म्हणतातना की बेत न करता काही गोष्टी केल्या कि त्याची मजा काही औरच असते. तसाच एक हा अनुभव. एका शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान आमचा म्हणजेच जय भारत ढोल ताशा पथकाचा प्रिन्स्टन जवळ आशा फाऊन्डेशनच्या कार्यक्रमात परफॉरमन्स होता. आम्ही पाच जर्सी गाईज नेहमी प्रमाणे ट्रेनने प्रवास करुन कार्यक्रमाच्या जवळच स्टेशन गाठलं आणि त्यानंतर आम्हाला पिकअप. सगळेजण कार्यक्रमाच्या ठिकाणी जमल्यावर एक रंगीत तालीम केली. ह्या कार्यक्रमात आमचा आधी १० मिनिटांचा ढोल ताशा लेझीमचा परफॉरमन्स होता आणि त्यानंतर आमच्या ग्रुप मधल्या अप्सरा लावणी सादर करणार होत्या. आज आणखी एक विशेष म्हणजे आमच्या ग्रुप मधल्या एकीचा वाढदिवस होता. ग्रुपचा परफॉरमन्स नेहमी प्रमाणेच हिट झाला. लावणीच्या वेळी तर अप्सरा हि खरोखरच इंद्रपुरीतून खाली आल्यासारख्या भासल्या. बाहेर आल्यावर आशा फाऊन्डेशनने ग्रुप मधल्या लहान मुलांना प्रमाणपत्र दिले होते, ते वाटले आणि आता परत घरी जाण्यासाठी कोण कोणाला कसा सोडणार ह्याचा विचार करू लागलो.
बोलता बोलता विषय निघाला कि चला बर्थडे गर्लचा वाढदिवस साजरा करुया . पिज्जा मागवु , गप्पा मारू, तसे वाजलेही असतील सहाच्या आसपास आणि त्यात शनिवार, म्हणुन दुसऱ्या दिवशी ऑफिस अशी काळजी नव्हती. सगळे जण मग आम्ही तिथुन ग्रुप मुखियांच्या घरी गेलो. गाडीतच पिज्जा ऑर्डर केला. घरी पोहचल्यावर दोघेजण केक आणायला गेले त्यातला एक बर्थडे गर्लचा नवराच होता. केक बरोबर तंदूर चिकनचा छान बेत ठरला. पिज्जा आल्यावर आम्ही सगळे तुटून पडलो. भुकच एवढी लागली होती. केक आणि चिकन येई पर्यंत आम्हाला थांबवलं नाही. चिकन आल्यावर तर मज्जाच मज्जा. बाहेर काढल्यावर लक्षात आल कि दुकानदाराने छोटे तुकडे करून द्यायचं तर ती आख्खी तशीच दिली होती आणि त्यात ती पुर्ण शिजली हि नव्हती. मग सगळे जण त्याचे तुकडे करू लागले आणि परत घरात शिजवायला ठेवली. तुकडे करताना तर त्या चिकनची काय हालत केली होती ते विचारू नका.
नंतर केक कटिंग झालं. केक तर लाजवाब. आरामात मग आम्ही चिकन, केक खात बसलो आणि त्या बरोबर अश्याच गप्पा गोष्टी. कशावरून तरी उखाण्यांचा विषय निघाला. उखाण्यांचा विषय निघाला कि पहिल्यांदा फसतात त्या म्हणजे बायका कारण त्यांनी उखाणा घ्यायचा असा अघोषित नियमच आहे आणि त्याशिवाय त्यांची सुटका नाही. मग तिथून पुढे विषय विनोदी उखाण्यावर गेला. काहीजण मोबाईल वरून विनदी उखाणे शोधून वाचू लागले. ग्रुप मध्ये २-३ लहान मुलेही होते, अमेरिकन बॉर्न, त्यांना उखाणा हा काय प्रकार हे माहीत नव्हते मग त्यातल्या एका मुलाला चिडवण्याची लहर ग्रुप मधल्या मुलीना आली. अगदी छान वेळ जात होता पण त्याच बरोबर घडळ्याचा काटा हि पुढे सरकत होता.
आवरा आवर करून मग आम्ही सर्व जण बाहेर पडलो. सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. आम्हा जर्सी गाईजना सोडायलाही सरांची गाडी निघाली. निघताना वेळ अशी झाली होती कि २-३ मिनिटे मागे पुढे आणि आमची ट्रेन चुकणार होती. शेवटी प्रयत्न करूनही ट्रेन चुकलीच. गाडी स्टेशन बाहेर पोहचायला आणि ट्रेन यायला एकच वेळ झाला. त्यात रात्र झाल्यामुळे स्टेशनचे २-३ दरवाजे बंद केले होते, आम्ही कुठून आत जायचं हे शोधण्यात वेळ चालला होता. त्यात स्टेशन बाहेर एक म्हातारी बसली होती तिला काय जोश आला होता काय माहीत. काहीतरी जोरजोरात बडबडत होती आणि तेही आम्हाला बघून. काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती का काय ते कळले नाही. शेवटी आम्हाला लिफ्ट मिळाली स्टेशनला जाण्यासाठी पण तो पर्यंत उशीर झाला होता. नंतरची ट्रेन परत १ तासांनी होती पण पुढे त्या स्टेशन वरून घरापर्यंतच्या प्रवासाचा प्रश्न होता. मग आम्ही पुन्हा अर्ध्यावर सोडलेली पार्टी पुर्ण करायला मागे फिरलो.
परत स्टेशन बाहेर आल्यावर बघतो तर ती म्हातारी अजुनही बडबडत होती. परत आम्ही सरांच्या घरी आलो. थोडस फ्रेश झाल्यावर पत्ते खेळायचं ठरवलं. आम्ही ७ जन होतो पण एकाने माघार घेतली. खेळायला ६ जण होतो तर मेंढीकोटचा डाव सुरु केला. ३ मुली एका टीम मध्ये आणि ३ मुलं एका टीम मध्ये. खेळताना तर बापरे, एवढी चिटिंग, मुलीनी फक्त एकमेमेकांची पानं बघायची बाकी ठेवली होती नाहीतर सगळे इशारे खुल्लमखुल्ला. अरे आम्हाला कळणार नाही असेतरी खाणाखुणा असाव्यात. एक पत्ता टाकला कि एकमेकांना सरळ सरळ विचारून आता मी कुठल टाकू. पण जाम मज्जा आली. शेवटी न वाटूनही अशी उनाड संध्याकाळ संपवायचा निर्णय घेतला.
पुन्हा कधीतरी अशी धमाल करायचा बेत करून आम्ही झोपी गेलो.
मस्तच!!!! हो आठवली ना सगळी मज्जा. तुमचा लेख वाचून परत नव्याने अनुभवली ती 'संध्याकाळ'. छान लिहिल आहे.
ReplyDeleteThank you :), Also first comment on my blog ;)
ReplyDelete