Saturday 10 September 2016

कळसुबाई - नाईट ट्रेक

महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं? हा प्रश्न जेव्हा मला चौथीच्या भुगोलात विचारला जायचा तेव्हा मला नाही वाटत मी कधी त्याचं बरोबर उत्तर दिल असेल.
त्यानंतर नववीला असताना सामान्यज्ञान ह्या विषयावर शाळेत एक परीक्षा होती त्यात भारतातले सर्वात उंच शिखर कुठलं ह्या प्रश्नावर मी बिनधास्त कळसुबाई हे उत्तर देऊन बाहेर आलो होतो आणि हे फक्त मीच नाही तर मला थोडाफार जास्त येत असं जे कोणी वर्गात समजत होते त्यांनाही पर्यवेक्षकाची नजर चुकुवून कळसुबाई लिहा हे सांगितलं. एखाद्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर एवढ्या आत्मविश्वासाने कोणीही सांगितलं नसेल.
त्यानंतर कॉलेजात गेल्यावर ट्रेकिंगला जायचे प्लॅन सुरु झाले. तेव्हापासूनच एकदातरी कळसुबाईवर चढाईचा बेत आखायचा हे पक्क केलं.
पण मनातला हा बेत बरेच वर्ष मनातच राहिला
एके दिवशी असच वर्तमानपत्र वाचताना एक बातमी वाचली की एका जोडप्याने आपलं लग्न कळसुबाईवर केलं. त्यांनी जवळपास ३०-४० वेळा शिखर सर केलं होत आणि आता तर चक्क लग्नच शिखरावर. कमाल आहे ह्यांची.
योगायोगाने ह्याच जोडप्याचा नंबर मला मिळाला आणि त्यांच्याकडुन व्हाट्सऍपवर शिखराची माहिती काढली.
त्यांनी आम्हाला सांगितलं कि तुम्ही नाईट ट्रेक करा आणि सकाळी कळसुबाई वरून सूर्योदय बघा. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरुन सूर्योदय पाहण्याची कल्पना जाम आवडली.
बस आता अजुन उशीर नाही, लगेच माझ्या चांडाळ चौकडीला विचारलं
त्यातला एक मित्र आधी गेला होता पण नाईट ट्रेक ची कल्पना सगळ्यांना भारी वाटली.
शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधुनच परस्पर लोकलने जाण्याचं ठरल. शुक्रवारी रात्री ट्रेक, शनिवारी दुपार पर्यंत परत खाली, संध्याकाळी घरी आणि रविवारी आराम. 
आमच्या चौकडी मधल्या एकाने अपेक्षेप्रमाणे आम्हाला टांग दिली आणि आम्ही तिघेच उरलो. त्यात मग माझा मेव्हणा आम्हाला जॉईंट झाला आणि पुन्हा आमची चौकडी तयार झाली. 
शुक्रवारी सकाळी घरुन निघताना बॅग भरुन घेतली. ट्रेकचे कपडे, खाण्यासाठी थोडंफार आणि कॅमेराने बॅग टम्म फुगली.
दिवसभर कामात लक्ष लागत नव्हतं, ग्रुपवर सुद्धा आमचे मेसेजवर मेसेज चालु होते.
"वेळेवर पोहचा"
"ट्रेन चुकुन द्यायची नाही"
"गर्दीची वेळ असेल पण कसही करुन ट्रेन मध्ये चढायचच"
ट्रेक पेक्षा जास्त साहस आम्हाला आम्ही जी ट्रेन ठरवली होती ती पकडण्यासाठी दाखवावी लागणार होती.
ऑफिस मध्ये पण सगळे जण,
"वो ट्रेन पकडणे वाले हो, आप की तो वाट है आज"
"तुम्ही कल्याणला जाऊन ती ट्रेन पकडा"
"पुढे गर्दी कमी असते, तिकडे चढ"
असे बरेच सल्ले ऑफिसच्या मित्रांनी दिले.
ह्या सगळ्यामुळे खरोखरच मोठ्या मोहिमेवर चाललो आहे असा वाटायला लागलं.

आम्ही सगळ्यांनी मग ट्रेन पकडण्यासाठी प्लॅन केला,
एकाने ही कसारा लोकल सीएसटीवरुनच पकडायची, म्हणजे नो टेन्शन.
बाकी आम्ही दोघांनी ठाण्यावरुन कल्याणला जायचं आधीच्या लोकलने ज्यात गर्दी कमी असेल आणि मग मागुन येणारी कसारा लोकल पकडायची. कल्याणला थोडी गर्दी उतरेल मग चढायला जमेल.
अजुन एक आम्हाला कल्याणलाच भेटणार.
एकदम प्रॉपर आखणी बस आता होऊन जाऊदे.

संध्याकाळी तयारी करुन ऑफिसमधुन निघालो. ठाणे स्टेशनला पोहचलो. इथे आम्ही लोकल पकडण्याचा केलेला प्लॅनला पहिला तडा बसला. म्हणजे तुम्ही कितीही फुलप्रुफ प्लॅन केला आणि तो ऐनवेळी फिस्कटला नाही तर मग तो प्लॅन कसला.
माज्याबरोबर सागर ठाण्यावरुन कल्याणला येणार होता त्याचा कुठेही पत्ता नव्हता. अरविंद जो सीएसटीवरुनच लोकल पकडणार होता त्याने लोकल पकडली होती.
मी एकटाच पुढे कल्याणला गेलो आणि सागरला सांगितलं आता तु ठाण्यावरुनच पकड ती लोकल.
मी कल्याणला पोहचलो, थोडाफार नाश्ता केला.
सागरने ठाण्यात लोकल पकडण्याच दिव्य साकारलं होत, म्हणजे प्लॅन पुर्वपदावर.
लोकलची वेळ झाली, विजय अजुन आला नव्हता, त्याला फोन लावला तर तो दोन मिनिटात पोहचेल बोलला, त्याला सांगितलं "तु ये लवकर आणि जिथे भेटेल तिथे लोकलमध्ये चढ नंतर आपण भेटू."
मी प्लॅटफॉर्मवर आलो. प्लॅटफॉर्म आधीच माणसांनी भरून गेला होता. मी गर्दीत जाऊन उभा राहिलो. विजयचा अजून पत्ता नव्हता.  लोकल आली आणि हा एकच गोंधळ.
"ए उतरुन द्या आधी"
"झोपला काय उतर लवकर"
"अरे चाल आतमध्ये"
उतरणाऱ्यांची आणि चढणाऱ्यांची रेटारेटी सुरु झाली. नशिबाने मी अश्या ठिकाणी उभा होतो जिथे मागच्या लोंढ्याने मला 'सुखरूप' लोकलच्या आतमध्ये नेऊन ठेवलं.
आतमध्ये चढलेले जशी जागा भेटेल तसे स्वतःला फिट करायचा प्रयत्न करत होते, जे अजुन चढले नव्हते ते गर्दीला आत ढकलत होते.
ह्या सगळ्यात तुमच्या कानावर असंख्य अश्या शिव्या कानावर पडतील. जर तुम्हाला शिव्या येत नसतील किंवा शिव्यांचा स्टॉक वाढवायचा असेल तर ह्या ट्रेन ने नक्की प्रवास करा. ३-४ मिनिटांनी लोकल हलली. डब्यामध्ये आता मुंगी शिरायलाही जागा नव्हती. पुढच्या स्टेशनला शहाडला थोडी गर्दी कमी झाली तेव्हा फोन बाहेर काढता आला आणि फोनाफोनी सुरु झाली. विजयची लोकल चुकली होती. प्लॅन फसला होता.  अरविंद, सागरना सांगितलं कि मी लोकलमध्ये आहे. नंतर टिटवाळा गेल्यावर तर लोकल पुर्णपणे खाली झाली. आरामात बसायला जागा मिळाली.
आम्ही पावणेनऊच्या आसपास कसाऱ्याला पोहचलो होतो. विजयला कल्याणवरून पुढची कसारा लोकल मिळाली होती जी साडेनऊला पोहचणार होती.
कसाऱ्यावरुन आम्हाला कसारा- अकोले एसटी पकडुन कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गाव गाठायचं होत. पण साडेनऊ नंतर बारीला जाण्यासाठी एसटी नव्हती किंवा खाजगी गाडीही नव्हती. बारी गावात भाऊ अवस्कर ह्यांच्याशी आमचं बोलणं झाल होत. तेच आमची रात्रीच्या जेवणाची आणि नाईट ट्रेक साठी गाईड देणार होते.
आम्ही बारीच्या भाऊंना फोन करुन झालेला प्रकार सांगितला. कसारा ते बारी हे दीड तासाचं अंतर असेल पण भाऊ स्वतः त्यांची गाडी काढून आम्हाला घेण्यासाठी निघाले. साडेनऊ वाजता विजय मागच्या लोकलने  पोहचला, तोपर्यंत १५-२० मिनिटांनी भाऊपण आले आणि आम्ही गाडीतुन बारीला निघालो.
कसारा ते बारी रस्ता तसा एकदम चांगला. रस्त्यात इगतपुरी, घाटातली वळणे. अंधारामुळे बाहेर जास्त काही दिसलं नाही. घोटीच्या पुढे रस्ता एकदम चिडीचुप, निर्जन.
बारी जवळ येताच भाऊंनी आम्हाला कळसुबाई शिखरावर चालु असलेली विजेचा दिवा दाखवला.
"बापरे एवढ्या वर जायचंय"

बारीला पोहचल्यावर साडेअकरा पर्यंत जेवणं उरकली. जेवण आपलं साधं घरगुती पण चविष्ट.
त्यानंतर एक नेहमीचा ठरलेला टोमणा,
"तुम्ही मुंबईवाले काही खात नाही, खावा पोटभरुन. शिखर चढायचं आहे तुम्हाला"

भाऊंनी आमच्याबरोबर येणाऱ्या गाईडची ओळख करून दिली आणि ते झोपी गेले. गाईडने सांगितलं कि वर पोहोचायला ४-५ तास लागतील, थोडा आराम करा मग निघु आणि ते ही डुलकी काढु लागले. हवेत गारवा होता. हिवाळ्याचे दिवस होते ते. आम्ही थोडावेळ पत्ते कुटत बसलो. मग रात्रीच्या अंधारात थोड फोटो काढण्याचा टाईमपास केला.
१२:३० कधी वाजले कळलच नाही. मग निघणाच्या निर्धाराने गाईडना उठवलं आणि म्हंटल चला आता.

"गणपती बाप्पा ...... मोरया"

भाऊंच्या घराच्या मागुनच एक छोटा रस्ता सुरु होतो, त्या रस्त्यावरुन चालायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी मुख्य बारी गावात आम्ही आलो. आता पर्यंत रस्त्यावरचे दिवे आणि गावातले दिवे आमच्या सोबतीला होते. आता गाव मागे टाकुन आम्ही रानातुन चालु लागलो. अजुन चढणीला सुरुवात नव्हती. शेताच्या बांधावरच्या पायवाटेवरुनच पुढे जात होतो.
पायवाट संपताच घाटासारखा कच्चा रस्ता लागला, दोन्ही बाजुने बांध आणि झाडं आणि मधुन जेमतेम एखादी बैलगाडी जाईल एवढा रस्ता . २०-२५ मिनिटांनी आमचा पहिला पडाव एका मंदिरापाशी पडला. चांगली ऐसपैस जागा होती.
वडापिंपळाची झाडं, दुपारच्या उन्हात मस्त सावलीत गप्पा मारत पडायला योग्य.
पुढे निघाल्यावर एक छोटीशी लोखंडी कमान स्वागत करते आणि तिथून पुढे खरी चढाईला सुरुवात होते. रात्रीच्या ट्रेकचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. बॅटरीच्या प्रकाशात पुढे पुढे जात होतो. मध्ये मध्ये बऱ्याच पायवाट दिसत होत्या. पण गाईड मुळे काही चुकण्याचा  प्रश्न नव्हता. एकदम शांत वातावरण, वर स्वच्छ आकाशात शुभ्र चांदण्या आणि रात्रकिड्यांचा आवाज, अगदी छान वाटत होत. वाटेत ठिकठिकाणी छोट्या छोट्या चहा, लिंबूसरबताच्या टपऱ्या वजा झोपड्या होत्या. अर्थात त्या रात्रीच्या बंद होत्या. १५-२० मिनटं चालल्यावर अशाच एखाद्या बंद टपरीच्या बाहेर ठेवलेल्या बकड्यांवर थोडावेळ विसावा घेऊन पुढे जात होतो. चांदण्यांच्या प्रकाशात चालण्याची मजाच निराळी होती. एवढा वेळ चालल्यामुळे शरीरातली थंडी कुठल्याकुठे गायब झाली होती.
वाटेत पहिली लोखंडी शिडी लागली. शिडी चढुन गेल्यावर खाली बघितलं, सर्वत्र काळोख. खाली दूर गावात विजेचे दिवे टिमटिमत होते. काळोखामुळे किती उंचावर आहोत ह्याचा अंदाज येत नव्हता. त्यातच आकाशात मला तारा निखळल्याचा दिसला. सिनेमात पाहिल्याप्रमाणे मी लगेच मनातल्या मनात इच्छा मागुन मोकळा झालो. पुढे गेल्यावर आम्ही एका विहिरीपाशी आलो. तिथे एक चहाच्या विसाव्यासाठी झोपडी होती. तिथून झेंडा वाऱ्यामुळे जोरात फडकण्याचा आवाज येत होता. गाईडने सांगितलं आता वर फक्त २० मिनिटच आहे आणि वारा खूप वाटत आहे. थोडावेळ इथेच आराम करा. ४-४:३० वाजले असतील. झोपडीत बरीच बारदान, प्लॅस्टिक होते, त्यांचच अंथरुण बनवलं. आता थंडी जाणवु लागली होती. वाऱ्याचाही सुं-सुं आवाज येत होता. स्वेटर, हातमोजे, कानटोपी सर्व घातलं तरीही थंडी जाणवत होती. कशेबशे आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला पण थंडीमुळे झोप येत नव्हती. तसाच पडून राहिलो. पण कितीवेळ पडून राहणार, शेवटी बाहेर आलो. नुकतीच चंद्राची कोर पुर्व क्षितिजवर उगवली होती. मिचमिचणाऱ्या चांदण्यांमध्ये चंद्राची कोर उठावदार दिसत होती. थंडी तर जाणवत होतीच. बाकीचेही जागे झाले आणि बाहेर आले. सगळ्यांनी आजुबाजुला पडलेला पालापाचोळा आणि लाकडं गोळा करून शेकोटी पेटवली आणि अंगातली थंडी पळवायचा प्रयत्न केला. थोड्यावेळात पुर्व क्षितिजावर उजाडू लागलं. आम्ही गाईडला उठवलं आणि पुढची चढाई सुरु केली. शेवटची लोखंडी शिडी पार करून आम्ही शिखरावर पोहचलो.
शिखरावर पोहोचताच शरीरातला सगळा थकवा निघुन गेला. महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर होतो आम्ही. पुर्वेला आता लाली आली होती. सर्वत्र चांगला उजेड पडला होता. आमचं फोटोसेशन जोरात सुरु होतं. शिखरावर एक कळसुबाई मातेचं मंदिर होतं. आनंदाची गोष्ट म्हणजे शिखरावर फक्त आम्हीच होतो. शिखरावरुन एका बाजुला रतनगड, एका बाजूला भंडारदरा धरणाचं जलाशय तर एका बाजुला बारी गाव. सर्व परिसर पाहुन झाल्यावर एका ठिकाणी निवांत बसलो. समोर सूर्योदय होत होता. नाईट ट्रेकचा विचार अगदीच चांगला होता हे आता पटत होतं. सोबत आणलेली शिदोरी सोडुन थोडी पेटपुजा केली.  गाईडने आम्हाला परिसराची माहिती दिली. उजेडात दिसत होतो कि आम्ही नक्की किती उंचावर आलो आहोत आणि ते पाहुन स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. बराच वेळ शिखरावर घालवल्यावर निघायचं ठरलं. कळसुबाई मातेचं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. विहिरीवर परत  आल्यावर हातपाय धुतले. रात्री आसरा दिलेल्या झोपडीचे आभार मानुन पुढे सरकलो. प्रत्येक वळणावर आमच्या सर्वांची प्रतिक्रिया असायची "बापरे! आपण रात्री हे चढलो". एक तासानंतर आम्हाला पहिला ग्रुप वर चढताना दिसला. त्यांनी आम्हाला विचारलं, "आला पण वर जाऊन?". आम्ही अभिमानाने, "नाईट ट्रेक केलाआहे, रात्रीच वर पोहोचलो होतो". पुढे वर चढणारे ट्रेकर्स ग्रुप वाढत गेले. सर्वाना आम्ही गर्वाने सांगत होतो की आम्ही नाईट ट्रेक केला आणि कोणी आम्हाला विचारलं कि अजून किती वर जायचा आहे तर मुद्दामून त्यांना सांगायचो वेळ वाढवुन सांगायचो, "अरे अजून तुम्ही ३०%च वर आला आहात, अजून खूप वर जायचा आहे." तसे ते रागाने बघायचे.
बऱ्यापैकी खाली आलो तेव्हा वाटेतले सगळ्या चहाच्या टपऱ्या उघडल्या होत्या. एके ठिकाणी थांबुन पोहे खाल्ले आणि चहा मारला. थोडी तरतरी आली. त्यानंतर न थांबता खाली उतरलो. ११ वाजले असतील. गावात बरीच वर्दळ होती. रस्त्यावर आलो तेव्हा एक ट्रॅक्टर बाजूने जात होता. ट्रॅक्टरवर चढुन आम्ही भाऊंच्या घरी पोहचलो. आमचे गाईडसाहेब मागे गावातच थांबले होते. भाऊंनी आधीच जेवण तयार करून ठेवलं होतं. जेवणार ताव मारून आम्ही कसाऱ्याला जाणाऱ्या एसटीची वाट पाहत थांबलो. एसटीत चढलो आणि जे ताणून दिली ते कसारा आलं तेव्हाच डोळे उघडले. पाय आता दुखायला लागले होते. शुक्रवार संध्याकाळपासुन सकाळपर्यंत केलेली मजा आता चांगलीच बाहेर येत होती. कधी एकदा घरी पोहचतोय असा झालं होत. कसाऱ्यावरुन लोकल पकडली. कल्याणच्या पुढे ती तुडुंब भरली. गर्दीतून वाट काढून ठाण्याला उतरलो. ठाण्यावरुन नेरुळ लोकल पकडून घरी पोहचलो. छान अंघोळ केल्यावर बिछान्यावर पडताच झोपी गेलो.















मयुरेश मांजरे
+९१ ९८६८७५६३३०

कृपया ब्लॉग फॉलो करा