Saturday, 29 August 2015

जव्हार

मान्सुन सुरु झाला कि सगळ्यांना ओढ लागते ती पावसाळी पर्यटनाची आणि आपसुकच जवळपास निसर्गसंपन्न असणाऱ्या ठिकाणांची शोध सुरु होते. मुंबईकरांची पहिली पसंती म्हणजे माथेरान, लोणावळा, माळशेज घाट नाहीतर भंडारदरा. ह्याचबरोबर मुंबई-नाशिक पासून जवळच असलेलं आणखी एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे जव्हार, ज्याच्या विषयी बऱ्याच कमी जणांना माहिती आहे.
जव्हार म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात एका डोंगरावर वसलेलं एक छोट शहर. मुंबईकरांसाठी उत्तम वीकेंड डेस्टीनेशन. इथे तशी लोकांनी गर्दी केलेली नसल्यामुळे अजुनही शांत आणि प्रसन्न. मुंबईवरून तुम्ही निघालात कि ३-४ तासात इथे पोहचता येईल. मी मागच्या आठवड्यात इथे गेलो होतो. सकाळीच प्रवासाला सुरुवात केली. मुंबई-अहमदाबाद हाईवे घेऊन चारोटी नाक्यावरून उजवीकडे जाणारा रस्ता पकडला. इथुन ४०-४५ किमीवर जव्हार. चारोटीनाका ते जव्हार रस्त्यावर जरा पावसामुळे खड्यांनी आक्रमण केले होते पण त्यातल्यात्यात बरा म्हणता येईल. हा रस्ता तुम्हाला कंटाळा मात्र मुळीच येउन देणार नाही. नद्या, भातशेती सगळा एकदम हिरवागार परिसर आणि रस्ता एकदम गर्द झाडीतुन जाणारा. आमची गाडी जवळपास १२ वाजता आधीच बुक केलेल्या रेसोर्टच्या गेट मध्ये शिरली. रेसोर्टचा परिसर हि छान, शांत आणि प्रसन्न होता. त्या समोरच जयसागर लेक परिसराच्या शोभेत भर घालत होता.




थोडस फ्रेश झाल्यवर रीसेप्शन मधुन जव्हार मधल्या ठिकाणांची माहिती घेतली. जेवण झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. सर्वात आधी आम्ही तुलनेने लांब असलेल्या ठिकाणी जायचं ठरवलं ते म्हणजे दाभोसा धबधबा. महाराष्ट्रातल्या उंच धबधब्यापैकी एक. ह्या धबधब्याच पाणी हे तीनेशे फुट उंची वरून खाली पडत. इथे जायचा रस्ता म्हणजे महाभयानक. रस्ता नाहीतच जमा आहे. पुर्ण खड्यांमध्ये रस्ता हरवुन गेलेला. असा जवळपास १५ किमी मध्ये येणारे खड्डे चुकुवून कसेबसे आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो. सर्वात आधी आपल्याला दर्शन होते ते म्हणजे उंचावरून. आपल्याला समोर तीनशे फुट खोल दरीत कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा दिसतो. विलोभनीय असा दृश्य. त्यानंतर तुम्ही दरीत उतरून जवळही जाऊ शकता. पण उतरताना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण पायवाट हि एकदमच उतरणीची आहे आणि पावसामुळे रस्ता निसरडा असण्याचीही शक्यता आहे. परत चढताना तर खूपच दमछाक होते.



इथून पुढे आम्ही पुन्हा आल्या रस्त्याने मागे फिरलो ते खडखड धरण बघायला. रस्त्यामध्ये विचारत विचारत आम्ही धरणाजवळ पोहोचलो. धरणतसा मोठा आहे पण सांडव्यावरून पाणी वाहत असतानाचे पाहण्यास काही मिळाले नाही कारण धरण अजून पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. तिथून पुढे आम्ही शिरपामाळला भेट दिली. 
शिरपामाळला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महारांजाच्या पद्स्पर्शामुळे. महाराज सुरतेवर स्वारीसाठी निघाले होते तेव्हा जव्हारात त्यांचे स्वागत राजा विक्रमांनी ह्याच ठिकाणी केले. इथे एक भगवा झेंडा सदैव फडकत असतो. थोडसं उंचावर असल्यामुळे इथुन दिसणारे दृश्य आपल्या कॅमेरात टिपल्याशिवाय जाऊच शकत नाही. खडखड धरणामुळे तयार झालेला जलाशय हि इथून दिसतो. इथुन आम्ही परत आमच्या रेसोर्टवर आलो. संध्याकाळचा चहा झाल्यावर सनसेट पाहायला गेलो. त्या आधी जयसागर लेकला हि भेट दिली. अगदी शांत, सुंदर आणि गर्द झाडीत ह्या लेकचा बंधारा आहे. सनसेटला पोहचलो तेव्हा सुर्य ढगांमागे आधीच लपलेला होता. संध्याकाळचे ते निसर्गाचे रूप अतिशय मनमोहक. दरीत ४-५ घरे दिसतात. इतरत्र सगळीकडे भातशेती दिसते. सुर्यास्त हा ढगांमागेच झाला आणि आम्ही तिथून परतलो.









दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपुन काळ-मांडवी धबधबा पाहयला निघालो. हा धबधबा बराच आडवाटेला आहे. जव्हार पासुन १०-१२ किमीवर आणि पुन्हा इथे दोन किमी चालत जावा लागता. पार्किंगला जागा आहे पण जिथे पार्किंग करतो तिथे फक्त एक स्थानिक गावकऱ्याच घर आहे आणि त्याच्या भरवशावर गाडी सोडुन तुम्ही जाऊ शकता पण इथे ग्रुप ने गेलात तरच बर, आम्ही अर्ध्यातुनच मागे फिरलो कारण पुन्हा पावसालाही सुरुवात झाली होती आणि पुर्ण वाटेत आम्ही एकटेच होतो. कोणीही पर्यटक आलेले दिसत नव्हते ,आमची गाडीही एकटीच होती.  त्यानंतर पुन्हा जव्हारला परतुन राहिलेले हनुमान पॉईन्ट आणि जयविलास वाडा बघितला.






हनुमान पॉईन्टला एक हनुमानाचं मंदिर आहे आणि इथून जव्हारच्या पुर्वेला पसरलेला निसर्ग दिसतो. जयविलास वाडा हा खाजगी मालकीचा असुन वाड्याच्या देखभाल करणारे चिरीमिरी घेऊन वाडा आतमधुन दाखवतात. हा वाडा १९४२ साली जव्हारचे तत्कालीन राजांनी बांधला. आता त्यांचे वशंज वास्त्याव्याला पुण्यात असतात पण अधुनमधून इकडे फिरकतात. वाडा बघुन झाल्यावर आम्ही जेवण करून परत मुंबईच्या  प्रवासाला लागलो. गर्दीपासुन दुर, शांत आणि निसर्गाची ओढ असणारे नक्कीच जव्हारला पसंती देतील.

मयुरेश
mayuresh.manjre@gmail.com

No comments:

Post a Comment