Sunday 15 August 2021

आमची पहिली रोड ट्रीप - २

 ह्याच्या आधीचा भाग -

https://mefirista.blogspot.com/2021/07/blog-post.html


रोहीडा टेन्ट कॅंम्प हे बाजारवाडीला गावाच्या थोड्या आधी रस्त्याला लागुनच टेन्ट मध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी मस्त ठिकाण.

संध्याकाळचा चहा नाश्ता झाल्यावर, आमच्यासमोरच पाच मिनिटात त्यांनी आम्हाला आमचा टेन्ट बनवुन दिला. बाहेरुन छोटा वाटत होता पण आत ४ जण आरामात झोपु शकत होते. आम्ही शुक्रवारी आल्यामुळे आमचाच ग्रुप तिथे राहयला होता. पण १०-१२ तंबु आरामात उभे राहतील एवढी प्रशस्त जागा. पार्कींगची उत्तम सोय, जेवण्यासाठी, बसण्यासाठी पक्क बांधकाम तसेच आंघोळीची आणि बाथरुमचीही ठीकठाक सोय.

कॅंम्पच्या मागेच छोटी टेकडी आहे तिथुन सुर्यास्ताचा छान आनंद घेता येईल असे आम्हाला सांगितल आणि तसही आता काही करण्यासारख नव्हत. आम्ही १०-१५ मिनिटाच्या छोट्या पायपीटीनंतर त्या टेकडीवर पोहचलो. टेकडीवर आम्ही चौघेच. एका बाजुला रोहीडा किल्ल्याचा डोंगर, एका बाजुला खाली आमचा टेन्ट कॅंम्प, एकीकडे सुर्य अस्ताला चालला होता आणि ह्या बाजुला मांढरदेवीचा डोंगर. फोटो काढण्यासाठी मस्त जागा आणि कोणाचाही त्रास नाही, पाहीजे तसे मस्त फोटो काढले. सोलो, ग्रुप, ह्या पोज मध्ये, त्या पोज मध्ये, पुर्ण अर्धा तास फोटो काढत बसलो. कामच काय होत. सुर्य जसाजसा क्षितिजावर आला आम्ही निवांत बसलो सुर्य अस्ताला जाईपर्यंत आकाशात बदलणारे रंग त्या टेकडीवरच्या शांततेत आरामात पाहत बसलो. पुढच्या ट्रीपची ही प्लॅनिंग सुरु केली. कुठे जाता येईल. तो पर्यंत सुर्य दिसेनासा झाला आणि टेकडी उतरलो.

आता काय करायचे म्हणुन चौकशी केली की गावात आजूबाजूला अजुन काही बघण्यासारख आहे का तर गावात एक जुनी कुस्तीची तालीम आहे कळल. माझ्यातला पैलवान जागा झाला. आम्ही दोघेजण तालमीत जायला निघालो. गावात गाडी शिरल्यावर दोन मुलांना विचारल तालमीत कस जायच, ते पण चांगले तब्येतीने पैलवानच दिसत होते, त्यांनी सांगितल. आम्ही पोहचलो तिथे पण तालमीला कडी.

बाजुच्याला एकाला विचारल तालमीत जाऊ शकतो का तर ते जा म्हणाले. कडी खोलुन आत शिरलो. जुन्या पारंपरिक तालमीला नवीन साज दिला होता. आतमध्ये जुन्या दगडी बांधकामात तालीम होती तर बाजुने वाढीव बांधकाम करुन व्यायामशाळेचे नवीन साहीत्य बसवले होते. म्हणजे गाव नक्कीच बलोपासनेचे काळजी घेणारे होते. तेवढ्यात आम्ही ज्या मुलांना तालमीत कस यायच विचारल ते पण तिथेच आले. तालमीतच येत होते ते. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. तालमीतला रस्सा बघुन मला ही राहवले नाही आणि मी पण २-३ वेळा रस्सा चढलो. कुस्ती केली नाही मात्र, उगाच फिरायला आलो आहे कशाला. तालमीचा एक विडीयो बनवला. छान वेळ गेला. दोन नवे मित्र ही बनले.

कॅंम्पला परतल्यावर चांगला अंधार पडला होता. आकाश निरभ्र, छान चांदण्याच्या प्रकाशात आम्ही चौघे बसलो (समजुन घ्या). बार्बेक्यु मागवलं होत, मस्तच. छान १:३०-२ तास गेले. जेवल्यावर आपल्या तंबुत आलो. तंबुत पडल्यावर कधी झोपी गेलो कळलही नाही.

दुसऱ्यादिवशी मस्त फ्रेश होऊन ट्रेक पण करायचा आहे.







विडीयो लाॅग

https://youtu.be/G80qEwMqQgU

3 comments: