४ दिवस, जवळपास ६०० किमीचा प्रवास, त्यात ट्रेकिंग, टेन्ट कॅम्पिंग, सह्याद्रीचा निसर्गाने नटलेला घाट,
धरणांचा जलाशय, स्वच्छसमुद्रकिनारा आणि शांत मंदिरे आणि पुर्ण धमाल
शेवटी आम्ही मित्रांनी आमच्या रोड ट्रिपसाठी मार्ग निवडला. पुर्ण देशभरातले पर्याय चाचपडुले. त्यामध्ये कन्याकुमारी, रामेश्वर, जयपुर, लोणार आणि १५ दिवसाच्या प्रवासापासुन सुरु करत शेवटी आपला महाराष्ट्रातलाच ३ दिवसाचा (नंतर तो ४ झाला) मार्ग पक्का केला.कन्याकुमारीच जवळपास ठरवलच होत आम्ही पण १५ दिवस?? बर ते पण चालेल पण आॅफिसच काय? मग म्हटल आपल जवळच ३ दिवसापासुन चालु करु मग हळुहळु वाढवु.
पहिला दिवस - नवी मुंबई ते बाजारवाडी
शुक्रवार सकाळी लवकरच नवी मुंबईवरून आम्ही चौघे निघालो. आमच्यातल्याच एकाची गाडी होती. आम्ही तिघांनी तर शुक्रवारी सरळसुट्ट्या टाकल्या होत्या पण एकाला सुट्टी नव्हती. काही हरकत नाही, वर्क फ्राॅम होम आहेच की मदतीला. आता ते वर्क घरुन करु किंवाप्रवास चालु असताना, काय फरक पडतो. काम झाल्याशी मतलब आणि तसही तो शिक्षक असल्याने त्याला त्याचे शुक्रवारचे फक्त दोनलेक्चर्स घ्यायचे होते. मग आम्ही लगेचच लोणावळ्यात आपला पहिला थांबा घेतला. एक चांगल हाॅटेल बघुन गाडी उभी केली, म्हणजेतो आपल लेक्चर गाडीत आरामात घेईल आणि आम्ही आपला नाश्ता करु. त्यातच पाऊसाला पण सुरुवात. डिसेंबर महिन्यात पाऊसम्हणजे काहीतरीच पण लोणावळा आणि पाऊस म्हणजे वाहवा! लोणावळ्याच्या सकाळच्या थंडगार वातावरणाचा आनंद लुटत नाश्ताझाला. त्यातच गप्पा गोष्टी रंगल्या, वेगवेगळ्या वेब सिरीजवर चर्चा त्यात वेळ असा निघुन गेला. त्याच एक लेक्चरही संपल. त्याचानाश्ता झाल्यावर अजुन उरलेल्या एका लेक्चरला अवकाश होता.
तिथुन पुढे आमचा कारवा निघाला. मग पुढचा मुक्काम परत एक्स्प्रेस हायवे संपल्यानंतर घेतला. पावसाच वातावरण पुण्यातही होतच. नाश्ता तर आधीच झाला होता तर मग चांगला गरम चहाचे झुरके घेत, आम्ही त्याच्या लेक्चर संपण्याची वाट पाहत बसलो.
हे त्याच शेवटच लेक्चर, आता काही काळजी नाही. आम्ही लोणावळ्याला असु तेव्हाच आम्ही जिथे टेन्ट कॅम्पिंगला रात्री मुक्कामीजाणार होतो त्यांनी चांगला एक नकाशाच पाठवला होता की वाटेत काय काय बघत येऊ शकतो. त्यात पहिला ठिकाण होत बनेश्वर वनउद्यान. पुणे सोडल्यावर खेड शिवापुर मग नसरापुर आणि तिथुनच आत ३-४ किमी वर बनेश्वर वन उद्यान.
वनक्षेत्र व वन्यजीव अभयारण्य मध्ये वसलेले भगवान शंकरांचे मंदिर. अगदी शांत आणि निवांत जागा. ह्याही आधी आम्ही चौघे तोरणाकिल्ल्यावर आलो होतो तेव्हा इथुनच पुढे गेलो पण आम्हाला तेव्हा ह्या वन उद्यानाची काही कल्पना नव्हती. ह्या उद्यानात बरेचसे पक्षी, फुले, वनस्पती आहेत. या मंदिराच्या तलावामध्ये लाल कानाचे आणि मऊ कवच असलेले कासव आहेत. मंदीराच्या चारही बाजुलावाहणाऱ्या पाण्याचे झरे आहेत. या भागात धबधबा देखील आहे परंतु कोविड मुळे तो बंद होता आणि वन उद्यान पण बंदच होत. फक्तमंदीर तेवढ दर्शनासाठी चालु होत.आम्ही महादेवांच दर्शन घेऊन मंदीर परिसर फिरुन बाहेर आलो. ह्या रोड ट्रीप पासुन मी व्हीलाॅगरव्हायच पण थरवल होत, चला करुन बघु हा पण प्रयत्न. तर तिथेच मंदीरात एक विडीयो पण शुट केला.
बर ह्या परिसराच बऱ्याच जोडप्यांनाही आकर्षण आहे बर का! आमची चौकस वृत्ती पटकन इकडे काय आहे बघु म्हणायची तर काहीजोडपे तिथे बसलेले डिस्टर्ब व्हायचे, ते तरी काय करणार. वन उद्यान बंद नाहीतर त्यांनाही जागेची काही कमी नव्हती मग.
तिथुन निघेपर्यंत दुपार झाली होती. पुन्हा एकदा मुख्य मार्गाला लागल्यावर कापुरहोळला छानसं हाॅटेल बघुन जेवण केल. बनेश्वरमंदीरात आधीच बराच वेळ घालवल्यामुळे मग आम्हाला पाठवलेल्या नकाशात असणाऱ्या प्रति बालाजी मंदीराचा बेत आम्ही रद्द केलाआणि भोरच्या रस्त्याला लागलो. कापुरहोळ - भोरच्या रस्त्यात नेकलेस पाॅईंटला मग आमची गाडी थांबली. हा पाॅईंट आता तर खुपचफेमस आहे. बऱ्याच सिनेमांमध्येही हा आता दिसतो. इथे नीरा नदीच्या पात्राला नेकलेसच्या आकारात वळण मिळाला आहे. फोटोकाढणाऱ्यांची तर नेहमीच गर्दी. तरी आम्ही शुक्रवारी आलो होतो म्हणुन त्यातल्या त्यात बर. तरीही आमच्या आधी आलेला एक ग्रुपमोक्याची जागा अडवुन बसला होता. त्यामुळे आमचे फोटो चांगले येत नव्हते. बराच वेळ थांबुनही ते काही तिथुन निघायच नाव घेतनव्हते. बर, आम्ही जिथुन फोटो काढत होतो तिथे त्यांनी ठेवलेल्या बॅगा आमच्या फ्रेम मध्ये येत होत्या. शेवटी मी बोललो की तुमच्या बॅगतरी काढा, तेव्हा कुठ जाऊन ते बाजुला झाले आणि आम्ही आमचे मनसोक्त हवे तसे फोटो काढले. त्यानंतर आमच्या मागचे मगआमच्या नावाने मनातल्या मनात ओरडत बसले असतील.
शेवटी मन शांत झाल्यावर आणि माझा विडीयो काढुन झाल्यावर आमच्या नकाश्यातला पुढचा स्पाॅट म्हणजे भाटघर धरण. त्याचरस्त्याने पुढे आल्यावर भाटघर धरणाचा बांध दिसतो पण नक्की गाडी कुठ लावायची आणि धरणाजवळ कस जायच ते काही कळेना. पुढून रस्ता असेल अस वाटल्यामुळे पुढ गेलो, तिथे गावात एकाला विचारल तर त्याने एक छोटा रस्ता दाखवला जो थेट जलाशया जवळजातो. जलाशयाजवळ पण एक चांगला फोटो शुट झाला.
पुढे मग आमच भोरच्या नगरपरिषदेच्या कमानीने स्वागत केल.
गुगल मॅप वर भोरचा राजवाडा टाकुन मॅप दाखवेल त्या भोरच्या गल्लीतुन आमची गाडी गेली. लोकेशन वर पोहचल्यावर समजल कीतिथेच नगरपरिषदेच कार्यालय पण आहे तर गर्दीच गर्दी. गाडीच्या पार्कींगची जागा शोधण्यात वेळ गेला पण एकदाची जागा मिळाली.
राजवाड्याच्या दरवाजातुन आत गेलो तर तिथे पण आज कुठल तरी शुटींग होत, त्याची आवारआवर चाललेली. आम्ही अजुन आत गेलोतर आम्हाला त्या राजवाड्याचा रखवालदार बाहेर काढायला लागला. ही खाजगी मालमत्ता आहे लोकांसाठी खुली नाही. पंत सचिवांचीपरवानगी आणा, मग आत जावा.
त्याला खुप मिन्रतवाऱ्या केल्या आणि आतमध्ये फोटो काढणार नाही ह्या बोलीवर त्याने ५ मिनिटासाठी आम्हाला आत सोडल. मस्तमोठा राजवाडा आहे. आत गेल्या गेल्या समोर मध्यभागी दगडी सिंहासन. चारही बाजुने खोल्या. आतमध्ये डावीकडे गेल्यावर परतमोकळी जागा ज्यात तुळशी वृंदावन. नंतर एवढ्या खोल्या आणि रस्ते की भुलभुलय्याच वाटु लागते. हा राजवाडाही आता शुटींग, लग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर मिळतो. बाजीराव मस्तानीचा शुट ही ह्याच राजवाड्यातला.
राजवाड्यातुन बाहेर आल्यावर मग आता चहाची तलफ झाली त्यातच टेन्ट कॅम्पिंग मधुन पण फोन येऊन गेला कुठ पर्यंत पोहचले.
भोर पासुन फक्त ७-८ किमीवर रोहीडा किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी गाव. आमचा रात्रीचा मुक्काम तिथेच होता. सरळ राजवाड्याच्या जवळच्या पार्कींगवरुन गाडी काढली आणि बाजारवाडीत पोहचलो आणि सगळ्यांनी मस्त गरमागरम कांदाभजी वर ताव मारला आणि चहाचे झुरके मारले.
No comments:
Post a Comment