Monday, 5 May 2014

महाराष्ट्र दिवस - न्युयॉर्क कॉन्सुलेटमधला

'माझ्या मराठीची बोलु कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।।' अशी राज्यभाषा असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा 'महाराष्ट्र दिवस' साजरा करण्याची संधी ह्या वर्षी मला न्युयॉर्क मधल्या आपल्या भारत देशाच्या कॉन्सुलेट  मध्ये मिळाली. हि संधी मला मिळाली ती जय भारत ढोल ताशा पथकामुळे. 
गेल्या वर्षी जुन २५, २०१३ रोजी जेव्हा आदरणीय कॉन्सुल जनरल श्री ज्ञानेश्वर मुळे हे अमेरिकेत आले तेव्हा त्याचं स्वागत खास ढोल ताशाच्या गजरात न्युजर्सीतील एसआयए कार्यक्रमात जय भारत ढोल ताशा पथकाने केलं. त्यावेळी पथकाचे प्रमुख वसंत माधवी आणि डॉ मनीषा माधवी ह्यांनी आदरणीय ज्ञानेश्वर सरांजवळ इच्छा व्यक्त केली कि पथकाचा एक कार्यक्रम न्युयॉर्क मधील कॉन्सुलेट  मध्ये व्हावा. त्यानंतर वसंत आणि मनीषा, दोघांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व बऱ्याच गाठीभेतीनंतर कार्यक्रमाच्या मंजुरीस अंतिम स्वरुप देण्यास दोघांना यश आले. कार्यक्रमाचा दिवस मे २, २०१४ म्हणजे महाराष्ट्र दिवसच साजरा करण्याचं ठरविण्यात आलं.    
महाराष्ट्र दिवस, राज्याचा निर्मिती दिन न्युयॉर्क कॉन्सुलेट मध्ये इतिहासात सर्वप्रथम साजरा केला जाणार आणि हि संधी 'जय भारत ढोल तशा पथक' आणि ह्या पथकाचा सदस्य ह्या नात्याने माझ्यासाठी आणि पथकातील प्रत्येकासाठी नक्कीच एक अभिमानाची गोष्ट होती.
आम्ही सगळेच जण त्यानंतर कार्यक्रमाच्या जोरदार तयारीला लागलो. ह्यावेळी काहीतरी नवीन सादर करण्याची प्रत्येकाची इच्छा होती. ढोल ताशाची नवीन ताल ठरविण्यात आली, त्यावर मुलींची लेझीमची प्रक्टिस, लावणी, कार्यक्रमाची रूपरेषा ह्यावर सगळेच मेहनत घेत होते. कार्यक्रमाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी तयारी अजुनच जोर धरत होती. आम्ही सर्वचजण खुप उत्साहित होतो.
कार्यक्रमाच्या दिवशी वेळेआधीच आम्ही सगळे कॉन्सुलेट मध्ये जमलो. स्टेजची रचना, वस्तुंची मांडामांड, तयारी करण्यात वेळ कसा निघुन गेला कळलेही नाही. सगळी आवरावर झाल्यावर आम्हीही स्वतःच्या तयारीला लागलो. महाराष्ट्र दिवस म्हंटला म्हणजे नऊवारी आणि कुर्ते असायलाच हवे. कार्यक्रमाची वेळ होत आल्यावर निमंत्रित पाहुणे मंडळी येण्यास सुरुवात झाली. त्यांचे स्वागत खास भारतीय पद्धतीने औक्षण करुन केले गेले. सभागृह एकदम खचाखच भरले होते. अमेरिकेतील न्युयॉर्क, न्युजर्सी , पेन्सिल्वेनिया आणि कनेक्टिकट ह्या चार राज्यातील मान्यवरांनी आणि निमंत्रितांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती.  ह्यात फक्त भारतीयच नव्हे तर अमेरिकन स्थानिक लोकांची उपस्थिती लक्षवेधक होती. 
कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय कॉन्सुल जनरल श्री ज्ञानेश्वर मुळे ह्यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली.  त्यानंतर दिंडी काढण्यात आली. दिंडीत लहान मुले गणपतीची पालखी घेऊन रंगमंचावर आले आणि पालखीचं स्वागत ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात करण्यात आलं. पालखीची सुरेख सजावट अंजली धनावडे ह्यांनी केली होती. दिंडी झाल्यावर ढोल ताशाच्या तालावर मुलींनी लेझीम खेळुन उपस्थितांना महाराष्ट्रातील पारंपारिक वाद्य आणि नृत्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला, उपस्थितांनीही त्याला मनसोक्त दाद दिली.
ह्यानंतर कॉम्पुटर प्रेझेंटेशन  मार्फत लोकांना महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, निसर्ग, खेळाची ओळख डॉ.  मनिषा माधवी ह्यांनी सुरेखरित्या करून दिली. कोळी नृत्य हि सुद्धा महाराष्ट्राची एक खासियत. लहान मुलांनी कोळीगाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकुन घेतली. मानसी करंदीकरांच्या लावणी आणि गवळण सादरीकरणाने तर कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. रश्मी, आदिती आणि अभिन ह्यांनी आपल्या पोवाडे तसेच महाराष्ट्रातील गाजलेली गाणी आपल्या गायकीच्या अदाकारीतुन सादर केली. नितीन अष्टेकर ह्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने नटसम्राट नाटकातील एक झलक पेश करुन उपस्थितांची मने हेलावली. 'देवा श्री गणेशा' ह्या गाण्यावर रश्मी आणि मुग्धाच्या टीमच नृत्य ही तेवढंच जबरदस्त झालं. शेवटी जय भारत ढोल ताशा पथकातील महिलांनीही लावणी नृत्य करून लोकांच्या शिट्या मिळवल्या. रश्मी कुलकर्णी ह्यांनी कोळीनृत्य आणि लावणीच्या कोरीयोग्राफिचे काम पाहिले ज्यामुळे लोकांची कार्यक्रमाला भरभरून दाद मिळाली.
उपस्थित मान्यवरांचा ह्यावेळी सत्कार करण्यात आला, ह्यामध्ये गुरु अर्चना जोगळेकर, श्रीमती मानसी करंदीकर, श्री प्रमोद चेंम्बुरकर, डॉ रमेश घाणेकर, डॉ गीता घाणेकर, श्रीमती माधुरी जोशी, डॉ मीना नेरुरकर, श्री अशोक वंजारी, श्री सुभाष केळुस्कर, श्री अनिल दिवाण, श्री अरविंद संत, श्री सुनिल सुर्यवंशी बीएमएम अध्यक्ष, श्री उदय खिरे एमएमसीटी अध्यक्ष आणि श्री दिलीप शेट्ये ह्यांचा समावेश होता. 
शीतल ह्यांनी आपल्या सुमधुर आवाजातुन गायलेल्या पसयादानाने कार्यक्रमाचा शेवट केला.  राजश्री कुलकर्णी आणि राज धनावडे ह्यांनी उत्कृष्टरीत्या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाचे काम पार पाडले. कार्यक्रमात मांडलेल्या मेघा वणारसे ह्यांच्या हस्तकलेच्या वस्तुंच्या प्रदर्शनालाही लोकांचा छान प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात महाराष्ट्रातील पारंपारिक वस्त्रे, भांडी, सणवार ह्यांचा प्रतिकृती मांडलेल्या होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपाहारात अश्विनी ह्यांच्या हातच्या मराठमोळ्या वडापावने एक खास लज्जत आणली. तसेच त्यांनी तयार केलेल्या करंजीचा आणि शंकरपाळ्यांचा आस्वाद लोकांना घेता आला. मुंबईस्टाईल पावभाजी आणि महाराष्ट्रात घराघरात बनणारे कांदेपोह्यांची प्रायोजकत्व समीर ह्यांनी देऊ केलं. त्याचबरोबर पेयामध्ये कैरीचं पन्ह म्हणजे खवय्यांची तर चंगळच होती.  
पुर्ण कार्यक्रमात चांगली धमाल आली. आदरणीय कॉन्सुल जनरल श्री ज्ञानेश्वर मुळे ह्यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्यावेळी जय भारत ढोल ताशा पथकाचे, विशेष करून श्री वसंत माधवी आणि डॉ मनीषा माधवी ह्यांचे ह्या सुंदर कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आभार व्यक्त केले.










मयुरेश मांजरे 

No comments:

Post a Comment