता गाव मागे टाकुन आम्ही रानातुन चालु लागलो. अजुन चढणीला सुरुवात नव्हती. शेताच्या बांधावरच्या पायवाटेवरुनच पुढे जात होतो.
पायवाट संपताच घाटासारखा कच्चा रस्ता लागला, दोन्ही बाजुने बांध आणि झाडं आणि मधुन जेमतेम एखादी बैलगाडी जाईल एवढा रस्ता . २०-२५ मिनिटांनी आमचा पहिला पडाव एका मंदिरापाशी पडला. चांगली ऐसपैस जागा होती.
वडापिंपळाची झाडं, दुपारच्या उन्हात मस्त सावलीत गप्पा मारत पडायला योग्य.
पुढे निघाल्यावर एक छोटीशी लोखंडी कमान स्वागत करते आणि तिथून पुढे खरी चढाईला सुरुवात होते. रात्रीच्या ट्रेकचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. बॅटरीच्या प्रकाशात पुढे पुढे जात होतो. मध्ये मध्ये बऱ्याच पायवाट दिसत होत्या. पण गाईड मुळे काही चुकण्याचा  प्रश्न नव्हता. एकदम शांत वातावरण, वर स्वच्छ आकाशात शुभ्र चांदण्या आणि रात्रकिड्यांचा आवाज, अगदी छान वाटत होत. वाटेत ठिकठिकाणी छोट्या छोट्या चहा, लिंबूसरबताच्या टपऱ्या वजा झोपड्या होत्या. अर्थात त्या रात्रीच्या बंद होत्या. १५-२० मिनटं चालल्यावर अशाच एखाद्या बंद टपरीच्या बाहेर ठेवलेल्या बकड्यांवर थोडावेळ विसावा घेऊन पुढे जात होतो. चांदण्यांच्या प्रकाशात चालण्याची मजाच निराळी होती. एवढा वेळ चालल्यामुळे शरीरातली थंडी कुठल्याकुठे गायब झाली होती.
वाटेत पहिली लोखंडी शिडी लागली. शिडी चढुन गेल्यावर खाली बघितलं, सर्वत्र काळोख. खाली दूर गावात विजेचे दिवे टिमटिमत होते. काळोखामुळे किती उंचावर आहोत ह्याचा अंदाज येत नव्हता. त्यातच आकाशात मला तारा निखळल्याचा दिसला. सिनेमात पाहिल्याप्रमाणे मी लगेच मनातल्या मनात इच्छा मागुन मोकळा झालो. पुढे गेल्यावर आम्ही एका विहिरीपाशी आलो. तिथे एक चहाच्या विसाव्यासाठी झोपडी होती. तिथून झेंडा वाऱ्यामुळे जोरात फडकण्याचा आवाज येत होता. गाईडने सांगितलं आता वर फक्त २० मिनिटच आहे आणि वारा खूप वाटत आहे. थोडावेळ इथेच आराम करा. ४-४:३० वाजले असतील. झोपडीत बरीच बारदान, प्लॅस्टिक होते, त्यांचच अंथरुण बनवलं. आता थंडी जाणवु लागली होती. वाऱ्याचाही सुं-सुं आवाज येत होता. स्वेटर, हातमोजे, कानटोपी सर्व घातलं तरीही थंडी जाणवत होती. कशेबशे आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला पण थंडीमुळे झोप येत नव्हती. तसाच पडून राहिलो. पण कितीवेळ पडून राहणार, शेवटी बाहेर आलो. नुकतीच चंद्राची कोर पुर्व क्षितिजवर उगवली होती. मिचमिचणाऱ्या चांदण्यांमध्ये चंद्राची कोर उठावदार दिसत होती. थंडी तर जाणवत होतीच. बाकीचेही जागे झाले आणि बाहेर आले. सगळ्यांनी आजुबाजुला पडलेला पालापाचोळा आणि लाकडं गोळा करून शेकोटी पेटवली आणि अंगातली थंडी पळवायचा प्रयत्न केला. थोड्यावेळात पुर्व क्षितिजावर उजाडू लागलं. आम्ही गाईडला उठवलं आणि पुढची चढाई सुरु केली. शेवटची लोखंडी शिडी पार करून आम्ही शिखरावर पोहचलो.
शिखरावर पोहोचताच शरीरातला सगळा थकवा निघुन गेला. महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर होतो आम्ही. पुर्वेला आता लाली आली होती. सर्वत्र चांगला उजेड पडला होता. आमचं फोटोसेशन जोरात सुरु होतं. शिखरावर एक कळसुबाई मातेचं मंदिर होतं. आनंदाची गोष्ट म्हणजे शिखरावर फक्त आम्हीच होतो. शिखरावरुन एका बाजुला रतनगड, एका बाजूला भंडारदरा धरणाचं जलाशय तर एका बाजुला बारी गाव. सर्व परिसर पाहुन झाल्यावर एका ठिकाणी निवांत बसलो. समोर सूर्योदय होत होता. नाईट ट्रेकचा विचार अगदीच चांगला होता हे आता पटत होतं. सोबत आणलेली शिदोरी सोडुन थोडी पेटपुजा केली.  गाईडने आम्हाला परिसराची माहिती दिली. उजेडात दिसत होतो कि आम्ही नक्की किती उंचावर आलो आहोत आणि ते पाहुन स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. बराच वेळ शिखरावर घालवल्यावर निघायचं ठरलं. कळसुबाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. विहिरीवर परत  आल्यावर हातपाय धुतले. रात्री आसरा दिलेल्या झोपडीचे आभार मानुन पुढे सरकलो. प्रत्येक वळणावर आमच्या सर्वांची प्रतिक्रिया असायची "बापरे! आपण रात्री हे चढलो". एक तासानंतर आम्हाला पहिला ग्रुप वर चढताना दिसला. त्यांनी आम्हाला विचारलं, "आला पण वर जाऊन?". आम्ही अभिमानाने, "नाईट ट्रेक केलाआहे, रात्रीच वर पोहोचलो होतो". पुढे वर चढणारे ट्रेकर्स ग्रुप वाढत गेले. सर्वाना आम्ही गर्वाने सांगत होतो की आम्ही नाईट ट्रेक केला आणि कोणी आम्हाला विचारलं कि अजून किती वर जायचा आहे तर मुद्दामून त्यांना सांगायचो वेळ वाढवुन सांगायचो, "अरे अजून तुम्ही ३०%च वर आला आहात, अजून खूप वर जायचा आहे." तसे ते रागाने बघायचे.
बऱ्यापैकी खाली आलो तेव्हा वाटेतले सगळ्या चहाच्या टपऱ्या उघडल्या होत्या. एके ठिकाणी थांबुन पोहे खाल्ले आणि चहा मारला. थोडी तरतरी आली. त्यानंतर न थांबता खाली उतरलो. ११ वाजले असतील. गावात बरीच वर्दळ होती. रस्त्यावर आलो तेव्हा एक ट्रॅक्टर बाजूने जात होता. ट्रॅक्टरवर चढुन आम्ही भाऊंच्या घरी पोहचलो. आमचे गाईडसाहेब मागे गावातच थांबले होते. भाऊंनी आधीच जेवण तयार करून ठेवलं होतं. जेवणार ताव मारून आम्ही कसाऱ्याला जाणाऱ्या एसटीची वाट पाहत थांबलो. एसटीत चढलो आणि जे ताणून दिली ते कसारा आलं तेव्हाच डोळे उघडले. पाय आता दुखायला लागले होते. शुक्रवार संध्याकाळपासुन सकाळपर्यंत केलेली मजा आता चांगलीच बाहेर येत होती. कधी एकदा घरी पोहचतोय असा झालं होत. कसाऱ्यावरुन लोकल पकडली. कल्याणच्या पुढे ती तुडुंब भरली. गर्दीतून वाट काढून ठाण्याला उतरलो. ठाण्यावरुन नेरुळ लोकल पकडून घरी पोहचलो. छान अंघोळ केल्यावर बिछान्यावर पडताच झोपी गेलो.















मयुरेश मांजरे
+९१ ९८६८७५६३३०

कृपया ब्लॉग फॉलो करा 

Sunday 17 July 2016

तोरणा किल्ला

सह्याद्री पर्वताच्या रांगेतील सर्वात उंचावर असलेला किल्ला. १३व्या शतकापासून हा किल्ला दिमाखात उभा आहे. ४६०३ फुट समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेला हा किल्ला नक्कीच आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या किल्ल्यांमध्ये मिरवत असेल की अरे मीच तो ज्याला छत्रपतींनी अवघ्या वयाच्या १६व्या वर्षी जिंकुन १६४३ साली हिंदवी स्वराज्याच तोरण बांधल.
आम्ही ४ मित्रांनी पावसाळ्यात किल्ल्यावर जायचा बेत आखला. ४-५ तासाचा प्रवास म्हणुन सकाळी ५ वाजताच निघायच ठरवलं. पण वेळ ठरवणं आणि पाळणं ह्यात फरक आहे. तरी ६ वाजता आम्ही घर सोडलं. मित्राची नवीन गाडी आणि नेहमीपेक्षा बदल म्हणजे आज मी गाडीच्या मागच्या सीटवर बसुन आराम करत होतो. द्रुतगती मार्गावर लागलो तेव्हा थोडंसं उजाडायला लागलं होतं. पाऊस पण मस्त पडत होता. अहाहा!! मागच्या वर्षी ह्याच पावसाने पाठ फिरवली होती म्हणुन ह्यावेळी तर अजूनच हवाहवासा वाटत होता.
गेल्या १५ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सगळं हिरवंगार झालं होतं. डोंगरांमधून छोटे छोटे ओहोळ वाहु लागले होते. ढगांनी डोंगराच्या माथ्यावर गर्दी केली होती. ह्यातच आम्ही घाट चढायला सुरुवात केली होती. रस्त्यावरुन दिसणारे धबधबे आम्हाला खुणावत होते. जाऊदे तो एवढा प्रवास, इथेच पाण्यात डुंबायचं का हा विचार मनात येत होता पण मनावर ताबा ठेवुन पुढे जात राहिलो. घाट चढून तळेगाव टोल नंतर आम्ही आपला पहिला विसावा घेतला. गाडीत पेट्रोल भरुन आम्हीही भरपेट नाश्ता केला. गाडीचा चालकसुद्धा बदली झाला. पण मी काही मागची आराम करायची सीट सोडली नाही. द्रुतगती मार्ग संपल्यावर बालेवाडी - चांदणी चौक - वारजे - कात्रज - खेड शिवापूर कापत गाडी सुसाट जात होती पण शेवटी एक ठिकाणी ट्रॅफिक जाम लागलंच. नवीन पुलाच काम आणि त्यात पर्यायी रस्त्यावर खड्डे. जवळपास एक तास आमचा त्या जाम मध्ये गेला. नंतर लगेचच नसरापूर फाट्याला मुख्य हाईवे सोडून उजवीकडे वळण घेतलं.
नसरापूर ते व्हेल्हे (तोरणाच्या पायथ्याशी असलेलं गाव) रस्ता एकपदरी पण छान होता. अधेमध्ये खडबडीत रस्ता सोडला तर गुळगुळीत रस्ता होता. पायथ्याशी पोहचायला आम्हाला ११ वाजले. गावातुन एक रस्ता पुढे गडाकडे जात होता पण खुपच चढणीचा रस्ता वाटत होता. आजुबाजूला चौकशी केली तर बोलले की आहे चांगला रस्ता, वरती पठारापर्यंत जाते गाडी. तिथे पार्किंगची सोय आहे. मी मागे लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा अश्या चढणीवर गाडी चढवली होती, त्यामुळे मी गाडी हातात घेतली. समोर दिसणारा चढ लगेचच पार केला पण एक मिनिट! रस्ता इथेच संपला नव्हता, पुढे रस्ता अजूनच निमुळता होता आणि त्यात चढणीचे यु-टर्न. जसजसा पुढे जात होतो माझ्या पोटात भीतीचा गोळा येत होता. असा वाटत होतं, बस!! इथेच गाडी सोडून दयावी. पण एक तर गाडी कुठे बाजूला पार्क करायची सोय नाही आणि परत मागे ही घेता येणार नव्हती. शेवटी कसेबसे आम्ही त्या पार्किंगच्या पठारावर पोहोचलो आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
थोडाफार पिण्याचं पाणी, खाण्याचे डबे घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात पावसानेही हजेरी लावली. थोडावेळ छत्री घेऊन चालण्याचा प्रयत्न केला पण नंतर म्हणालो जाऊदे आणि बिनधास्तपणे सर्व भिजतच पुढे चालु लागलो. थोडीशी चढाई केल्यावर एक नजर आम्ही आमच्या डावीकडे टाकली आणि प्रवासामुळे आलेला थकवा कुठच्या कुठे पळाला. समोर बरेचसे पांढरेशुभ्र फेसाळणारे पाणी हिरवी चादर ओढलेल्या डोंगराच्या कडेकपारीतुन कोसळत होते. खाली शेतांमध्ये साचलेलं पाणी बघुन मन प्रसन्न होत होत की ह्यावेळी बळीराजा नक्कीच खुश असणार. पावसामुळे आम्हाला फोटो काढायला जमत नव्हते पण काही हरकत नाही.
थोडस पुढे गेल्यावर एक सपाट भाग लागतो. इथे दोन्ही बाजुला दरी आणि मध्ये पायवाट. तिथुन वर पाहिलं तर तोरणा ढगांच्या धुक्यात हरवून गेला होता. चश्म्यावर पाण्याचे थेंब आणि त्यात धुकं ह्यामुळे जास्त पुढच दिसत नव्हत. पावसाने चांगलाच जोर पकडला, त्यातच आम्ही पुढे पुढे जात राहिलो. वाटेत आम्हाला एक कुटुंब भेटलं जे खाली उतरत होतं. त्यात ४-५ वर्षाची एक मुलगा आणि मुलगी होते. त्यांना विचारलं, "कसा वाटलं वरती?". त्यांनीही उत्साहात उत्तर दिलं "झकास". मध्ये एक कातळ लागलं त्यात कसेबसे चढुन आम्ही वर गेलो. थोडा पुढे गेल्यावर डाव्याबाजूला उभा डोंगर आणि उजव्याबाजुला दरी, पावसामुळे रस्ताही निसरडा. दबकत दबकत पावले टाकत पुढे जात होतो. थोडं आणखी रस्ता कापल्यावर कानावर पाण्याचा आवाज येऊ लागला. तो पुढे पुढे वाढतच गेला आणि मग एके ठिकाणी तर आईशपथ! एक मोठा धबधबा डावीकडच्या डोंगरावरून कोसळत होता, त्याच पाणी पायवाटेवरून वाहत उजव्या दरीत जात होता. तिथे मात्र आम्हाला राहवलं नाही. मित्राच्या मोबाईल मध्ये फोटो टिपले. पाण्यात थोडं भिजल्यावर हुरहुरी आली. पुढे १५ मिनिटातच तोरणा किल्ल्याचा पहिला दरवाजा लागला. आत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. आधी पासून आलेले बरेच जण तिथे होते. समोरच्या घरात चहा-पोहे भेटत होते. भुक लागलीच होती. चांगला पोह्यांवर ताव मारला आणि बॅगमध्ये आणलेले जिन्नस फस्त केले. मग गडावर फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला पण धुक्यामध्ये काहीच समजत नव्हत आणि त्यात पाऊस, त्यामुळे फोटो ही काढता येत नव्हते. तरी २-३  बुरुजांवर गेलो. समोर दिसणारी दरी किती खोल  ह्याचाही अंदाज येत नव्हता. धुक्यात हरवण्यापेक्षा आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. 
चढताना ज्या गोष्टी अवघड वाटत होत्या तिथे आरामात खाली उतरलो. पुन्हा वाटेतल्या धबधब्यावर मनसोक्त भिजुन घेतलं. थोडस खाली आल्यावर गडावर जाणारे आम्हाला विचारत होते अजून किती वेळ, आम्हीपण मुद्दामून १ तास जास्त सांगत होतो. थोड्यावेळाने वर जाणाऱ्यांना आम्ही उगाचच आजून खाली किती आहे असा विचारत होतो. एक गुजराती ग्रुप आम्हाला  भेटला, बहुतेक त्यांचा गोंधळ झाला असेल, त्यांना वाटत असेल गाडी गडावर जाते पण एवढी चढाई करायची आहे हे त्यांना माहीत नसावं. बरेच जण तर मागे फिरले होते. त्यात लहान मुलेही होती जी रडत होती. तरी नशीब ते जास्त वर आले नव्हते. आम्ही परत आपल्या गाडीपाशी पोहचलो. पूर्णपणे भिजलेलो, तिथे परत कांदाभजी खाऊन पोटाला शांत केल. पाऊस थोडा थांबल्यावर गाडीजवळच कपडे बदलले. परत त्या खतरनाक रस्त्यावरुन गाडी खाली उतरवली. गाडी व्हेल्हे गावात आल्यावर जिवात जीव आला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. 
संध्याकाळ आणि त्यात रविवार, वाटेत पहिल्यांदा नसरापुरच्या बाजारामुळे १५ मिनिटे गेली. नंतर खेड-शिवापुरला नाश्ता केला आणि पुढे निघालो तो पुण्यात गाडी फसली. तिथे जवळपास १ तास गेला.  तिथुन निघाल्यावर सरळ आम्ही घरी. 
पाऊस, वाटेतला प्रवास, सह्याद्रीचे हिरवेगार पर्वतरांगा, त्यातुन दुधासारखे पडणारे पांढरेशुभ्र पाणी आणि तोरणाची चढाई सगळच एकदम मस्त!!!

Saturday 20 February 2016

लोणावळा - छोटीशी सहल

सहज एके दिवशी इच्छा झाली म्हणुन अचानक लोणावळ्याचा बेत आखला. घरापासुन जेमतेम फक्त दीड तास. नेहमी गावी जाताना लोणावळा लागतच पण कधी फिरायला असा तिथे गेलो नाही. म्हणतातना आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. आज जाऊ उद्या जाऊ आणि काय वाटेतच  तर आहे पुण्याच्या, कधीही जाता येईल असाच नेहमीचा विचार. म्हणून म्हंटल नाही आज जायचाच. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन जाताना आजकाल नेहमी मादाम तुसादच्याच्या धर्तीवर बनवलं गेलेलं मेणाच्या पुतळ्यांच संग्रहालयाचे खुपच जाहिरात दिसते. तेही बघायची खूप दिवसापासून मनातइच्छाहोती. म्हणुन आज काढली गाडी आणि लागलो लोणावळ्याच्या वाटेवर.
सकाळी दहाच्या सुमारासच गाडी संग्रहालयाच्या पार्किंग मध्ये शिरली. द्रुतगती मार्गाच्या लोणावळा एक्झिट मधुन बाहेर आलो कि मुख्य रस्त्याला लागुनच असल्यामुळे जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. तिकीट काढून आत गेलो. सर्व प्रथम नजरेस पडतात ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. हातात तलवार, डोक्यावर जिरेटोप. तरीही महाराजांचा पुतळा तितकासा जमला नाही हे माझ वैयक्तिक मत. महाराजांच्या नजरेत म्हणावी तशी जरब आलेली नाही आणि भारदस्त पणा हि नाही. पुढे आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा ध्यानस्थ बसलेला आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर,अण्णा  हजारे, बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार, नरेंद्र मोदी अश्या नेत्यांचे पुतळे.  काही पुतळे बघुन तर साक्षात तीच व्यक्ती पुढ्यात उभी असल्याचा भास होतो तर काही पुतळे कधीकधी ओळखुच येत नाही. अश्या वेळी समोर असलेली नावाची पाटी मदत करते आणि मग आपण विचार करतो हा खरच असा वाटतो. खेळाडू, सिनामातले कलाकरांचे पुतळे हि इथे पाहायला मिळतील. सर्व पुतळ्यांबरोबर फोटो टिपत पुढे जात होतो. तिथे काही शाळांची सहल आली होत. मुलांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तींच्या पुतळ्याबरोबर एक क्लिकसाठी गर्दी केली होती. त्यांच्यासारखेच नक्कल करुन फोटो काढण्यात तर वेगळीच मजा येत होती. सेल्फींचाही धडाका चालु होता. सर्व पुतळे बघुन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.
दुपारही झाली होती आणि आता पोटात कावळे ओरडू लागले होते. समोरच मनशक्ती प्रयोग केंद्र आहे. तिथे जेवलो आणि टाईगर पोईंटला निघालो. बऱ्याच दिवसांनी लोणावळ्यात गाडी घातली होती. एक्स्प्रेस-वे मुळे तर बाहेरच्या बाहेरूनच प्रवास होतो. अजूनही फारसा बदल दिसला नाही. टाईगर पोईंटला रस्ता तसा चांगला होता. रस्त्यात तुम्हाला आयएनएस शिवाजी हे भारतीय नौसेनेचे प्रशिक्षण केंद्र लागेल. तसेच पावसाळ्यातल प्रसिद्ध ठिकाण म्हणजे भुशी धरणही ह्याच रस्त्यावर आहे. पुढे एक वळणावळणाचा घाट चढुन गेल्यावर थोड्या अंतरावर  टाईगर पोईंट येईल.
अतिशय निसर्गरम्य परिसर. भर दुपारीही छान वारा सुटलेला. फमिली पिकनिक साठी तर उत्तम जागा. समोरच ६५० मीटर खोल दरी. पावसाळ्यात तर नक्कीच इथला परिसर अगदी मोहक असेल. मनोरंजनासाठी उंटाची सफारी, बग्गी गाड्या आहेत पण त्यांचे दरही तसेच आहेत.
थोडावेळ तिथे टाईमपास केला. मस्त फोटो काढले आणि पुन्हा लोणावळ्यात आलो. तिथुन परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत खंडाळ्यात घाट सुरु होण्याआधी एक छोटस उद्यान आहे. तिथुन दिसणारा परिसर अतिशय सुंदर आहे. एक्स्प्रेस-वेच्या रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या आपण उभे असतो त्या खालच्या डोंगरात गुडूप होतात. तिथे असणाऱ्या माकडांपासून जर जपुनच राहिलेल बर. आपल्याजवळ काही पदार्थ दिसले की लगेच हिस्कावायला पुढे येतात. तिथून निघाल्यावर नेहमीप्रमाणे वरदविनायकाचे दर्शन घेतले आणि घरी परतलो. एकादिवासाची छोटी पण मस्त ट्रीप झाली.