Thursday 19 January 2017

मुंबई ते साऊथऍम्पटन - पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास

"पहली बार एक हि बार आता है और पहेला अनुभव बहोत स्पेशल होता है।" इंग्लिश विंग्लिश सिनेमातील हे अमिताभचे संवाद ऐकुन मला माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाची आठवण झाली. नवीन देशात  पहिल्यांदा एकट्याने प्रवास करायचा, तर एक अनामिक भिती, उत्सुकता सगळंच अनुभवलं होत.
नेहमीप्रमाणे ऑफिसचा दिवस सुरु होता. फक्त दिवस वेगळा पण वेळापत्रक तेच. फेसबुक, ट्विटर वर ज्यांनी कोणी पोस्ट बनवले आहेत रोज नवीन येणारा दिवस नवीन संधी घेऊन येत असतो त्यांना खरंच भेटुन विचारावा वाटतं.
दुपारी जेवून झाल्यावर पेंगुळलेल्या अवस्थेत काम करायचा सगळे आटोकाट प्रयत्न करत असतात. अश्याच एका दुपारी मी माझ्या कम्प्युटर समोर बसुन काहीतरी करत होतो. शुभ, माझा मॅनेजर कुठ्ल्यास्या मिटिंग मधून बाहेर आला आणि त्याच्या नेहमीच्या खास अंदाजात "अमित, मुझे एक बंधा चहिये, जिसको मेटलाईफ आता है।". अमित माझा लीड होता. दोन-तीन आठवड्यापुर्वीच त्याने माझी मेटलाईफ वर ट्रेनिंग सुरु केली होती. त्याने लगेच माझ नाव सांगितलं आणि मी चमकलो. शुभ अमितला मिटिंग रुम मध्ये घेऊन गेला आणि १०-१५ मिनिटे त्यांची काहीतरी चर्चा सुरु होती. अर्थातच मला अंदाज आला ही चर्चा माझ्याबाबतीतच सुरु आहे कारण माझं  नाव आल्यावरच ते मिटिंग रुम मध्ये गेले.
मिटिंग रुम मधुन बाहेर आल्यावर अमित डायरेक्ट माझ्याकडे आला
"युकेला जाशील काय?"
काय? खरंच? मी बरोबर ऐकलं ना? ५-१० सेकंड पॉझ. 
"हो" मी मागचा पुढचा विचार न करता बोललो. ह्या कंपनीत येऊन जेमतेम साडेचार महिनेच झाले होते. साडेचार महिन्यात माझ्या समोर ४-५ जण युकेला गेले होते. अजुन एक जायच्या तयारीत होता आणि ऑफिस मध्ये ४० जण, त्यातले बरेच आधीच जाऊन आले होते. त्यामुळे नाही म्हंटल तरी मनात येतच होत कि आपला नंबर कधी लागेल पण इतक्या लवकर लागेल अस वाटलं नव्हतं .
"ठीक आहे मग, अजुन बोलु नकोस कोणाला. मी सांगतो नंतर नक्की झालं की"
"किती महिने असेल?"
"३-४ महिने असेल"
"ठीक आहे"
अमित परत शुभ कडे निघून गेला. पण हे सगळं फ्लोअरवरच सगळ्यांसमोर झालं होत. सगळ्यांनाच अंदाज आला होता कि काय चालु आहे.
त्या दिवशी रात्री घरी गेल्यावर मम्मी- पप्पाना सांगितलं. कदाचित तीन महिन्यासाठी युकेला पाठवतेय कंपनी. ते ऐकुनच मम्मीच्या मनात धस्स. एकुलता एक मुलगा आणि ते पण इतक्या लांब, पहिल्यांदा. मागे ७ दिवसांसाठी हिमालय ट्रेकिंगला गेलो होतो पण ओळखीचा ग्रुप होता बरोबर. तेवढाच काय तो घरापासुन लांब होतो आणि आता तर चक्क सातासमुद्रापार एकट्याने. पण दोघांचा पाठिंबा होता.
ऑफिसमध्ये काही दिवस असेच गेले. मधेच एके दिवशी शुभ डेस्कजवळ आला
"तेरा अभी तक छह महिना पुरा नही हुआ है तो तुझे शायद नही भेज शकते, किसीने बताया क्या तुझे?".
"नही"
"ठीक है, बात करते है बादमे।" बोलुन  निघुन गेला. माझा तर सगळा मुडच निघुन गेला.
पुढे १५ दिवसांनी तर मी ज्या प्रोजेक्ट वर काम करत होतो तोच बंद झाला आणि प्रोजेक्ट टीम मधल्या प्रत्येकाला दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये हलवलं पण मी एकटाच बिना प्रोजेक्टचा. एकतर तो २००८ च्या मंदीचा काळ आणि ऑफिस मध्ये काहीही काम नाही. युकेची स्वप्न तर सोडाच, आहे तो जॉब ही जायचा. आधीच्या कंपनीतुन सुद्धा मंदीमुळेच बाहेर पडलो होतो. ह्या भीतीने अमितला विचारलं काय चालु आहे. माझ्याकडे काही काम नाही.
"अरे, तुझ युकेच चालु आहे ना"
"पण ते तर कॅन्सल झाल ना"
"नाही नाही, तुलाच पाठवणार आहोत"
"तो प्रोजेक्ट तर बंद झाला"
"तुला ज्या मोड्युल साठी पाठवत आहोत तो चालु आहे अजून. त्यात काम येणार आहे"
"कधी पर्यंत नक्की होईल?"
"तुझे ६ महिने कंपनीत पुर्ण होतील त्याच दिवशी व्हिसा प्रोसेसिंगला पाठवणार आहोत."
परत चेहऱ्यावर हुरुप.
अमितने ह्यावेळी सगळं समजावुन सांगितलं. माझं ऑफिस सॉल्सबरी शहरात असणार आहे. ३ महिन्यापूर्वी गेलेला वल्लभसुद्धा त्याच ऑफीसमध्ये आहे. त्याच्याशी माझं नेहमी प्रोजेक्टच्या कामानिमित्त बोलणं होत असत. चला म्हणजे कोणीतरी ओळखीचं बरोबर असेल. हे एकूण बरं वाटलं.
संध्याकाळी वल्लभशी पण बोलणं झालं. त्यालाही माहीत होतं मी तिकडे जाणार आहे. त्याने तिकडची थोडी कल्पना दिली. तो साऊथऍम्पटनला कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये राहतो आणि तिथुन रोज ट्रेनने सॉल्सबरीला जातो. प्रणाली, अजुन एक ऑफिस मधली मुलगी साऊथऍम्पटनलाच राहत होती. प्रणालीशीही माझी थोडीफार ओळख होती. 
थोडे दिवस असेच गेले. एव्हाना मी युकेला जाणार आहे हे ओपन सिक्रेट सगळ्यांना माहित झालं होत. सगळ्यांनी मला हळुहळु विचारायला सुरुवात केलं.
"कब जा रहा है?
"अरे! कुछ भरोसा मत कर जब तक प्लेन में ना बैठ जाये।"
हे सगळं चालु असताना मला आमच्या युकेच्या लंडन ऑफिसमधुन इमेल आला. त्यात कसलासा वर्कपर्मिट नंबर होता. तो व्हिसा प्रोसेसिंगला लागेल.
मला मुख्य टेन्शन होतं ते व्हिसा प्रोसेसिंगचा. व्हिसा मुलाखतीत काय विचारतात? मुलाखत क्लिअर होईल का? अमेरिकन व्हिसा प्रोसेस कडक असते आणि ते मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारतात हे मला माझ्या आधीच्या कंपनीमुळे माहीत होत. तिकडे माझ्या समोर मुलाखतीला गेलेल्या २-३ जणांना व्हिसा नाकारला होता. मी अंदाज बांधला युकेचा पण तसच काहीतरी असेल आणि त्याच विचारांनी मला टेन्शन आलेलं.
व्हिसा मुलाखतीची तारीख आली. आदल्या दिवशी अमितला जाऊन विचारलं मुलाखतीसाठी काय तयारी करायची. तो बोलला "कसली मुलाखत, वर्कपरमिट आहे ना, फक्त बायोमेट्रिक असतं." मला त्यावेळी बायोमेट्रिक म्हणजे काय हे ही माहित नव्हतं.
व्हिसा ऑफिसला दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी आत सोडलं.  आतमध्ये बघतो तर विचार केला त्यापेक्षा सगळ उलट. मला वाटल होत काउंटरच्या पलीकडे इंग्लिश बाबु असतील तर इथे सगळे देशी जनताच. एका काउंटर वर माझी सगळी कागदपत्रं तपासली आणि जमा करून घेतली. मग पुढच्या काउंटर वर पाठवलं. तिथे एका कम्पुटर वर कॅमेरा आणि समोर स्कॅनिंग मशीन होती. तिथे माझा फोटो काढला आणि फिंगरप्रिंट्स स्कॅन केले. बस एवढंच. जेमतेम २०-२५ मिनिटात काम झालं. हे तर खुप सोपं आहे. उगाच टेन्शन मध्ये होतो.
आता फक्त वेट अँड वॉच. १ आठवडा झाला, २ झाले तरी काही नाही.
ह्यावेळेत मम्मी-पप्पानी गावी जाऊन यायचा बेत आखला. त्यावेळी कोणाचं तरी नात्यात लग्न ही होत.  जायच्या आधी गावी सगळ्यांशी भेट होईल आणि कुलदैवत निमगावच्या खंडोबाचं दर्शनही होईल. काकांना मी बाहेरगावी जाणार हे कळताच अभिमानाने लग्नाच्या मंडपातच जो समोर येईल त्यांना सांगु लागले.  काहींनी तर मम्मीला "एकुलत्या एक मुलाला कस गं एवढ्या लांब पाठवतेस?"

परत आल्यावर मी ऑफिस मध्ये आधी युकेला जाऊन आलेल्याना त्रास देऊ लागलो. तुमचा व्हिसा किती दिवसात आला होता.
प्रत्येकाचं वेगवेगळ उत्तर
"मेरा तो एक हप्ते में आ गया था"
" सब डॉक्युमेंट बराबर दिया था ना, अगर कुछ छुट गया होगा तो व्हेरीफिकेशन के लिये टाइम लगता है।"
"अरे आता सुट्टीचा सीजन आहे म्हणुन वेळ लागत असेल"
शेवटी ३ आठवडे झाल्यावर व्हिसा स्टँम्पड पासपोर्ट माझ्या हातात आला. अमित आणि शुभने तर लगेच ३ दिवसानंतरची तिकीट बुक करायचं ठरवलं. मी बोललो काहीच तयारी नाही आहे. पॅकिंग करायला किती वेळ लागतो. तर त्यांचं उत्तर, "आधीच उशीर झालाय अजुन नाही करु शकत."
बापरे! व्हिसा आल्यावर एवढ्या लवकर चक्र फिरतील असा विचारही मी केला नव्हता. माझा अंदाज होता व्हिसा आल्यावर १०-१२ दिवसांनी जावं लागेल पण हे तर लगेच ३ दिवसांनी. दुसरा बॉम्ब हा फुटला माझ्यावर कि मी जेव्हा युकेला पोहचणार त्यावेळी वल्लभ सुट्टीसाठी भारतात येणार आहे.  म्हणजे तिकडच्या ऑफीसमध्येही कुणी ओळखीच नसणार. बघु आता काय होत ते.
युकेच्या ऑफिसमधुन ईमेल आला, कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये राहणार आहे की स्वतः बघणार आहे. पहिलीच वेळ आहे, आपली कंपनीची गेस्ट हाऊसच बरी. सॉल्सबरीला जरी ऑफिस असलं तरी गेस्ट हाऊस मी साऊथऍम्पटन मध्येच मागितलं. तेवढीच वल्लभ आणि प्रणालीची सोबत होईल. 
ऑफिस मध्ये मित्रांनी सल्ले द्यायला सुरुवात केली. एकाने "अभी तो वहा गर्मी होगी, जॅकेट कि जरुरत नही होगी. उधर ही जाके ले लेना, सस्ता भी होगा।" ह्या उलट वल्लभ, "उतरल्या उतरल्या थंडी लागेल खुप मग काय करशील, जॅकेट घेऊन ये." 

त्यादिवशी घरी तर सावळा गोंधळच. बॅगपासुन सगळीच तयारी करायची होती. एक तर जवळच्या माहितीतलं  कोणी नव्हत की ज्याने परदेशवारी केली आहे. त्यामुळे घरी हा अनुभव नवीन होता. काय काय न्ह्यायचं ह्याची जमेल तशी लिस्ट बनवली. यादीत सर्वात आधी भांडी आली. भारतीय परदेशात जाताना भांडी बरोबर नेतातच कारण भारतीयांचे पदार्थ बनवायला भारतीय भांडीच पाहिजेत असा समज. त्यात सर्वात आघाडीवर होत ते कुकर. ऑफीसमध्ये ही सगळ्यांनी कुकर घेऊनच जा सांगितलेलं. त्यानंतर 'उल्हातन' कारण तिकडे चपात्या कोणी बनवत नाही मग उल्हातन कुठून भेटणार. तव्यासाठी आम्ही विचार केला कि तिकडे ऑम्लेट तर बनतोच म्हणजे तवा भेटेल. अजुन बऱ्याच भांड्यांवर चर्चा केली पण एवढ्यावरच यादी संपवली. आम्हाला जे गेस्ट हाऊस देतात ते पुर्ण फ़र्निशड असणार होत आणि त्यात सगळ्या दैनंदिन वापरातल्या घरातल्या सर्व गोष्टी असणार होत्या. भांडी झाल्यानंतर खाण्याचे पदार्थ. मॅगी, तांदूळ, चहा पावडर, साखर, मसाले, लोणच....... आणि हि यादी वाढतच गेली. तिकडे भारतीय दुकाने असतात ज्यात हे सगळं मिळत पण विमानातुन उतरल्या उतरल्या काय शॉपिंगला जाणार आहेस का? पहिल्या दोन आठवड्याचं सामान तरी राहुदे. त्यानंतर कपडे, इतर सामान करत करत यादी एकदाची तयार झाली.

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला आणि मम्मी-पप्पायादीतील सामान खरेदीला. ऑफिसमध्ये कुठल्या वेळेचं विमान घ्यायचं ह्याच्यावरुन खलबत सुरु होती. दुपारच्या विमानाची तिकीट कंपनीच्या दृष्टीने फायदेशीर होती जी लंडनला ५ वाजता पोहचणार होती. तिथुन मला साऊथऍम्पटनला जायच होत, जे विमानतळावरुन ३ तासावर. म्हणजे जाईपर्यंत रात्रीचे १० वाजले असते. मी थोडासा चेहरा पडला. शुभने लगेच हेरलं, "तुझे कोई खा नाही जायेगा रात के १० बजे, इधर १२-१२ बजे तक घुमता है ना।". ह्याच्यावर मी पुढे काही बोललो नाही. तेच तिकीट कन्फर्म झालं.
विमानतळावरुन साऊथऍम्पटनला कसं जायचं ह्याच्यासाठी शेफाली मदतीला धावुन आली. शेफाली ऑफीसमध्ये नवीनच आलेली. ती मुख्य म्हणजे एचआर आणि ऍडमिनची कामं बघायची. माझं तिकीट, फॉरेक्स ह्याची सगळी जबाबदारी तिच्यावरच होती आणि ती सुद्धा हे सर्व पहिल्यांदाच करत होती. तिने अस्मिताला फोन लावुन विमानतळ ते साऊथऍम्पटन प्रवासाची माहिती विचारली. अस्मितापण नुकतीच कंपनीतर्फे युकेला गेली होती.  विमानतळावरुन नॅशनल एक्स्प्रेस बस तिने घ्यायला सांगितली. वेळापत्रक वेबसाईट वर आहेच. आम्ही दोघांनी वेळापत्रक बघितलं आणि कुठली बस भेटेल ह्याचा अंदाज घेतला. 

मम्मी-पप्पानी घरी सगळी शॉपिंग करून ठेवली होती. आता बॅग मध्ये सामान लावणं सुरु होतं. एवढी यादी बनवली असतानाही ऐनवेळी काहीतरी आठवायचं आणि मग ते सुद्धा टाकायची घाई. बॅग आता बऱ्यापैकी पॅक झाली.

ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी आमच्या डिपार्टमेंटचे हेड अनिल जोशींनी मला विचारलं, "ह्या आधी कधी विमानाने प्रवास केला आहेस का?"
"एवढ्या लांब नाही, लहानपणी औरंगाबादला गेलो होतो एकदा"
ते मला मिटिंग रूम मध्ये घेऊन गेले. विमानतळावर गेल्यापासुन ते तिकडे विमानतळावरुन बाहेर येईपर्यंतची पुर्ण प्रोसेस सविस्तर समजावुन सांगितली. कुठे बॅग चेकइन करायची, कुठे सिक्युरिटी चेक, विमानात ९ तास कसे घालवायचे इथपासुन ते विमानातुन उतरल्यावर इमिग्रेशन, बॅगेज क्लेम सगळं सगळं. त्यानंतर मला तिकडे किती पगार असेल, त्याचं नियोजन कसं करायच तेही. गेस्ट हाऊसच भाडं अमुक अमुक जाईल, मग ट्रेनचा पास, खाण्या-पिण्याचे एवढे जातील मग एवढे शिल्लक राहतील. त्यांनी आणखी एक गोष्ट बजावली ती म्हणजे तिकडे खर्च करताना भारतीयांच्या डोक्यात कॅलक्युलेटर चालु असतो. १ पौंड = ७० रुपये तो बंद ठेवायचा प्रयत्न कर. हे सगळं ऐकुन थोडा धीर आला.
वल्लभने ही मला फोन करून ऑफिस मध्ये पहिल्या दिवशी कोणाला भेटायचं आणि साऊथऍम्पटनवरुन सॉल्सबरीला जाण्यासाठी कुठली ट्रेन घ्यायची ह्याची सगळी माहिती दिली. त्याने एक सविस्तर इमेल सुद्धा पाठवला ज्यात हि सगळी माहिती त्याने टाईप केली होती. 
फॉरेक्स, तिकीट, कंपनी लेटर सगळं पुन्हा पुन्हा निघायच्या आधी बरोबर घेतलंय ह्याची खात्री केली. सर्वांना एकदा भेटुन घेतलं आणि ऑफिस सोडलं.
घरी पण सर्व तयारी अंतिम टप्प्यात होती. बॅगवर पुन्हा एकदा नजर टाकली. प्रवासात लागणारी कागदपत्रे हाताशी असतील अशी ठेवली. झालं आता उद्या पहिल्यांदा विमानाने राणीच्या देशात.

क्रमशः

मयुरेश मांजरे
+ ९१ ९८६९७५६३३०

कृपया उजवीकडील फॉलो बटन क्लिक करा.
आपला अभिप्राय  खाली नोंदवा. 

19 comments:

  1. Too good Mayuresh!!! Typical Capita way of sending onshore :P

    ReplyDelete
  2. सुरेख! फारच फारच छान! लेख वाचताना तुझ्या ऑफिसमध्ये बसून हे सगळं पाहतोय असं वाटलं. सहज भाषेचा हा परिणाम! -Nitin Ashtekar

    ReplyDelete
  3. Well written Mayuresh! I enjoyed reading every bit of it.... :)

    ReplyDelete
  4. Superb,I was like why it ended...for me it's best blog compared to your other blog..keep it up.

    ReplyDelete
  5. Pudhcha blog hawa mitra...This was too good...Hope I get the next one asap

    ReplyDelete
  6. Very nice mayuresh.. Keep it up

    ReplyDelete
  7. Superb, it was nice blog. Keep writing.....

    ReplyDelete
  8. मस्तच मित्रा.. सुरुवात छान आहे.. अजून खूप लिहायचय तुला आम्हा रसिकवाचकांसाठी!!

    ReplyDelete
  9. Hi Mayuresh,
    Do you remember me ? How are you dear? You are a very good writer. Please continue this hobby. I felt so interesting while reading it.

    ReplyDelete
    Replies
    1. Yes, How can I forget. Thank you for your comment. Yes I have started writing again. I will try to reach you through surya

      Delete