बोस्टन ऐकलं कि मला पहिलं आठवत ते 'बोस्टन टि पार्टी'. शाळेत असताना नववीला इतिहासात 'अमेरिकेचा स्वातंत्र्यसंग्राम' म्हणुन एक धडा होता, त्यात वाचलं होत आणि खर सांगायचं तर परीक्षेत त्रास हि दिला होता. नोव्हेंबर महिन्यात इकडे चक्कर मारायची दुर्बुद्धी मला झाली. हो, दुर्बुद्धी म्हणतोय कारण बोस्टन हे अमेरिकेच्या उत्तरेला आणि नोव्हेंबर म्हणजे तर इथे कड्याक्याची थंडी. पुर्ण दिवसभर शुन्य सेल्सिअस तापमानात फिरत होतो.
न्युयॉर्कवरुन एमट्रेकने ५ तास लागतात. पहाटे ३ ची ट्रेन घेतली. सकाळी बोस्टनला पोचल्यावर स्टेशन मध्ये चहा-नाश्ता करून बाहेर पडलो. बाहेर शुन्य सेल्सिअस तापमान आणि त्यात पुर्ण शहर चालत फिरायचं असा वेडेपणा मी करणार होतो. बोस्टन शहर फिरण्यासाठी इथल्या सरकारने एक फ्रीडम ट्रेल बनवला आहे म्हणजे एक पायवाट म्हणतो. ४ किलोमीटर लांबीची अशी हि पायवाट धरुन गेलो कि शहरातले सगळी मुख्य स्थळ बघुन होतात. हि पायवाट लोकांच्या नजरेत भरावी म्हणुन लाल विटांनी शहराच्या फुटपाथवर कोरली. हि पायवाट बोस्टनच्या कॉमन पार्क मधुन सुरु होऊन जवळपास १६ ऐतिहासिक स्थळे कवर करुन बंकर हिल स्मृतीस्थळ जवळ संपते.
बोस्टन कॉमन पार्क मध्ये पर्यटक केंद्रातुन मी फ्रीडम ट्रेलचा नकाशा घेतला आणि नकाशा आणि फुटपाथवर असलेली चिन्ह, लाल विटा बघत बघत बोस्टन फिरायला सुरुवात केली. ह्या मार्गावर बरेचसे चर्च, संग्रहालये आणि काही ऐतिहासिक इमारती आहेत. तुम्ही अशा इमारतींजवळ पोहचलात कि पायवाटांवर केलेल्या खुणा तुम्हाला ह्याची माहिती देतील. हिवाळा आणि त्यात एवढं कमी तापमान त्यामुळे रस्त्यांवर गर्दीही फारशी नव्हती. अजुन ३-४ ग्रुप मला ट्रेल करताना दिसत होते. आधीच थंडी आणि त्यात जर वारा सुटला तर विचारायची सोय नाही मग एखादी चर्च, संग्रहालय आलं की सरळ आत मध्ये जाऊन आराम करायचो. ट्रेल मध्ये असणारे काही संग्रहालये मोफत बघता येतात तर काहींना तिकीट काढावी लागते. वाटेत एक युसस कन्स्टीट्युशन नावाच्या जहाजाचा एक संग्रहालय आहे. आत्तापर्यंत हेच एक मला बघण्यासारखा वाटलं. ह्या जहाजाने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बऱ्याचश्या युद्धात भाग घेतला होता. ह्या जहाजाचे जतन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलं आहे. ह्या जहाजावर कामगार कसे काम करायचे, त्यांची राहायची जागा, जहाजावरच्या अधिकारांची राहायची जागा, युद्धातले तोफ सगळ व्यवस्थित दाखवलंय.
ट्रेलचा शेवट बंकर हिल स्मृतीस्थळ ला होतो. इथे वॉशिंगटन मिनारप्रमाणेच एक मिनार आहे. ह्या मिनारात वरपर्यंत जाण्याची सोय आहे ज्यासाठी २९४ पायऱ्या चढुन जाव्या लागतात. अर्थातच मी वर जायचा ठरवला तेवढीच अंगात उष्णता तयार होईल आणि थंडी पळेल ह्या विचाराने. वर चढत असताना मला 'तेरे घर के सामने' ह्या सिनेमातील 'दिल का भंवर' गाण्याची आठवण येत होती. परत खाली आल्यावर थोडासा आराम आणि आता आणखी एकाच ठिकाण बोस्टनच राहिलं होता ते म्हणजे हार्वड युनिवर्सिटी , नावजलेलं विद्यापीठ.मिनारला असलेल्या पर्यटक केंद्रामधून तिकडे कस जायचं ह्याची माहिती काढली. ५-६ मिनिटाच्या अंतरावर बोस्टन मेट्रो ट्रेन स्टेशन वरून मेट्रो घेऊन युनिवर्सिटीला पोहोचलो. तिथे नक्की काय बघायच हेच मला कळल नाही. मुख्य म्हणजे हिवाळा असल्यामुळे टुर, गाईड बंद होते आणि सगळ्या इमारती हि बंदच दिसत होत्या. असच विद्यापीठाच्या आवारात फेरफटका मारला, तिकडे आले सगळे तेच करत होते.
जवळपास ३ वाजले असतील आणि आता भूक हि जाम लागली होती, बाहेरच एक चाईनीज हॉटेल दिसलं त्यात घुसलो आणि चांगलं जेवण झाल्यावर आता अजून ४ तास काय करायचं ह्याचा विचार करू लागलो कारण परतीची ट्रेन ८ ची होती. बाहेर फिरण्याची ताकद तर संपली होती आणि त्यात एवढी थंडी. थोडावेळ विचार केला आणि ठरवलं स्टेशनला जाऊन बसण्यातच शहाणपण ठरेल. पुन्हा मेट्रो घेतली आणि स्टेशन गाठलं आणि तिथेच उरलेला वेळ घालवला. माझा अमेरिकेतला आत्तापर्यंतचा सर्वात न आवडलेला हा प्रवास, चुक हि माझी म्हणा कि मी ऐन हिवाळ्यात गेलो. तुम्ही गेलात तर उन्हाळ्यातच जावा.
aah!!! Boston. मला खूप आवडलेलं अमेरिकेतले ऐतिहासिक राष्ट्र . छान वाटलं मयुरेश परत एकदा टुर झाली तुमच्या लेखातून . फोटो एकदम छान. आता पुढचा मुक्काम कुठचा?
ReplyDeleteBaghu aata aamchi better half kuthe sangate te :)
DeleteMast! ajun mala athavto to divas..me purna garthun gele hote :P
ReplyDelete