१५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिवस! अमेरिकेतही हा दिवस अगदी दणक्यात साजरा केला जातो. इंडिया डे ह्या नावाने परेड काढले जातात. आमचा जय भारत ढोल ताशा पथकही सगळ्या परेड मध्ये मागच्या वर्षी प्रमाणेच ह्या वर्षीही सहभागी होणार होता. मी मागच्या वर्षीच्या परेड मध्ये जय भारत ढोल ताशा पथक बघितला होता. खरच कौतुकाची गोष्ट होती, सातासमुद्रापार आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न आणि ते सुद्धा मराठमोळ्या ढोल ताशा लेझीमलाअमेरिकेच्या मातीत रुजवण्याची मेहनत. मी त्याच दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर जय भारत ढोल ताशा पथकाच्या फेसबुक पेजवर मेसेज सोडला. थोड्या दिवसांनी तिथुन रिप्लाय आला आणि मी, माझी सुरेल दोघेही पथकाचे सदस्य झालो.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासुनच पथकाचा परेडसाठी सराव सुरु केला. बरेच नवीन मंडळी पथकात रुजु झाली होती. त्यातल्या बऱ्याच जणांना पुण्यातल्या ढोल पथकातला अनुभव होता. ह्या अनुभवाचाही खूप फायदा आम्हाला सरावाच्या वेळी झाला. पहिली परेड होती ती ओक ट्री रोड, न्यु जर्सीची.
सगळ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी ठिक ११ वाजता पोहचायच ठरवलं. मी घरापासुनच पिकअप मिळवला कारण आमच्या सुरेलने घरातुनच नऊवारी नेसुन घेतली होती. जय भारत ढोल ताशा पथकाचा आजचा ड्रेस कोडच तसा होता. लेझीम खेळणाऱ्या मुली नऊवारीत तर ढोल-ताशा वाजवणारी मंडळी सफेद कुर्त्यात आणि त्यावर केशरी शेला. अमेरिकेतल्या रस्त्यावर ती नऊवारीत आणि मी कुर्त्यात चालत जायचे म्हणजे विचार करायलाच नको म्हणुन घरातुनच पिकअप बरा.जो पिक करायला येणार होता त्याला मी सांगितलं (तस मला पण अजुन कोणीतरी सांगितल होतं), रविवार आहे रस्त्यावर गर्दी असेल तर जरा लवकरच निघ. तो अगदी सांगितल्या वेळेवर हजर झाला. रस्त्यात अजुन एकाला पिक करून आम्ही पुढे निघालो. आयफोन मधला जीपीएस ३४ मिनिटात पोहोचु अस सांगत होता म्हणजे जवळपास पाऊण तास आधीच आम्ही पोहचणार होतो. एवढ्या लवकर जाऊन तिथे काय करायचं म्हणुन म्हंटल बरेच दिवस विमानतळावर चक्कर मारली नाही, चला मारून येऊ (आम्हीच विमानतळावर जाणाऱ्या रस्त्यावर गाडी स्वखुशीने घातली, ह्यात आयफोनच्या जीपीएसचा काहीच दोष नाही,त्याने आम्हाला बरोबर रस्ता दाखवला नाही म्हणून आम्ही रस्ता चुकलो असा समज करू नये). १५ मिनिटे आमचा चांगला टाईमपास झाला. एवढ करूनही आम्ही अर्धा तास आधीच पोहचलो. नेहमी प्रमाणे सर्वांच्या आधी.
भेटायच्या स्पॉटवर पोह्चायच्या थोड्या आधी आमची गाडी परेड जिथुन जाणार होती त्या रस्त्यावरून आली. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या खांबांवर भारतीय झेंडे बांधले होते. अर्थात अमेरिकन झेंडेही सोबतीला होते पण कुठेतरी आपले झेंडे फडकताना दिसले हे पाहुन अभिमान वाटला. नाहीतर भारतात राष्ट्रध्वजापेक्षा लोकांना राजकीय पक्षाचे झेंडेच जास्त प्राणप्रिय असतात. गाडी पार्किंग मध्ये पार्क करून बाकीच्यांची वाट पाहु लागलो. आम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. लगेचच पथकातले एक एक करून सगळे ढोली, ताशाकरी येऊ लागले. परेडच्या आधीच्या कामांनी गती घेतली. ज्यांच्याकडे कुर्ता नव्हते त्यांना कुर्ता वाटप, शेला, बॅच वाटप चालु झालं. गाडीतुन ढोल उतरवणे, ज्या ढोलचा आवाज उतरला आहे त्यांना बांधणे अशी काम चालु होती. हे सगळं करे पर्यंत १ वाजला. सगळ्यांनी थोडफार आजुबाजुच्या हॉटेलात नाश्ता करून घेतला. खायची काही इच्छा नव्हती पण काहीतरी ज्युस किंवा लस्सी प्याव म्हणून मी आणि माझी सुरेल सुद्धा हॉटेलात गेलो. माज्याकडे रोकड फक्त ७ डॉलर होती. दुकानदाराला सांगितलं तेव्हा त्याने २ लस्सी ७ डॉलरला देऊ केली जी एक लस्सी ४ डॉलरला होती.
सगळे तयार झाल्यावर ग्रुप फोटो झाले. माझा कॅमेरा मी पथकात आजच नवीन आलेल्या एका मुलाला दिला. ग्रुप फोटो काढत असताना आम्ही चक्क रस्ता ५-६ मिनिटे रोखुन धरला होता. फोटोसेशन झाल्यावर प्रत्येकजण एक एक ढोल उचलू लागला. एकाची पाठ दुखत असल्यामुळे तो बोलला कि त्याला छोटा ढोल द्या पण वाजवणारे लोक जास्त आणि ढोलची संख्या कमी असल्याने त्याने त्याचा ढोल दुसऱ्याला देऊ केला. सगळे आपापले ढोल घेऊन परेडच्या सुरुवातीला हजर झाले. ढोल कमरेला बांधून शिस्तबद्धपणे आम्ही रांगेत उभे राहिलो. शेले चढवले. जय भारत ढोल ताशा पथकाचा नंबर लगेचच होता. जसजसा आमच्या पथकाचा नंबर जवळ येत होता, सगळ्यांची उत्सुकता वाढत होती.
आम्हाला परेड मध्ये जाण्याचा सिग्नल मिळाला तसं सगळ्यांनी एका सुरात 'वक्रतुंड महाकाय… ' ह्या गणेशवंद्नेवर ठरलेला पथकाचा ताल ढोल-ताशावर उचलला. एकदम जीव तोडुन सगळ्यांनी ढोल-ताशांचा कडकडाट केला. परेड बघायला आलेल्यांच लक्ष आम्ही पुर्णपणे आमच्याकडे खेचुन घेतलं. गणेशवंदना झाल्यावर आम्ही गजर सुरु केला आणि त्यानंतर पथकाची पहिली ताल. पथकातल्या लेझीम खेळणाऱ्या मुलींनीही तालावर चांगलाच ठेका धरला होता. मी सुद्धा अगदी सर्व शक्तीनिशी ढोल वाजवत होतो पण ढोल तेवढी शक्ती सहन करायला तयार नव्हता. तो ढोल ५-६व्याच बीट वर फाटला. काय हे अजून पूर्ण परेड व्हायची आहे आणि ढोल सुरुवातीलाच फाटला. तरीही माझा उत्साह कमी झाला नाही, मी तसाच परेड मध्ये चालू लागलो. ढोल उलट्याबाजूने वाजवायचा प्रयत्न केला पण डाव्या हाताने वाजवायला जमत नव्हत. थोडा पुढे गेल्यावर मग ढोल सोडुन उलटी बाजू उजव्या हातावर घेतली आणि मग धमाल सुरु केली. आम्ही सगळे जण पहिली ताल वाजवत होतो. पहिली ताल वाजवत असताना मध्येच जोरात ओरडत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असणारे लोकं आमचे फोटो काढत होते. ढोल- ताशाच्या तालावर तेही जागेवर नाचत होते, आम्हाला प्रोत्साहन देत होते. थोडावेळ पहिली ताल वाजवून झाल्यावर दुसरी ताल उचलली. ताल वाजवत वाजवत पथक पुढे सरकू लागली.
रस्त्यावर ऊन खूप होत. शरीरातुन घामाच्या धारा वाहत होत्या. तरीही थकवा जाणवत नव्हता. थोडा पुढे गेल्यावर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल्सनी आम्हाला स्वतःहुन पुढे येउन पाणी, सरबत देऊ केलं. चालता चालता रस्त्यावर सावली आली कि असा वाटायचा कि तिथेच उभं राहवं. मध्ये मध्ये परेडचे आयोजक पथकात येऊन नाचत होते, टाळ्या वाजवुन प्रोत्साहन देत होते. थोडं अजून पुढे गेल्यावर थ्री इडियट मधला चतुर अर्थात ओमी वैद्य जो मुख्य पाहुणा होता तो पथकात येऊन नाचून गेला. परेड अर्ध्या रस्त्यात आल्यावर काहींनी ढोलची अदलाबदल केली. सुरुवातीला ज्याची पाठ दुखत होती म्हणून त्याने ढोल दुसऱ्याला देऊ केला तो आता मोठा ढोल वाजवत होता. हि सगळी परेड मधल्या उर्जेची करामत. ज्यांनी ढोल इतरांसाठी सोडला ते झांज वाजवू लागले. एक भगवा झेंडा नाचवू लागला.
जसजस पथक पुढे जात होत तसतशी रस्त्यावरची गर्दी वाढत होती त्यामुळे परेड मधली रंगतही. ढोल वाजवत पुढे जाताना एखादा सेलिब्रिटी असल्यासारख वाटत होत. लोकांच्या टाळ्या, प्रोत्साहन देण्यासाठी ओरडणे, फोटो काढणे, एकदम मज्जा. मध्येच १-२ मिनिटांची थोडीशी विश्रांती पुन्हा १०-१५ मिनिटे वाजवणं, वेगवेगळे ताल अस करत करत आमचा पथक परेडच्या मुख्य स्टेज जवळ आला. स्टेजवर बरेच सेलिब्रिटीज होते ज्यात ईशा देओल, ओमी वैद्य आणि काही भारतीय हिंदी कार्यक्रमातील कलाकार यांची मांदियाळी होती. ओमी वैद्यला आम्हाला बघून पुन्हा स्फुरण चढल आणि मराठीत बोलु लागला. काय बोलला ते मला ढोलच्या आवाजात ऐकु नाही आल पण बोलला. स्टेजच्या पुढे गेल्यावर परेड संपली. लगेचच आमचा स्टेजवर कार्यक्रम होता.
स्टेजवर कुठली ताल वाजवायची आणि क्रम कसा असेल हे ठरवत असताना 'इंद्र जिमी…' हे राजा शिवछत्रपतींचा गाणं सादर करायचं ठरवलं आणि सगळ्यांच्या नजरा माज्याकडे वळल्या कारण ते माझं अजुनही पाठ होतं. ३ महिन्यापूर्वी हेच महाराष्ट्रदिवसाच्या कार्यक्रमात आमच्या पथकाने सादर केल होत आणि आता त्याला बरेच दिवस झाले होते. अरे पण काळजी करायच कारण नाही, एखादी गोष्ट माझ्या डोक्यात उतरली कि ती सहजासहजी विसरत नाही आपण. (बदाम खात जा रोज, धन्यवाद आमच्या मांसाहेब आणि सुरेल). तिथल्या तिथे २-३ वेळा पटकन उजळणी केली आणि खात्री करून घेतली कि सर्व काही आठवतंय. स्टेज जवळ गेलो, तिथे खूपच गोंगाट चालु होता, मनातल्या मनात परत गाणं गुनगूनू लागलो तर मला तिथे दुसरी ओळच आठवेना, अरे आत्ता ५ मिनिटांपूर्वी पुर्ण गायलास आणि आत्ता आठवत नाही. पथकातल्या जवळच उभे असलेल्या मुलींना विचारल आणि त्यांनी दुसरी ओळ सांगितली आणि पुन्हा पुर्ण गाण्याची जोड लागली. घाबरलो होतो तेवढ्या वेळात.
स्टेजवरचा कार्यक्रमही उत्तमरित्या व्यवस्थित पार पडला. त्यानंतर मुलींनी लावणीवर नृत्य केलं. सर्वांनी भरभरून टाळ्या दिल्या. ओरडून ओरडून माझा घसा चांगलाच बसला होता. हाताकडे लक्ष गेला तर कळल कुठेकुठे हातही फोडुन घेतला आहे. बोटांच, पायाच दुखणं हि आता जाणवू लागला होता. गेले ३ तास कमरेला बांधून ठेवलेला ढोल सोडल्यावर थोडसं हायसं वाटलं. आयोजकांनी ठेवलेला अल्पोपहार केला. ह्यावेळी ज्याची गरज होती तो चहा मिळाल्यामुळे अंगात थोडी तरतरी आली.
परत निघताना जो कोणी भेटत होता तो आमचं अभिनंदन करायचा. खूप छान वाजवल, सुंदर काम केलत, हे एकूण तर अंगात आलेली मरगळ एकदम गायब झाली. परेडच्या सुरुवातीला वाटलेले शेले, बॅचेस परत करण्याची कामं सुरु झाली. एकापाठोपाठ एक गाड्यामध्ये ढोल चढवले आणि सगळे जण आपापल्या घरी निघाले. आता परत भेटणार होतो ते न्युयॉर्क ची परेड गाजवायला.
https://www.facebook.com/JaiBharatDholTashaPathak
मयुरेश
Get work!....being a part of India from so far away.....I think when outside india....we feel more so Indian.....grt work keep it up!
ReplyDelete