Sunday, 12 April 2015

अष्टविनायक

गेले २-३ वर्षे माझ्या मनात अष्टविनायकाला जाण्यची इच्छा होती पण ह्या न त्या कारणामुळे नेहमी लांबत चाललेली होती. शेवटी मनाशी सगळ्यांनी निश्चय करुन एक शनिवार-रविवार निवडला.  जवळचे ठराविक आप्तेष्ट आणि मित्रपरिवारांना विचारले आणि आम्ही सगळे मिळुन १५ जण ट्रिप साठी तयार झालो. मग मिनी बस करून जायचं ठरल.
शनिवारी पहाटे ५ ला निघायचे ठरले होते. आम्ही सगळे वेळेवर उठुन तयार झालो. ड्रायव्हरला फोन लावला तर तोही इमारती खाली येऊन आधीच हजर होता. भराभर आम्ही खाली उतरलो आणि आज्जीने खणखणित आवाजात गणपती बाप्पा ची साद दिली, सगळ्यानी मोरया म्हणत प्रतिसाद दिला आणि आमची बस निघाली. वाटेत बाकीच्या मंडळींना घेऊन आमच्या बसचा प्रवास आमचा पहिला गणपती महड गावच्या वरदविनायकाच्या दिशेने सुरु झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस हाईवेवरुन बस सुसाट निघाली. आता चांगल उजाडल होत. बस जुन्या रस्त्यावर येताच मी थोडा टाइमपास म्हणुन आजुबाजीची माहीती देऊ लागलो. कर्नाळा किल्ल्याचा सुळका, माथेरानचा डोंगर, मोरबे धरण जे रस्त्यावरुन दिसत होते. बस महडला पोहचताच सगळयाना जसे इतर टुर वाले देतात तशी अर्ध्यातासात परतण्याची उगाचच सुचना दिली. मंदिरात फारसी गर्दी नव्हती. दर्शन झाल्यावर परतताना एक ग्रुप फोटो काढला. अष्टविनायकाच्या गणपतींचा महिमा जाणुन घेण्यासाठी एखादे पुस्तक घ्यावे ह्या निमित्ताने दुकानात घुसलो. पण प्रत्येक गणपतीची कथा एका पानाचीच होती. मग मी आणि माझ्या पत्नीने ते विकत घेण्याऐवजी २-३ पानांचे मोबाईलवर फोटो काढले. सगळे बस मध्ये परतल्यावर 'गणपती बाप्पा मोरया' करताच आमची बस पुढच्या गणपतीला म्हणजेच पालीच्या बल्लाळेश्वरच्या दर्शनाला निघाली.
पालीला पोहचायला १ तास होता. मी पुन्हा काहीतरी टाइमपास म्हणुन गाईडच्या भुमिकेत शिरलो. महड आणि पालीच्या गणपतीची माहिती मघाशी काढलेल्या फोटोंमधुन वाचली. सर्वाना ही माहिती जसे टुर गाईड सांगतात तशी कथेच्या रुपात सांगितली. असाच टाइमपास करत पालीला पोहचलो. इथेही गर्दी नव्हती.आरामात दर्शन झाल. भुकही जाम लागली होती. मंदीराजवळच्या एका हॉटेलात भरपेट नाश्ता झाला. आता पुढचा पल्ला बराच लांबचा होता. तो म्हणजे थेऊर गावचा चिंतामणी. नाश्ता आणि सकाळी लवकर उठलेले मग आता सगळेच सुस्तावलेले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराबरोबर बसने वेग धरला आणि आम्ही डुलक्या काढु लागलो.
दुपारी २ च्या सुमारास आम्ही थेऊरला पोहचलो. नाश्ता करून बराच वेळ झाला होता आणि परत चांगलीच भुक लागली होती. बसमधुन उतरल्यावर कळाले कि प्रसाद भोजनाची सोय २ वाजेपर्यंत असते. मी पळत जाऊन बघितल तर ते म्हणाले अजुन चालु आहे बसुन घ्या. आधी दर्शन करून घेतो म्हणालो तर ते म्हणाले बंद होईल, जेवा मग दर्शनाला जा. आम्ही पण मग आधी पोटोबा मग विठोबा ह्या विचाराने प्रसादाचा आस्वाद घेतला आणि दर्शनाला गेलो. पेशव्यांचा प्रभाव मंदिराच्या रचनेतुन ठिकठिकाणी जाणवत होता. इथेही दर्शन छान झाल. दर्शनानंतर आम्ही पेशवे माधवरावांच्या पत्नी रमाबाई ज्या सती गेल्या होत्या त्यांची समाधी पाहायला गेलो. मंदिरापासुन १० मिनिटांवर आहे. तिथुन पुढे आम्ही मोरगावला निघालो. वाटेत मी सगळ्यांना थेऊर आणि मोरगावची कथा सांगितली. गणपती बाप्पा मोरया करत मोरगावची वाट पाहु लागलो.
मोरगावला थोडी गर्दी होती कारण जेजुरी जवळच आहे आणि जेजुरीला येणारे भाविकसुद्धा मोरगावला येतातच. रांगेत अर्धा तास गेला पण दर्शन मनसोक्त करता आल. रेटारेटी, ढकलाढकली असा प्रकार तरी नव्हता. मंदिराच्या परिसरात पुजा, आरत्या चालु होत्या. काही टुर ग्रुप हे करत होत. मंदिराबाहेर आल्यावर नेहमीचा ग्रुप फोटो काढला. आता सगळ्यांना चहाची तलप लागली होती. मस्त गरमागरम चहा झाल्यावर आम्ही दिवसाच्या शेवटचा गणपती सिद्धीविनायकाच्या दर्शनाला म्हणजेच सिद्धटेकला निघालो.
पुर्वी सिद्धटेकला जायचा म्हणजे होडीने नदी ओलांडायची आणि सगळ्यांना ह्याच नक्कीच कुतूहल असायच पण आता नदीवर पुल झाल्यामुळे गाडी मंदीराच्या दाराशी थेट जाते. इथे पोहचेपर्यंत तर अंधार पडला होता. मंदीरात कोणीच नव्हते. डोळेभरुन दर्शन घेता आल. दर्शनानंतर कुठे राहयची चांगली सोय आहे का ह्याची शोधाशोध सुरू केली. जवळच एका लॉज मध्ये सोय झाली. रात्रीची आरती मिळाली. त्यानंतर जेवण मस्तच झाल. गरमागरम भाकरी, बटाटा, डाळभात. आपल्या भाषेत म्हणायच तर मराठमोळ बफेट जेवण फक्त ९० रूपयात. एवढ करून आजचा दिवस संपवला.










 
#अष्टविनायक #महड #वरदविनायक #पाली #बल्लाळेश्वर #थेउर #चिंतामणी #मोरगाव #मयुरेश्वर #सिद्धटेक #सिद्धिविनायक 
#Ashtvinayak #mahad #varadvinayak #pali #ballaleshwar #theur #chintamani #Morgaon #Mayureshwar #siddhatek #Siddhivinayak
 

No comments:

Post a Comment