Saturday 20 February 2016

लोणावळा - छोटीशी सहल

सहज एके दिवशी इच्छा झाली म्हणुन अचानक लोणावळ्याचा बेत आखला. घरापासुन जेमतेम फक्त दीड तास. नेहमी गावी जाताना लोणावळा लागतच पण कधी फिरायला असा तिथे गेलो नाही. म्हणतातना आपल्याजवळ असलेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. आज जाऊ उद्या जाऊ आणि काय वाटेतच  तर आहे पुण्याच्या, कधीही जाता येईल असाच नेहमीचा विचार. म्हणून म्हंटल नाही आज जायचाच. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन जाताना आजकाल नेहमी मादाम तुसादच्याच्या धर्तीवर बनवलं गेलेलं मेणाच्या पुतळ्यांच संग्रहालयाचे खुपच जाहिरात दिसते. तेही बघायची खूप दिवसापासून मनातइच्छाहोती. म्हणुन आज काढली गाडी आणि लागलो लोणावळ्याच्या वाटेवर.
सकाळी दहाच्या सुमारासच गाडी संग्रहालयाच्या पार्किंग मध्ये शिरली. द्रुतगती मार्गाच्या लोणावळा एक्झिट मधुन बाहेर आलो कि मुख्य रस्त्याला लागुनच असल्यामुळे जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. तिकीट काढून आत गेलो. सर्व प्रथम नजरेस पडतात ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. हातात तलवार, डोक्यावर जिरेटोप. तरीही महाराजांचा पुतळा तितकासा जमला नाही हे माझ वैयक्तिक मत. महाराजांच्या नजरेत म्हणावी तशी जरब आलेली नाही आणि भारदस्त पणा हि नाही. पुढे आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा ध्यानस्थ बसलेला आहे. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर,अण्णा  हजारे, बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार, नरेंद्र मोदी अश्या नेत्यांचे पुतळे.  काही पुतळे बघुन तर साक्षात तीच व्यक्ती पुढ्यात उभी असल्याचा भास होतो तर काही पुतळे कधीकधी ओळखुच येत नाही. अश्या वेळी समोर असलेली नावाची पाटी मदत करते आणि मग आपण विचार करतो हा खरच असा वाटतो. खेळाडू, सिनामातले कलाकरांचे पुतळे हि इथे पाहायला मिळतील. सर्व पुतळ्यांबरोबर फोटो टिपत पुढे जात होतो. तिथे काही शाळांची सहल आली होत. मुलांनी त्यांच्या आवडत्या व्यक्तींच्या पुतळ्याबरोबर एक क्लिकसाठी गर्दी केली होती. त्यांच्यासारखेच नक्कल करुन फोटो काढण्यात तर वेगळीच मजा येत होती. सेल्फींचाही धडाका चालु होता. सर्व पुतळे बघुन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.
दुपारही झाली होती आणि आता पोटात कावळे ओरडू लागले होते. समोरच मनशक्ती प्रयोग केंद्र आहे. तिथे जेवलो आणि टाईगर पोईंटला निघालो. बऱ्याच दिवसांनी लोणावळ्यात गाडी घातली होती. एक्स्प्रेस-वे मुळे तर बाहेरच्या बाहेरूनच प्रवास होतो. अजूनही फारसा बदल दिसला नाही. टाईगर पोईंटला रस्ता तसा चांगला होता. रस्त्यात तुम्हाला आयएनएस शिवाजी हे भारतीय नौसेनेचे प्रशिक्षण केंद्र लागेल. तसेच पावसाळ्यातल प्रसिद्ध ठिकाण म्हणजे भुशी धरणही ह्याच रस्त्यावर आहे. पुढे एक वळणावळणाचा घाट चढुन गेल्यावर थोड्या अंतरावर  टाईगर पोईंट येईल.
अतिशय निसर्गरम्य परिसर. भर दुपारीही छान वारा सुटलेला. फमिली पिकनिक साठी तर उत्तम जागा. समोरच ६५० मीटर खोल दरी. पावसाळ्यात तर नक्कीच इथला परिसर अगदी मोहक असेल. मनोरंजनासाठी उंटाची सफारी, बग्गी गाड्या आहेत पण त्यांचे दरही तसेच आहेत.
थोडावेळ तिथे टाईमपास केला. मस्त फोटो काढले आणि पुन्हा लोणावळ्यात आलो. तिथुन परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत खंडाळ्यात घाट सुरु होण्याआधी एक छोटस उद्यान आहे. तिथुन दिसणारा परिसर अतिशय सुंदर आहे. एक्स्प्रेस-वेच्या रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या आपण उभे असतो त्या खालच्या डोंगरात गुडूप होतात. तिथे असणाऱ्या माकडांपासून जर जपुनच राहिलेल बर. आपल्याजवळ काही पदार्थ दिसले की लगेच हिस्कावायला पुढे येतात. तिथून निघाल्यावर नेहमीप्रमाणे वरदविनायकाचे दर्शन घेतले आणि घरी परतलो. एकादिवासाची छोटी पण मस्त ट्रीप झाली.