Sunday, 6 July 2025

गड, जंगल आणि विहिरीतलं स्वर्गसुख – अवचितगड ट्रेक

सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला अजुन एक रांगडा गड. फार कमी लोकांना परिचित पण पावसाळ्यात ज्याच सौंदर्य अगदी अफलातुन बहरत असा हा किल्ला. हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला असं मानलं जात आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहच्या ताब्यात गेला. पुढे छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात सामील केला आणि अखेर १८१८ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून जिंकून घेतला. नवी मुंबईपासून सुमारे ९० किमी आणि रोह्यापासुन अगदी जवळ असलेला हा किल्ला अवचितगड.

एप्रिलमध्ये मृगगड करून आमच्या ट्रेकचा दुसऱ्या सिझनमधला नववा टप्पा पूर्ण झाला होता. आता मात्र समोर होता वर्षातला सगळ्यात खडतर महिना – तो म्हणजे मे महिना. ह्या महिन्यात थंड हवेची ठिकाणे जास्त पसंत केली जातात. हंगामी ट्रेकर्स, ज्यांना आपण पावसाळी बेडकं म्हणतो ते चातकाप्रमाणे आकाशाला डोळे लावुन बसलेले असतात की कधी पाऊस पडतोय आणि एकमेकांना रील पाठवण्यात बिझी झालेले असतात की ह्या पावसाळ्यात कुठले गडावर जाऊन डराव डराव करायचे. 

पण माझं ठरलं होतं - दर महिन्याला एक ट्रेक हवाच. मला बरेच जण बोलत असतात अरे फेब्रुवारी नंतर का ट्रेक करतो, काय मजा असते. सगळं कोरड ठणक, रखरखीत. पण मी मागच्या वर्षीही हा नियम चुकवला नाही आणि ह्या ही वर्षी चुकवणार नाही.  वाटलंच तर एखादी दुर्ग भेट द्यायची – म्हणजे ट्रेक जरी नाही झाला तरी किल्ला तरी होईल.

मित्रांसोबत कोकणातही जायचा प्लॅन बनत होता म्हणून आधी गोपाळगड मनात आला. पण काही कारणास्तव तो बेत बारगळला. मग म्हटलं जवळच वसईच्या किल्ल्याला जाऊ. बऱ्याच दिवसांपासुन हा ही किल्ला यादीत होताच. पण अचानक मनामध्ये कुठुन तरी आठवलं अरे आपल्या त्या रोह्याजवळचा अवचितगड आहे ना. मागे मुरुडला जाताना ह्या किल्ल्याची पाटी बघितली होती तेव्हा पासुन मनात घर करुन होता. झटपट माहीती काढली तर अगदी सोपा, छोटा ट्रेक आणि पायथ्याला जंगल. उन्हाळ्यासाठी उत्तम. ठरलं तर मग, ह्या महिन्याचा किल्ला ‘अवचितगड’! इतक्यात वरुण राजा पण मदतीला धावुन आला. सहसा ७ जूनला येणारा पाऊस, यंदा २२ मेलाच दाखल झाला! त्याही आधी मान्सूनपुर्व सरींनी कोकणाला झोडपुन काढल होतंच. तर हवेत गारवा आला होता, थोडीफार हिरवळ सुद्धा पसरली होती, मुख्य म्हणजे मेच्या रणरणीतून सुटका! 

आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर होता – ट्रेकचा दिवस कोणता घ्यायचा? मे महिन्याचा शेवटचा दिवसच म्हणजे ३१ मेच शिल्लक राहीला होता. आधीचे दिवस काही ना काही कारणामुळे शक्य नव्हते. पण तो महिन्यातला पाचवा शनिवार होता, आणि काहीजणांसाठी तो वर्किंग डे असतो!
आता काय करायचं?
“मे महिन्याचा ट्रेक, मे महिन्यातच हवा” – हा माझा सिरीयस नियम!
पण शेवटी मीच स्वतःच्या नियमात अपवाद घेत ट्रेक १ जून, रविवारी ठेवला.
ट्रेक होणं जास्त महत्त्वाचं होतं, आणि माझ्या डायरीत हा ट्रेक तरीही “मे ट्रेक” म्हणूनच नोंदवणार होतो! 

हळूहळू टीम तयार झाली. मी, रिआ, रेयांश, प्रथमेश, ध्रुवी आणि महेश. हे सगळे साखळीतील नियमित चेहरे. ह्यावेळी ओंकारही सामील झाला. त्यात भर – दोन खास पाहुणे. प्रथम – दिल्लीहून आलेला माझा सोशल मीडियावरचा मित्र.

कंपनीच्या ट्रेनिंगसाठी मुंबईत आला होता, मी ट्रेकची कल्पना दिली आणि लगेच तयार!
पॉल – गुवाहाटीहून आलेला, प्रथमचा मित्र.
तोही ट्रेनिंगसाठी आलेला आणि ट्रेकसाठी तयार!
एकूण ९ जणांची टीम तयार!

रविवारी पहाटे लवकरच म्हणजे ५ वाजता निघण्याचा बेत होता. प्रथम आणि पॅाल मुंबईतून येणार होते तर त्यांना मी वारंवार बजावले की वेळेत निघा. तुम्हाला माझ्याकडे यायला एक तास तरी लागेल. त्या हिशेबाने निघा. माझ्या सुचने प्रमाणे ते बरोबर पहाटे ४:३५ वाजता त्यांना सांगितल्या ठिकाणी पोहचलेसुद्धा.

मी मात्र "नेहमीप्रमाणे" थोडा मागेच होतो. आता कोणावर खापर फोडु. हा रिआ, रेयांश. मुलं आहेत तर आवरायला उशीर झाला थोडा. महेश आणि ओंकारला घेऊन ५ः०५ वाजता प्रथम आणि पॅालला भेटलो आणि मग प्रथमेश. तो सुद्धा नेहमीप्रमाणे १० मिनिटे उशीराच आला जिथे त्याला भेटणार होतो. "उशीर कोणामुळे झाला?" हा आमचा ठरलेला वाद! थोडी मिश्कील कुरबूर करत आम्ही पुढे निघालो.

अवचितगडला जाण्यासाठी रोह्याचा रस्ता पकडायचा. पनवेल वरुन नागोठणे पर्यंत गोवा रस्ता जो आता पुर्ण सुसाट सिमेंटचा रस्ता. मध्येमध्ये अजुन काही पुलांची काम चालु आहेत. वडखळ सोडल्यावर एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. नागोठण्यावरुन गोवा रस्ता सोडुन रोह्याचा रस्ता धरला. हा जेमतेम २० किमीचा रस्ता. पण दोन आठवड्यांच्या पावसामुळे हा पुर्ण निसर्गाने नटलेला होता. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आणि मधुन जाणारा डांबरी रस्ता. मध्येच छोटासा घाट. अगदी मस्त वाटत होत ड्राईव्ह करायला इथुन.

सातच्या दरम्यान अवचितगडाच्या पायथ्याला म्हणजे मेढे गावी पोहचलो. मेढे गावात शिरल्यावर गावकऱ्यांना विचारत विचारत विठ्ठलाच मंदीर गाठलं. तिथेच गावकऱ्यांनी गाड्या पार्क करायला सांगितल्या. विठ्ठलाच्या मंदीराजवळ जाताच गावातली ७-८ कुत्र्यांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. पण ती सगळी मस्तीच्या मुड मध्ये होती आणि आमच्याकडुन काहीतरी भेटेल ह्या अपेक्षेने मागेपुढे करीत होती हे आम्हाला समजल. थोडीशी आवारआवर करुन तिथुनच ट्रेकला सुरुवात झाली. सगळी कुत्री आमच्या बरोबर. दोन मिनिट चालल्यावर गावची एक प्रशस्त विहीर लागली. विहीर बघुन सगळ्यांच्याच मनांत पटापट उड्या मारण्याचा मोह झाला पण आपण ट्रेक साठी आलोय हे स्वतःला समजावून पुढे निघालो.

विहिरीच्या पुढे गावची हद्द संपते आणि सरळ पायवाट घनदाट जंगलात शिरते. नुकताच पाऊस पडुन गेल्यामुळे सगळीकडे हिरवगार झाल होत. पायवाटेवर वेली पसरायला सुरुवात झाल्या होत्या. हाच पावसाळ्यात धोका असतो. पायवाटेवर वेली पसरून, गवत उगवून रस्ता झाकोळला जातो आणि रस्ता चुकण्याचे शक्यता वाढतात. पण ठिकठिकाणी पाट्या लावल्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता तशी कमीच होती. ह्या जंगलात बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर आहे अस ऐकल होत पण आम्हाला वाटेत दिसले ते म्हणजे फक्त खेकडे. जंगलाची मजा घेत, रमतगमत चालत आम्ही पाऊणतासांनी वीरगळीच्या ठिकाणी पोहचलो. ही जागा छान स्वच्छ करुन ठेवलेली होती. बसायला ही जागा होती. थोडावेळ दम खाऊन गप्पागोष्टी मारुन पुढे निघालो. आता उंचीवरुन आजूबाजूच्या परिसर दिसु लागला होता. रोहा शहर पावसात भिजताना दर्शन होत होत. प्रत्येक वळणावर फोटोसाठी स्पॉट, पण जबाबदारीने फोटो घेतले – निसर्गसौंदर्याचा आदर ठेवत आम्ही पोहचलो किल्ल्याच्या महादरवाजाला.








महादरवाज्यातुन प्रवेश करताच समोर एक तोफ आपल्या स्वागताला दिसते. तिथुन दोन-तीन वाट फुटतात. आम्ही डावी कडेची वाट निवडली आणि पुढे आलो. आश्चर्याची बाब म्हणजे ती कुत्री अजुनही आमच्या बरोबर होती. आमच्यापेक्षा कुत्र्यांचीच संख्या जास्त होती. पावसाची रिपरिप अधुनमधुन चालु होती. आता खरंच वाटत होतं की जोरात पडावा पाऊस आणि पुर्ण चिंब व्हाव. एक चक्कर मारुन आम्ही गडाच्या सर्वोच्च बुरुजावर आलो. एक ध्वज स्तंभ होता तिथे. तिथेही कुत्रे आमच्या बरोबर पण तिथे त्यांचा वानरांबरोबर टाईमपास चालु होता. वानर त्या कुत्र्यांना खेळवत होते. त्यांना हुल देऊन झाडावर उड्या मारत त्यांना डिवचत होते आणि कुत्री त्यांना पकडायचा प्रयत्न करत होते. त्या बुरुजावरुन तिन्ही बाजुचा परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता. तिथुनच आम्हाला एक लाकडी पुल दिसला जो बाजुलाच असलेल्या डोंगरावर जात होता. खाली उतरुन परत आम्ही त्या लाकडी पुलावर गेलो. मनसोक्त फोटो काढल्यावर परतीच्या वाटेत पाण्याच्या टाक्या, पिंगळाई देवीचे मंदीर, महादेवाच मंदीर, एक भला मोठा पाण्याचा तलाव आणि दिंडी दरवाजा बघत बघत पुन्हा महादरवाज्याजवळ आलो. हा पुर्ण फेरा आम्हाला करायला दोन तास लागले.

उतरायला सुरुवात केली. परतीची वाट ओळखीची होती. दमट हवामानामुळे घामाने पुर्ण अंग भिजल होत. आरामात खाली आलो. आणि मग काय, विहीर आमची वाटच बघत होती. आता आम्हाला राहवल नाही. पटापट कपडे काढले आणि दिल झोकुन त्या थंड विहिरीच्या पाण्यात. दिल्लीच्या प्रथमने तर पहिल्यांदाच अश्या विहिरीत पोहण्याचा अनुभव घेतला होता. तो भलताच खुश होता. मी, रेयांश आणि महेश एकामागे एक विहीरीत उड्या टाकत होतो. मस्त १ तास मजा केल्यावर शेवटी आम्ही तिथुन निघालो. रेयांशला तर ती स्वर्गातली विहीर सोडुन जावत नव्हत. बाबा फक्त एकदा, फक्त एकदा बोलुन ३-४ वेळा उड्या मारल्या. बरोबर आलेली कुत्र्यांनी शेवटपर्यंत सोबत केली जणू काही आमची गाईड बनुन आली होती. त्यांचा मोबदला त्यांना वरतीच ब्रेड, बिस्कीट्सच्या रुपात देऊ केला होता. आता ती पण पांगली. 

ट्रेक तसा छोटाच होता पण किल्ला फिरायला थोडा वेळ लागला आणि त्यात आमच्यासारख्या फोटो शौकीन असले म्हणजे झाल. तर एक दिवस मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासुन शांतता पाहीजे असेल तर ह्या किल्ल्याचा नक्की विचार करा. तर चला, मला आता लागायला पाहीजे पुढच्या ट्रेकच्या नियोजनाला.


Sunday, 15 June 2025

मृगगड - गोकुंड आणि भरपुर ॲडवेंचर

मृगगड – रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातला पालीजवळचा एक लपलेल रत्न. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा छोटेखानी किल्ला फारसा प्रसिद्ध नाही, पण निसर्गसौंदर्य, शांतता, आणि थोडीशी साहसाची जोड अशा सगळ्याचा परिपूर्ण संगम इथे अनुभवता येतो. कार्तलाबखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंबरखिंडीच्या लढाईत ह्या किल्ल्याचा विशेष उपयोग झाला असेल तरीही जास्त इतिहास माहीत नाही. गर्दी नसलेला, पण इतिहासाचा व निसर्गाचा स्पर्श लाभलेला असा मृगगड एकदा तरी ट्रेकर्सनी अनुभवायलाच हवा.

या ट्रेकचा अनुभव मी घेतला एप्रिल महिन्यात – उन्हाळा असूनसुद्धा सावलीचं जंगल, आणि वर असलेली एक शांत गुहा यामुळे हा ट्रेक वेगळाच वाटला...

उन्हाळ्याचा तडाखा वाढत होता, पण काही झाल तरी दर महिन्याला एक गड सर करायचाच हा माझा संकल्प. मृगगड बऱ्याच दिवसांपासून डोक्यात घर करून बसला होता, आणि वाचण्यात आलं होतं की हा छोटासाच आणि सोपा ट्रेक आहे. मुख्य म्हणजे त्याच बाजुला माझ्या मेव्हण्याचा विजयचा विला आहे. गडाच्या पायथ्याच गाव भेलीव, विला पासुन अगदी १४ किमीवर! ठरलं तर मग. शनिवारी रात्री विल्यावर मुक्काम आणि रविवारी सकाळी मृगगड.

आदल्या दिवशी दुपारीच मी, माझी दोन पिल्लं (रिआ आणि रेयांश), माझा मित्र महेश आणि त्याची बायको कोमल निघालो. वाटेत कळंबोलीला आधी सासुरवाडीला जाऊन मेव्हण्याने विलावर घेऊन जाण्यासाठी सामान भरुन ठेवलं होतं ते घेतल. विजय नंतर येणार होता. खोपोलीच्या पुढे रस्त्यात तावडे वडापाववाल्याकडे गरमागरम वडापाव खाल्ले आणि संध्याकाळी परत भुक लागलीच तर, काहीतरी असावं म्हणुन भेळ बांधुन घेतली. विला गाठल्यावर आम्ही स्विमिंगपुल मध्ये उतरलो पण पाणी तर आंघोळीच्या पाण्याइतक गरम. तसच त्या पाण्यात मस्ती केल्यावर बाहेर आलो.आता एवढ पाण्यात खेळलो आणि सकाळी सवयीप्रमाणे व्यायामासाठी लवकर उठलेलो तर मग दिली ताणून.

संध्याकाळी प्रथमेश-रुपाली आणि त्यांची मुलगी ध्रुवी, सागर आणि अरविंद विला वर पोहोचले. विजय ही मागोमाग आला. सगळे गोळा झाल्यावर, रात्रीच जेवणं झाली आणि मग पत्त्यांची मैफल रंगली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं असल्यामुळे शेवटी पत्ते बाजूला ठेवून आम्ही सगळे झोपलो नाहीतर रात्रभर काहीतरी धांगडधिंगा करत बसलो असतो.

या ट्रेकचा लीडर असल्यामुळे सकाळी सर्वांत आधी उठायची जबाबदारी अर्थातच माझी! अलार्म लावलेलाच होता पण तो वाजयच्या आधीच डोळे उघडले, वेळेकडे पाहिलं, अरे आता १५ मिनिटात अलार्म वाजेलच तर मग काहीस मनातल्यामनात गणित करुन अलार्मची वेळ थोडी पुढं ढकलली आणि झोपलो. अलार्म वाजला, आता उठायलाच लागेल! मी पटकन आवरलं आणि मग सुरू झाली सगळ्यांना उठवण्याची मोहीम. कोण अंग झटकत उठलं, कोण अरे थांब, त्याच आवरुन झाल की मी उठतो, प्रथमेशला उठल्यावर योगासन करायची सवय आहे हे कळल, आणि त्यात शवासन त्याच आवडतं आसन – पण शेवटी सगळे एक एक करत उठले आणि तयारी सुरू झाली. मी चहा टाकला, सगळ्यांनी चहा बरोबर बिस्किट खाल्ली!  

निघताना मात्र भन्नाट मजा . कोणी काय घ्यायचं, कोणाचं काय राहिलंय, पाण्याच्या बाटल्या कोण घेणार यावर विशेष वाद झाला – “बॅग जड होते”, “मी दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्यात”, “मी खाणं घेतलंय” अशा टोलवाटोलवीच्या डायलॉग्स हवेत उडत होते. शेवटी माझ्याच बॅग मध्ये सर्वात जास्त सामान आलं पण आता काय करणार, लीडर ह्या नात्याने माझ कर्तव्यच होत ते (माझा ब्लॅाग आहे तर मीच हिरो).

गेटच्या बाहेर आलो तर गाडीची चावीच सापडत नव्हती. सगळ्यांना माझ्यावर उखडायची आयतीच संधी चालून आली. चावी शेवटी होती कुठे तर माझ्या खिशात. काखेत कळसा आणि …..  मृगगडच्या दिशेने निघालो. ठरवूनही आमचा नेहमीचा 'एक तास उशीर'चा ट्रॅडिशन सुरूच राहिला. अर्ध्या तासात आम्ही ‘भेलीव’ ह्या पायथ्याच्या गावात पोहोचलो – हेच मृगगडाच्या पायथ्याचं गाव.  गुगल मॅपचा थोडा उपयोग झाला, पण रस्त्यात स्थानिंकानाही विचारत विचारतच आलो.  एक स्कुटी वरुन जाणाऱ्याने तर गावापर्यंतच आणुन सोडल. गाव तसं छोटंसं आहे, गावात शिरल्या शिरल्या एक भल मोठ मंदीर दिसल तिथेच पार्किंगला ऐसपैस जागा होती.

गाडी पार्क केली तिथूनच मृगगडाचं पहिलं दर्शन झालं. फार उंचावर नव्हता, पण डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दाट जंगलामुळे त्याचं सौंदर्य अधिकच उठून दिसत होतं. पाठीमागे लोणावळ्याचे भलेमोठे डोंगर त्याला साक्षीला होते – एकदम रुबाबात उभा होता.

गावात अजून फारशी हालचाल सुरू झाली नव्हती. नाश्त्याची कुठेच सोय नव्हती, त्यामुळे लगेचच ट्रेक सुरू केला. सुरुवात कुठुन करायची हे एकाला विचारल – त्याने वाट दाखवली, आणि मग आम्ही ती पायवाट पकडून पुढे निघालो.

सुरुवातीची पाच मिनिटं शेतातून चालत गेलो. नंतर अचानक जंगलात प्रवेश झाला – छान सावली आणि समोर सपाट चाल. वाटेत गप्पा, फोटो आणि विडीयो शुटींग चालू होतीच. जंगलात सर्वत्र करवंदाची जाळी पसरलेली होती – काही टपोरे करवंदं दिसली पण कच्चीच होती.

सुमारे दहा पंधरा मिनिटे चालल्यावर चढ सुरू झाला, पण सुरुवातीचा टप्पा फारसा कठीण नव्हता. मग आलो आम्ही मृगगडाच्या पहिल्या खऱ्या ॲडवेंचरवर – चढाईचा मुख्य टप्पा! दोन्ही बाजूंनी उंच कातळ आणि मधून जाणारी अगदीच अरुंद वाट. मदतीसाठी काही दुर्गप्रेमींनी आधीच दोर लावून ठेवले होते – त्याची मदत घेऊन चढणं थोडं सोपं झालं. ही वाट इतकी निमुळती होती की एखादं पोटसुटलेलं प्रकरण तिथे अडकलं असतं. चेष्टा-मस्करी करत आणि दोर पकडत शेवटी आम्ही वर पोहोचलो!

कातळ खिंड चढून वर गेल्यावर दोन वाटा समोर आल्या. एक वाट सरळ मृगगडावर नेणारी होती — जिथे कातळातच कोरलेल्या जुन्या पायऱ्या दिसत होत्या. दुसरी वाट मात्र थोडी वेगळी होती, आणि किल्ल्याच दुसर ॲडवेंचर — मृगगडाची गुहा!

ह्या गुहेकडे जाणारी वाट अतिशय अरुंद होती — इतकी की एकावेळी माणसाचा एकच पाय ठेवायला जागा एवढीच रुंदी. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. आधी मी आणि महेशने तिकडे जायचं ठरवलं. आम्हाला अजिबात अवघड वाटलं नाही — जेमतेम ३०-४० मीटरची वाट होती. गुहा मात्र कमालच होती! त्यामुळे लगेच परत आलो आणि रिआ व रेयांशलाही तिकडे घेऊन गेलो. बाकीच्यांना पण बोललो चला पण आधीच्याच ॲडवेंचरने थकल्यामुळे सगळे तिथेच विसावलेले होते! नंतर महेश कोमलला घेऊन गेला.

गुहेतून परत आल्यावर, आम्ही तिघांनी (मी, महेश आणि रेयांश) आमचं खास "बेअरचेस्ट फोटोशूट" चालू केलं — झाडाला लटकून, पुलअप्स करत, आणि बरंच काही माकडचाळे. बाकीचे वैतागले आणि पुढे निघून गेले. फक्त अरविंद थांबला — कारण फोटो तोच काढत होता, त्याला पर्याय नव्हता.

मनसोक्त फोटोशूट झाल्यावर आम्ही पायऱ्यांनी वर आलो. पायऱ्या संपतात तिथे एक छोटेखानी मंदिर आहे. पुढे गेल्यावर पाण्याची काही टाकी दिसली — पण त्या पूर्ण सुकलेल्या होत्या. अजून थोडं चालल्यावर आम्ही पोचलो किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर. आम्ही गुहेपाशी टाइमपास करत असताना एक ट्रेकिंग ग्रुप आम्हाला ओव्हरटेक करून किल्ला बघून परत निघालाही होता. 

नाश्ता अजूनही झाला नव्हता, आणि भूक जोरात लागली होती. मग काय – बॅगेत जे जे होतं ते बाहेर आल. चिक्की, संत्री, खाकरा, चॉकलेट्स... सगळ्यांनी पोटभर खाल्लं. थोडी तरतरी आली आणि पुन्हा फोटोशूटला सुरुवात झाली!

महेश – आमचा कॅलेस्थॅनिक्स एक्सपर्ट – त्याच्या अॅक्शनला सुरुवात झाली. रेयांशचा आग्रह होता, “महेश काका बॅकफ्लिप मार!” मग महेशने थोडा वॉर्मअप करून बॅकफ्लिप, हँडस्टँड, लेग स्प्लिट सगळं करून दाखवलं. आणि मग रेयांशही मागे कसा राहील? त्यानेही कार्टव्हील मारून दाखवलं!

सगळे स्टंट्स आणि धमाल झाल्यावर परतीला निघालो. मनात होतं की आता पटापट खाली उतरू… पण कुठं काय! त्या निमुळत्या खिंडीत सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढायचा होता. त्या एक परफेक्ट शॉटसाठी सगळ्यांना एका रेषेत उभं करण्यात बराच वेळ गेला.

खाली जंगलात आल्यावर रुपालीने सगळी कच्ची करवंद गोळा करायला लावली, त्याची चटणी बनते, अजुनही मला मिळाली नाही. परत पार्किंग लॅाटला पोहचलो तेव्हा खरंच जाम थकलेलो होतो. गुहेचा ट्रेल, चढ-उतार, ऊन आणि उत्साह सगळ्यामुळे शरीर आणि मन दोन्ही दमलं होतं. थोडसं फ्रेश झालो, पाणी प्यायलो आणि मी मनातल्या मनात ठरवलेला प्लॅन पुढे सरकवला — "सेक्रेट वॉटरफॉल!"

त्यालाच गोकुंड वॅाटरफॅाल ही बोलतात. आमच्याकडे पार्किंगचे पैसे घ्यायला आलेल्या गावकऱ्यालाच तिकडे जायचा रस्ता विचारला. त्याच्यासाठी फक्त चार किमी अंतरावर असलेल फल्याण गावी जायच. पण तिथं पोहचलो आणि बघतो तर काय — ४-५ मोठ्या टुरिस्टच्या बसेस आणि बरीच खाजगी वाहने आधीपासूनच उभ्या! सेक्रेट काही उरलं नव्हतं! गावकऱ्यांनी आमच्या बरोबर असणाऱ्या मुलांना बघुन सांगितलं, “गोकुंड तर लांब आहे, पण वाटेतच जवळ एक छान ठिकाण आहे. तिथे मुलांना मजा येईल.”

अर्धा तास चाललो, वाट मोकळीच, एवढ्या गाड्या-बसेस होत्या पण त्यातला एक माणुस दिसत नव्हता, बरोबर चाललोय का आम्ही का चुकलो वाट. ऊन तापलेलं, आम्ही थकलेलो, तरी मनात होती थोडी उमेद. तेवढ्यात एक आशेचा किरण — नदी दिसली! एक ग्रुप पण आला. त्यांनी सांगितलं, "फक्त पाच मिनिटं पुढे जा — धमाल स्पॉट आहे!" आता एवढं आलोच आहोत तर तेही बघूया म्हणत पुढे गेलो. तर खरंच एकदम मस्त जागा होती. वाहत्या पाण्यात जेमतेम अंगभर पाण्याच एक डबक होत, पोहण्यासाठी मस्तच, पाणी पण थंड,  सभोवताली शांतता. पटापट कपडे काढले आणि पाण्यात उड्या मारल्या. गरम झालेल्या अंगावर ते थंडगार पाणी म्हणजे जणू स्वर्गसुखच!

रेयांशने तर अंडरवॉटर स्टंट्स, उड्या मारत धमाल केली. शेवटचा ॲडवेंचर म्हणजे सागरचा चष्मा पाण्यात बुडाला आणि मग सुरू झाली ती 'चष्मा शोध मोहीम'! शेवटी महेशला सापडला. सगळ्यांनी मनसोक्त खेळून घेतलं. आता मात्र वेळ होती परतीची. अर्धा तास परत चालून गाडीजवळ पोहोचलो तेव्हा "हायसं वाटलं" म्हणणं म्हणजे थोडं होतं! मग विला गाठला, गरमागरम जेवणावर ताव मारला आणि एक आंघोळ घेऊन परतीचा प्रवास सुरू केला...

ही ट्रिप खासच होती — थोडा थकवा, थोडं चुकणं, आणि खूप सारा आनंद! 



Sunday, 25 May 2025

थांब... श्वास घे... आणि जग : हिमालयात एक दिवस

हिमालय म्हणजे पृथ्वीवरचं एक जिवंत चमत्कार. जगातील सर्वात उंच पर्वतरांग – जिथं एव्हरेस्टकांचनजंगानंदा देवी, आणि केदारनाथबद्रीनाथ यांसारखी धार्मिक स्थळं विसावलेली आहेत. हे केवळ डोंगर नव्हेत – ह्या शिखरांमध्ये देवत्वाचं वास्तव्य आहे, असं मानलं जातं.

हिमालय म्हणजे निसर्गाची सर्वात भव्य, पण तरीही नम्र रचना – जिच्यासमोर उभं राहिलं की मनात एकच भावना उरते – "आपण किती लहान आहोत!" आणि नागटिब्बा हे या महान हिमालयाचंच एक कोवळं, शांत, पण भारदस्त अंग आहे – जिथं आपण थोडं स्वतःपासून दूर जाऊन, पुन्हा स्वतःकडे परत येतो. जणू हिमालय आपल्याला शांतपणे सांगतो की, "थांब… श्वास घे… आणि जग!"

आमचा मित्र ओंकार याची देहरादुनला डिसेंबर मध्ये परीक्षा होती. डिसेंबर तसं थोडंसं आरामाचा आणि सुट्टीचा महिना. म्हणुन आम्ही विचार केला की आपण पण जाऊ ओंकार बरोबर आणि ओंकारची परीक्षा झाली की लगेच तिथेच आजूबाजूला कुठेतरी छोटी बजेट ट्रिप करू. इंटरनेट वर थोडंसं शोधल्यावर ओंकारने "नागटिब्बा ट्रेक" ची कल्पना सुचवलीनागटिब्बा एक प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ आहे जे उत्तराखंड राज्यातील टिहरी गढवाल जिल्ह्यात स्थित आहे. "नाग" म्हणजे सर्प आणि "टिब्बा" म्हणजे टेकडी, त्यामुळे याचा अर्थ "सर्पांची टेकडी" असा होतो. सुमारे 3,022 मीटर (9,915 फूट), जे गढवाल हिमालयातील कनिष्ठ हिमालय पर्वतरांगांमधील सर्वात उंच शिखर आहे. आम्ही जाणार होतो भर डिसेंबर मध्ये तर कदाचित बर्फ पण भेटेल म्हणुन मीही त्याच्या कल्पनेला तात्काळ पाठिंबा दिला – "बास! हाच ट्रेक करूया!" आणि प्लॅन फिक्स झाला.

बाकीचे मित्र महेश, एरिक, आणि राजेश यांना सुरुवातीला काही कल्पनाच नव्हती की आम्ही नेमकं कुठे चाललो आहोत. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की, "परीक्षा झाल्यावर मसुरी फिरायला जायचं आहे." बस्स!

तर ठरलं असं की – ओंकार पाच दिवस आधी देहरादूनला परीक्षा द्यायला जाणार, आणि मग आम्ही चारजण नंतर.

ओंकार ठरल्याप्रमाणे त्याच्या परीक्षेसाठी गेला. आम्ही चार दिवसांनी आमची ट्रेन पकडली. दिड दिवसांचा प्रवास मजेत पार पडला. डब्यामध्ये एक महिलांचा ग्रुप होता, तो सुद्धा मसुरी हरिद्वार फिरायला चालला होता. त्यांच्यावर आम्ही संस्कारी मुलं असल्याची छाप पडल्यामुळे आम्हाला जेवण्याच्या वेळी त्यांनी सोबत आणलेली भाकरी, ठेचा, चटणी असे पदार्थ भेटु लागले.

ट्रेन वेळेवर हरिद्वारला पोहचली. स्टेशनवरच एका सफाई कामगाराला विचारल तर त्याने आंघोळीची सोय करुन दिली. स्टेशनच्या बाहेर नाश्ता झाल्यावर दोन तीन ठिकाणी बरीच घासाघीस करुन इसमे और कुछ कम हो सकता है क्या महेशने बोलुन बोलुन तीन स्कुटी भाड्याने घेतल्या आणि निघालो देहरादुनला.

हरिद्वारवरुन देहरादून जेमतेम ४० किमी. एकतासात आम्ही ओंकार जिथे आमच्यासाठी वाट बघत उभा होता तिथे पोहचलो.  देहरादुनला ओंकारसोबत जेव्हा नजरानजर पडली तेव्हा १५०० किमी लांब मित्राला बघुन आमच्यातला एक जण अतिउत्साहात सरळ गाडीवरुनच गळाभेट करायला गेला. पण ही गळाभेट अचानक साष्टांग नमस्कार मध्ये कधी बदलली कळलंच नाही. हि भेट आम्ही कधीच विसरु शकणार नाही. ते बोलतात ना व्हॅाट हॅपन्स इन व्हेगास, स्टेज इन व्हेगास तसंच ते पण आमच्याबरोबर देहरादून मध्येच राहणार. मग आम्ही निघालो पंतवारीला जायला जे नागटिब्बा ट्रेकसाठीच पायथ्याच गाव होत. हा प्रवास ८०-९० किमी होता. पण देहरादून सोडताच आपण हिमालयाच्या कुशीत शिरतो. नागमोडी रस्ते गाडीचा वेग ३० च्यावर जाऊन देत नाही. पंतवारीला जाताना पहिल्यांदा लागलं ते म्हणजे मसुरी. मसुरी पर्यंत रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होती. मसुरीहून बाहेर पडलो आणि समोरचं दृश्य हळूहळू बदलायला लागलं – गर्द झाडी, आणि दरीच्या बाजूला खूप खोल काळसर सावल्या.

रस्ता पूर्णपणे नागमोडी वळणांनी भरलेला. एका वळणावरून पुढचं काहीच दिसत नाही – वाटतं, जणू दर वळणामागे एक नवीन दृश्य आपली वाट पाहत आहे. एकीकडे खोल दरी, दुसरीकडे उंच डोंगर – आणि मधोमध आपण. थंडीचा शिरशिरी आणणारा अंगावरुन हलकेच स्पर्श. हातमोजे घातले होते तरीही आतमध्ये हात पुर्ण गारठलेले, नाकातून थंडीमुळे पाणी वाहतय. जाम वाट लागली होती. असच यमुनेच्या काठावरुन प्रवास करत करत जेव्हा शेवटी पंतवारी गावाचं फलक दिसलं, तेव्हा हायस वाटलं. तो पर्यंत सुर्य मावळतीला आला होता. म्हणून पंतवारी ते बेस कॅम्प हा ४-५ किमीचा ट्रेक आम्हाला आता गाडीनेच रस्त्याने जावं लागणार होत, आम्ही तिथे ३ वाजता पोहचणं अपेक्षित होत. पंतवरीला पोहचल्यावर पहिल्यांदा आम्ही गरम वाफाळलेला चहा घेतला आणि त्या बरोबर पार्लेजी.

थोडा आराम केल्यावर पुढच्या प्रवासाला निघालो. पंतवारी ते बेस कॅम्प ट्रेक जरी ४ किमी असला तरी रस्त्याने हा प्रवास १३-१४ किमीचा होता. आणि पुर्ण कच्चा रस्ता. धुळ उडवत अंधारात आमच्या गाड्या चालल्या. आता येईल नंतर येईल पण रस्ता काही संपत नव्हता. त्यात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक कोल्हा दिसला. कॅमेरामध्ये त्याला टिपेपर्यंत तो गायब झाला. एरिकला तर हा प्रवास १०० किमी पेक्षाही जास्त वाटला. साडेसहा वाजता आम्ही बेस कॅम्पला पोहचलो. गेल्या गेल्या आम्हाला नाश्ता दिला, परत चहा प्यायलो. थोडं टाईमपास करुन लगेचच जेवायला बसलो आणि नऊ वाजताच झोपी गेलो. पहाटे अडीच वाजता ट्रेक साठी उठायचं होत.

वेळेवर पहाटे उठल्यावर आधी कसबस थंड पाण्याने तोंड धुतल. तयार होऊन गरमागरम पोहे खाल्ले आणि साडेतीनच्या दरम्यान आम्ही निघालो. अंधारात आमचा ट्रेक सुरु झाला. रात्री इथे आलो तेव्हा वाटत होतं की इथे आम्ही फक्त पाच जण आणि आमच्या कॅम्पला असलेले अजुन चार असे नऊच जण आहोत पण आता दिसतय की ठिकठिकाणी इथे कॅम्प लागलेत आणि प्रत्येक कॅम्प मधुन दहा बारा जण असं करत करत पुर्ण जत्था निघालाय नागटिब्बाला. आमच्या जवळ टॅार्च नव्हती. मोबईल टॅार्चच्या प्रकाशात रस्ता कापत होतो. तसही सगळेच बरोबर चालत होते तर एकदमच गरज नव्हती. ट्रेक निवांत होता, एकदम अवघडही नव्हता. तसा हा ट्रेक नवशिक्यांसाठी तसेच अनुभवी ट्रेकर्ससाठीही योग्य आहे. चालायला रस्ता चांगला होता, कदाचित रोज रोज येजा करत मोठी पाऊलवाट झाली असावी. चालता चालता लक्षात आलं की महेश शांत शांत आहे आणि तो आमच्या बरोबर चालत नव्हता. विचारुन विचारुन थकलो काय झाल, अरे सांग काय झाल तर शेवटी कळाल की त्याच्या घोरण्यावरुन त्याला आम्ही चिडवल त्यामुळे तो फुग्गा झाला होता. बरीच समजुत काढली. समजुत काढता काढता अर्ध्याच्यावर ट्रेक पण कधी पुर्ण झाला समजल नाही पण शेवटी तो स्वतःच शांत झाला आणि लागला मस्ती करायला. 

अर्धा ट्रेक पुर्ण झाल्यावर दोन रस्ते आहेत, एक जातो नाग देवतेच्या मंदीराकडे, जेथे स्थानिक लोक आपल्या जनावरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतात आणि एक शिखरावर. गाईडने आम्हाला सांगितलं की परत येताना मंदीराकडे जायच, आधी शिखर. आता खुप उभी चढ होती. थोडी दमछाक होत होती पण कठीण म्हणावी अशी नव्हती. चालताना वाटेत आम्हाला एके ठिकाणी दुरवर काहीतरी पांढर पांढर दिसल, मला वाटलं की असेल झाडातुन चांदणी प्रकाश पडलेला पण जवळ गेल्यावर कळल अरे हा तर बर्फ. एक आठवड्यापुर्वी इथे बर्फ पडुन गेला होता तर थोडाफार कोपऱ्यात जो वितळला नव्हता तो शिल्लक होता. 

साडेसहा वाजता, जवळपास तीन तासांची तंगडतोड केल्यावर आम्हाला दुरूनच नागटिब्बाचा त्रिशूळ दिसला. चला पोहचलो, पोहचलो आपण. संधी प्रकाशही आता पडायला सुरुवात झाली होती. एकदम शिखरावर झपाझप पावलं टाकत आलो. दुरवर पांढरी शाल ओढुन बसलेले हिमाच्छदित पर्वत दिसायला लागले. आम्हाला ही आता शाल, गोधडी जे काय भेटेल ते ओढुन बसु वाटत होत. एवढी भयानक थंडी. आम्ही सर्व एवढे पॅक होतो तरीही कुडकुडत होतो. फोटो काढण्यासाठी हातमोजे जरी काढले तरी हात गार पडायचे.

तशीच ती थंडी सहन करत तिथे जागा पकडुन बसलो. जशी-जशी वेळ पुढे सरकत गेली, तशी आकाशात सुरुवातीला एक हलकी नारिंगी रेषा उमटू लागली. पक्ष्यांची किरकिर, शांत वारा आणि श्वासांमधली वाफ – सगळं वातावरण जणू काही त्या एका क्षणासाठी थांबून होतं.

मग एक चमकती सोनसळी धार आकाश फाडत वर आली. तो क्षण इतका सुंदर होता की काही क्षण सगळे शब्द हरवले – फक्त नजर होती समोरच्या त्या रोषणाईवर, जी हळूहळू संपूर्ण पर्वतरांगांवर पसरत होती.

दूरवर इतर हिमालयीन शिखरं सुद्धा सूर्यप्रकाशात न्हाऊन गेली होती – जणू स्वर्गातलं कोणतं तरी दरवाजंच उघडलं होतं. त्या क्षणाला काहीच नकोसं वाटतं – ना फोन, ना गॅझेट्स, ना बोलणं. फक्त एक शांत मन आणि त्या "सूर्याच्या दर्शनाची" अनुभूती. नागटिब्बा शिखरावरचा सूर्योदय म्हणजे एका छोट्याशा ट्रेकरला मिळालेली हिमालयाचा आशीर्वाद.

एक विलक्षण रोमांच आम्ही अनुभवला. अजुनही हात बाहेर काढायचे म्हणजे जीवावर येत होत. पण त्याच परिस्थितीत फोटो विडीयो काढले. एक दोन रील बघुन ठेवले होते, ते शुट केले. आता आजुबाजुचे पर्वत मस्त सुर्यप्रकाशात उठुन दिसु लागले. ती वेळ छान अनुभवुन आम्ही निघालो. वाटेत जो काही बर्फ शिल्लक होता तेवढ्यामध्ये आम्ही खुप मजा केली. आणि आमचा परतीचा ट्रेक सुरू केला. खरंच सांगायचं तर, यावेळी आम्ही अक्षरशः उडतच आलो!

परत बेस कॅम्पला पोहचुन फ्रेश झालो. सकाळी जे थंडीने गारठलो होतो तेच आता गरम वाटु लागलं होत. तेवढ्यात स्वयंपाक तयार झाला. जेवण खरंच जबरदस्त होतं – गरम गरम राजमा, भात. हिमालयाच्या कुशीत हे सगळ्यात स्वादिष्ट जेवण वाटलं.

पोट भरल्यावर, आठवणींचं ओझं आणि समाधानाचा भार घेऊन आम्ही मसुरीच्या दिशेने रवाना झालो. एक टप्पा पूर्ण झाला होता, पण त्याच्याशी जोडलेल्या भावना मात्र अजून मनात घोळत होत्या. आता मन शांत करायचं होतं – कारण हिमालयाने आमचं मन हलवलं होतं... आता त्याला शांतपणे बसून मनात साठवायचं होतं.

Saturday, 8 March 2025

वाढदिवशी सायकलची १०० किमीची रपेट

 ह्या वाढदिवसाला काही तरी वेगळ करायचा मी विचार केला. काय कराव, काय कराव सुचत नव्हत. एकतर मी घरी एकटा होतो कारण घरचे गेले होते पंढरपूरला आणि सोमवार येत असल्यामुळे मित्र कामावर. शेवटी एक कल्पना सुचली आणि पक्की केली. महडच्या वरदविनायकाला जायचं आणि ते म्हणजे सायकल वरुन. ५० किमी एका बाजुने.

पहाटे चार वाजताच उठलो. आवरुन साडेचारला सायकल वर टांग मारली. नाही नाही, सायकल वर बसलो, मला टांग मारुन बसता येत नाही. सोसायटीच्या बाहेर निघताना, सोसायटी मंदीरातल्या गणपतीला प्रार्थना केली, सुखरूप परत आण, तुलाच भेटायला येतोय. रनकिपर नावाचा एक ॲप आहे तो चालु केला. १-१ किमी झाला की तो सांगायचा. पुढे जेएनपीटीच्या रस्त्यावर आल्यावर ट्रेलर्सची वर्दळ वाढली. निवांत कडेकडेने सायकल पुढे नेत होतो. त्या ट्रेलर्सच्या आवाजामुळे ॲपचा आवाज यायचा नाही पण अचानक शांततेत जेव्हा आवाज यायचा तेव्हा कळायचं अरे वा ३-४ किमी झाले. 

जवळपास सव्वातासाने मी पळस्पे फाट्याजवळ पोहचलो. अजुन उजाडायच होत आणि उत्साह पण होता. २१ किमी झाले होते. न थांबताच प्रवास सुरु ठेवला. शेडुंग फाटा ओलांडल्यावर मात्र एक मनातली भीती खरी झाली. रस्त्याची कडेची बाजु अचानक खाली गेली, डांबरीकरण करुन करुन त्याच्या थरामुळे एक भाग वर. सायकल आवरेपर्यंत तोल जाऊन मी गुडघ्यांवर आपटलो. वेग तसा नियंत्रणात होता त्यामुळे हळूच पडलो पण गुडघ्याला लागल हे जाणवत होत. अंधारात बघता ही आल नाही नक्की किती लागलंय. दोन मिनिट थांबलो, एक घोट पाण्याचा घेतला आणि आता माघार नाही स्वतःला बोलुन पुढे निघालो.

चौकच्या पुढे आल्यावर पुढे आता उजाडायला लागलं होतं. अजुन १२ किमीचा प्रवास बाकी होता. पाच मिनिटाची विश्रांती घेतली कारण सायकलची सीट खुपच त्रास द्यायला लागली होती. बसायलाच जमत नव्हत. पुढचा प्रवास सतत ढुंगणं थोडंसं सीटवर मागे पुढे करुन, कधी कधी उभ राहुनच पेडल मारत मारत चालु ठेवला आणि त्यात आता बरेच चढ उतरणीचे रस्ते. चढाला सायकल लागली की वाटायच का आलोय मी, का करतोय मी. सरळ गाडीने का नाही आलो. उतरण लागल्यावर हायस वाटायच. ६ किमी राहीले तेव्हा परत एक विश्रांती घेतली. आता सुर्य पुढच्या डोंगररांगातुन वर आला होता. आता पुढचा थांबा मंदीरच. ४४ किमी पार केलेत आता ६ किमी काय आहे त्या समोर. महडचा फाटा आला आणि एकदम आनंदाची लहर संचारली. तिथुन पाच मिनीटात सायकल मंदीर. साडेसात वाजता मी पोहचलो. बरोबर तीन तास लागले. सायकल मंदीरासमोरच लावली आणि दर्शनासाठी आत गेलो.

मंदीरात मोजून ३-४ जण. गाभाऱ्यात फक्त पुजारी. वाढदिवसाच्या दिवशी एवढ छान दर्शन. धक्काबुक्की नाही, मोठी रांग नाही, गाभाऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी रेटारेटी नाही. पाच मिनिटे मी गाभाऱ्यात एकटक वरदविनायकाकडे बघत उभा होतो. पुढे बाहेर येऊन बाप्पासमोर परत बसलो. मनसोक्त दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालुन बाहेर आलो. आता जाम भुक लागली होती. तिथे मंदीराबाहेर एक महिलांचा ग्रुप होता. त्यांनी फोटो साठी विनंती केली. त्यांचे फोटो काढुन मी माझ्या महडच्या नेहमीच्या ठरलेल्या हॅाटेलात आलो. मिसळपाव, वडापाव आणि एक कॅाफी. आता गुढघ्याला नक्की किती लागलय ते बघितल. जास्त खोल जखम नव्हती, वरचेवर खरचटल होत आणि थोडंसं रक्त आलं होतं पण ते ही सुकल होत. तिथेच थोडा वेळ बसुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मेसेजेसना धन्यवाद पाठवले. घरच्यांशी बोललो. समाजमाध्यमांवर महडचे आणि जखमी झालेल्या गुढघ्याचे फोटो टाकले आणि साडेआठ वाजता परतीचा प्रवास सुरु केला.




आता खरी कसोटी होती. सुर्य बऱ्यापैकी वर आला होता. ऊन सुद्धा वाढत जाणार होत. मी माझे विश्रांतीचे पाडाव आधीच ठरवले. चौकच्या पुढे पोहचल्यावर एक झाडाखाली उसाची गाडी बघुन तिथे थांबलो. इथे येईपर्यंत एक जाणवल ते म्हणजे परतीच्या रस्त्याला उतरणं जास्त आहे. बराचवेळा बिनापेडल सायकलने खुप अंतर पार केल. पण चढ लागल्यावर उभं राहुन पेडल मारत सायकल वर आणावी लागायची. त्या उसाच्या गाडीवर रस प्यायलो आणि १५ मिनिटे उसंत घेतली. आता पर्यंत माझ्या मित्रांना माझ्या गुडघ्याचा पराक्रम मी टाकलेल्या फोटो मुळे समजला होता. त्यांचे फोन सुरु झाले. कुठे आहेस आता, न्यायला येऊ का, जास्त लागलय का. त्यांना सांगितला काही नाही मी फीट आहे. पुढे शेडुंग फाट्या जवळ एक पाडाव घ्यायचा विचार होता पण छानशी जागा मिळाली नाही म्हणुन सायकल रेमटवत राहीलो. रसायनी फाट्यापासुन तर जी वाहतुक कोंडी सुरु झाली ती पळस्पे फाट्यापर्यंत. तिथे थांबायचा प्रश्नच नव्हता. मला तसा त्या कोंडीचा त्रास झाला नाही. मी बाजु बाजुने सायकल काढत पळस्पे फाटा ओलांडला. आता रस्ता मोकळा होता, तिथे सावलीत एक शहाळेवाला बघुन तिथे थांबलो. 

आता शेवटचे २० किमी राहीले होते. उत्साह पुर्ण ओसरून त्याची जागा थकव्याने घेतली होती. कधी एकदा घरी पोहचतोय असं वाटु लागल. बाजुने एखादा टेम्पो, छोटा हत्ती गेला तर मनात एक क्षणिक विचार येऊन जायचा की त्यांना बोलाव, अरे मला घेऊन जा. पण नाही घेतला संकल्प पुर्ण करायचा. एवढा पण थकलेलो नव्हतो. सकाळी जो जेएनपीटीचा रस्ता आरामात पार केला तोच आता सगळ्यात जास्त त्रास देत होता. वरती ऊन, विमानतळाच्या कामामुळे हवेत पसरलेली धुळ आणि त्यात सारखे रस्त्यावर असणारे पुल. पुर्ण दमछाक. जिथे शक्य तिथे पुल न घेता खालूनच गेलो. मनाला मजबुत करत, स्वतःलाच प्रोत्साहन देत साडे अकरा वाजता उळवेला आलो. बस थोडच राहीलय आता. फक्त तीन पुल ओलांडायचे. उळवेच्या पुलाखाली लिंबुसरबत घेतला. आता घराची खुपच ओढ लागली.

शेवटचे ते तीन पुल पुर्ण ताकदीनिशी पार केले आणि पामबीचला आलो. जीव भांड्यात पडला. हे तर आपलं नेहमीचच आता. तरीही सीवुड्स मॅाल समोर परत एकदा ऊसाचा रस घेतला आणि आलो घरी एकदाचा. साडेबारा वाजले होते. काहीतरी वेगळ केल्याचा आता अभिमान वाटत होता. सायकल घेतल्यापासुनचीच ही एक माझी इच्छा होती जी पुर्ण केल्याचा आनंद वाटत होता. बाप्पाचे मनोमन आभार मानले. आंघोळ केली आणि झोपुन गेलो.

Saturday, 29 June 2024

कोकण पर्यटन - जंजिरा आंजर्ले आणि हरिहरेश्वर




कोकण म्हटल की समोर उभा राहतो तो म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान असलेले निसर्गरम्य समुद्रकिनारे, सह्याद्रीच्या दाट जंगलातुन जाणारी वळणावळणाची रस्ते, शिवरायांनी स्वराज्याला भक्कम करण्यासाठी बांधलेले जलदुर्ग. ही यादी काही संपणारी नाही. वर्षातले बाराही महिने आपण कोकणात जाऊ शकतो. त्यामुळे कोकण आजकाल नेहमीच गजबजलेले असते. मुंबई पुण्याच्या पर्यटकांसाठी तर छोटेखानी सहल काढण्यासाठी हक्काच ठिकाण. अश्यातच डिसेंबरचा महिना चालू होता, मुलांना नाताळाची सुट्टी होती आणि ते मागे लागले बीच वर जायचंय, तर मग मी ठरवल चला जाऊया तीन दिवसांसाठी कोकणात. जंजिरा बऱ्याच दिवसापासुन बघायचच होता आणि जवळच असलेल्या दिवेआगारच्या समुद्रकिनाऱ्याविषयी ही बरच ऐकल होत, तर ठरलं मग.

पहिल्या दिवशी भल्या सकाळी आम्ही जंजिऱ्याच्या दिशेने निघालो. कर्नाळ्याच्या पुढे आल्यावर भरपेट नाश्ता केला आणि रोह्यामार्गे जंजिऱ्याला आलो. रोह्यावरुन आल्यावर वाटेत मुरुड लागत नाही पण मी सुचवेल की अलिबाग-मुरुड मार्गे जंजिऱ्याला या, कारण ह्या रस्त्याने वाटेत तुम्हाला काशीद, मरुडचा समुद्रकिनाराही लागेल. छान समुद्राचा वारा, लाटांची गाज ऐकत गाडी चालवण्याची मजा लुटाल. थोडा वेळ लागेल पण हरकत नाही. फिरायलाच आलोय ना तसं पण.

जंजिऱ्याला आम्ही भरदुपारी पोहचलो. किनाऱ्यावरुनच भरभक्कम असा पाण्यात उभा असलेला किल्ला नजरेस पडतो. लांबून पाहिल्यावर त्याचा दरवाजा मात्र नक्की कुठे आहे हे समजत नाही आणि हीच किल्ल्याची जमेची बाजु होती. बऱ्याच शिडाच्या बोटींची ये-जा चालू होती. जेवुनच आम्ही किल्ल्यावर जायच ठरवल कारण जवळपास ३-४ तास तरी जाणारच. फक्त पहिली सूचना की इकडे व्यवस्थित अशी जेवणाची सोय नाही त्यामुळे वाटेतच कुठेतरी जेवुन या आणि दुसरी म्हणजे सरकारी वाहनतळ आहे, गाडी तिथेच उभी करा नाहीतर गावातली पोर लुटायला टपलेलेच असतात. 

जेवण झाल्यावर किल्ल्याची आणि शिडाच्या बोटीची तिकिटे काढुन आम्ही बोटीवर आलो. पोहचायला पंधरा मिनिटेच लागतात पण खरा वेळ लागतो तो म्हणजे एक एक बोट किल्ल्याच्या दरवाज्याला लागुन लोकांना उतरवते त्याला. आमच्या बोटीचा नंबरच आठवा-नववा असेल. जवळपास ४५ मिनिटांनी आम्ही दरवाज्यात उतरलो. तो पर्यंत किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजुनेच बोट नंबर येण्याची वाट बघत रेंगाळत बसली. त्यावेळी एका बोटीतुन दुसऱ्या बोटीत उड्या मारत तिथले स्थानिक गाईडस किल्ल्याची माहिती सांगतात.


जंजिऱ्याची तटबंदी अजुनही भक्कम आहे. १९ बुलंद बुरूज आहेत. किल्ल्याच्या आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत. किल्ल्यावर ५९२ तोफा होत्या असे म्हटले जाते. आता बाकी बघण्यासारखं म्हणजे एक पडक्या अवस्थेतला वाडा, पाण्याचे तलाव आणि छोटे मोठ्या वास्तुंचे अवशेष आहेत. ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे भक्कम बांधकाम, आजुबाजूस समुद्र आणि ५९२ तोफा, ज्याच्या जोरावर हा किल्ला शेवटपर्यंत अजेय राहिला.

किल्ला बघुन झाल्यावर पुन्हा बोटीसाठी रांग आणि अर्ध्यातासाच्या प्रतीक्षेनंतर बोटीत प्रवेश. बोटीवरुन उतरल्यावर थोडा थकवा घालवण्यासाठी एक-एक चहा झाला, मुलांनीही वडापाव वर ताव मारला. आम्ही पण त्यांच्याबराबर गपागप खाऊन घेतल आणि दिवेआगारच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यासाठी आगरदंडा जेट्टीवर आलो. नुकतीच एक फेरी गेली होती. पुढची फेरी येईपर्यंत ताटकळत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. फेरी आली, गाड्या उतरल्या. मग एक एक करत गाड्या चढवण्यात आल्या. एकदम खचाखच फेरी भरली आणि दिघी जेट्टीच्या दिशेने निघाली. आगरदंडा ते दिघी जेमतेम २५ मिनिटाचा प्रवास. फोटोसेशनसंपे पर्यंत फेरी जेट्टीला पण लागली. गाडी फेरीवरून उतरवुन दिवेआगारला आलो. फक्त १५ किमीचा प्रवास. 

दिवेआगारला पोहचेपर्यंत अंधार पडला होता. पर्यटकांसाठी इथे मुख्यत्वे ‘होम-स्टे’ ही संकल्पना आहे. पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा खोल्या गावकऱ्यांनी आपल्या घरालगतच बांधल्या आहेत. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत. त्यामुळे दूध-दुभतेही आहे. कमर्शियल हॉटेल्स त्या मानाने कमी आहेत. आधीच एका घरगुती स्टे मध्ये मी बुकिंग केलल होत. तिथे उतरुन फ्रेश होऊन जेवावयास बाहेर आलो. खवय्यांची इथे चंगळच आहे. घरगुती रुचकर आणि चविष्ट असं कोकणी जेवण घरोघरी इथे उपलब्ध आहे. फक्त आधी सांगाव लागत. आमच्या होम-स्टेच्या काकांनीच आम्हाला एक ठिकाण जेवायला सुचवल. तिथेच आम्ही मच्छीवर मस्त ताव मारला. सुरमई, पापलेट आणि कोळंबी थाळी आणि शेवटी सोलकढी. अजुनही बोलताना तोंडाला पाणी सुटतय. पोटभर जेवण झालं आणि परत रुमवर येऊन पहिला दिवस संपवला.

दुसऱ्या दिवशी सकाळी भारताची दक्षिण काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वरला गेलो. महाराष्ट्रातली सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथेच तिच्या मुखावर हरिहरेश्वर हे तीर्थस्थान आहे. तर नदीच्या दुसऱ्या तीरावर श्रीवर्धन. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची मंदीरे देखील महत्त्वाची स्थाने आहेत. देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असेही म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. पण प्रदक्षिणा करताना भरतीचा अंदाज नक्की घ्या कारण भरतीचे पाणी प्रदक्षिणा मार्गावर येत असते. प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर काहींनी थंडगार कोकम सरबत तर काहींनी नारळाचे पाणी पिऊन थकवा घालवला आणि पुन्हा आम्ही दिवेआगारला परतलो. दुपारच जेवण दिवेआगारलाच रात्री जिथे केलं होत तिथे केलं आणि मग सुर्य उतरणीला येईपर्यंत निवांत आराम केला.

मुलांनी प्रवास सुरु केल्यापासुनच घोका चालु केला होता, “बीच कधी येणार, बीच कधी येणार?”. जंजिरा आणि हरिहरेश्वरला कसतरी त्यांना समजावुन काबुत ठेवल पण आता तर ते थांबणारे नव्हते. चार वाजताच, “आता चला, आता चला”, मग आम्ही एकदाचे दिवेआगारच्या समुद्रकिनाऱ्यावर आलो. नाताळाची सुट्टी चालू असल्यामुळे समुद्रकिनारा गजबजलेला होता. इथे बरेचसे पाण्यातले साहसी खेळांची सुविधाही आहे. सुर्य मावळेपर्यंत मनसेक्त मुलं त्या स्वच्छ पाण्यात खेळले, लाटांसोबत बागडले, त्यानंतर किनाऱ्यावर पसरलेल्या पांढऱ्या वाळुंचे किल्ले बनवले. इथल मुख्य आकर्षण माझ्यासाठी होत ते म्हणजे उकडीचे मोदक. गावातील महिला किनाऱ्यावर बंदिस्त टोपलीत उकडीचे मोदक घेऊन विकायल्या आल्या होत्या. आम्ही चवीसाठी एक एक मोदक खाल्ला आणि हा हा म्हणता जिच्याकडुन आम्ही मोदक घेत होतो तिचे सगळे मोदक संपवले. जिभेवर अजुनही त्या मोदकांची चव रेंगाळत आहे इतके अप्रतिम मोदक होते ते. अंधार पडल्यावर आम्ही रुमवर आलो. तिथल्या काकांबरोबर थोड्या गप्पा गोष्टी केल्या. तेव्हा कळले की काका उत्तम बासरी वाजवतात. जेवणं उरकल्यावर मग त्यांनी बासरी वादन करुन आमची संध्याकाळ संगीतमय केली.



तिसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही परत समुद्रकिनाऱ्यावरच्या फेरफटक्याने केली. म्हणजे मावळतीचा आणि सकाळचा असे दोन्ही किनारे अनुभवले. तिथून परत आल्यावर रुम खाली केल्या आणि आज थोडस अस्सल कोकणी नाश्ता करावा म्हणून आंबोळी, दडपी पोहे खाल्ले. मग आम्ही आलो ते सुवर्ण गणेश मंदीरात ज्याच्या मुळे दिवेआगार खरतर प्रसिद्धीझोतात आला. १७ नोव्हेंबर १९९७ रोजी गावातील द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलीस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा मुखवटा व २८० ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. ही पेटी मंदिरात ठेवण्यात आली. दुर्दैवाने हा ठेवा २४ मार्च २०१२ रोजी चोरीला गेला. नंतर आरोपी सापडले. वितळवलेले सोने मिळाले; पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही. पुन्हा त्या सोन्याने मुखवटा तयार केला आणि मंदीरात दर्शनासाठी ठेवला. गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले. दिवेआगरचा शांत, सुरक्षित सागरकिनारा पर्यटकांना सापडला. बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही मुंबईचा रस्ता धरला.

तर अशी ही तीन दिवसाची छोटी सहल तुम्हीही नक्कीच करा.

Friday, 7 June 2024

किलकिलाट आणि त्याचा भाग होण्यासाठीचा (फसलेला) प्रयत्न

किलकिलाट - म्हणजेच पक्ष्यांचा कल्लोळ. ज्याचा आपल्याला कधीकधी खुप त्रास होतो. जर आपण एखाद्या गोंधळाचा भाग नसलो तर आपल्याला त्याचा त्रास होतो. ह्यावर उपाय एकच की स्वतः त्या गोंधळात सामील व्हा आणि मजा करा. तर असाच आमच्या आंजर्लेच्या सहलीत घडलेला एक किस्सा.

आम्ही आलो होतो आंजर्ले फिरायला. आम्ही म्हणजे माझी दोन पिल्लं, रिआ, रेयांश आणि माझे मित्र महेश, सिद्धेश. पहाटे ५ वाजता आम्ही मुंबईवरुन आंजर्लेसाठी निघालो होतो. त्यानंतर इकडे पोहचायला जवळपास ७-८ तास आणि मग संध्याकाळी २-३ तास समुद्राच्या पाण्यात मनसोक्त धमाल, ज्यामुळे जाम थकवा आला होता. आता कधी एकदा रात्री बिछान्यावर पडतोय अस झाल होत. त्यात आम्ही बाहेर जेवायला गेलो, तेवढच थोडस आंजर्ले फिरता येईल आणि परत येताना छान आईसक्रिम खाऊन आम्ही आमच्या हॅाटेलात आलो. रुमवर जात असताना बाजुच्या रुमची मंडळी बाहेर बाल्कनीमध्येच काहीतरी खेळत बसली होती. रुममध्ये आल्यावर रिआ तर लगेच गाढ झोपुन गेली. आम्ही पण पहुडलो तोच बाल्कनीत खेळणाऱ्यांचा डाव चांगलाच रंगला होता कारण ती अनावश्यक तेवढ्या आवाजात जोरात किंचाळत होती, खिदळत होती. अर्थात ते ही मजामस्ती साठीच आले होते तर त्यांना आपण बोलण ही बरोबर नाही की आवाज करु नका. पण त्यामुळे आम्हाला काय झोप येत नव्हती.

“अरे काय ह्यांचा आवाज! किती तो किलकिलाट!” - महेश पडल्यापडल्या

एकदुसऱ्याच बोलण नेहमी कापायचच ह्या आमच्या ठरलेल्या अलिखित नियमानुसार, “तु त्या किलकिलाटचा भाग नाहीये म्हणुन तुला त्याचा त्रास होतो, जर तेच तु खेळत असता तर तु त्यांच्यापेक्षा जोरात आवाज करत उड्या मारल्या असत्या”

“अस का, चल ना मग! आपण पण त्या किलकिलाटचा भाग होऊ” महेशने लगेच मला आव्हान दिल.

“बर, चल” मी पण काय घाबरतो का मग.

अस बोलुन मी बाहेर आलो, पाठोपाठ महेश, सिद्धेश. अरे, आणि हे माझ पिटकुलं कुठुन आल, रेयांश अजुन झोपला नव्हता. तो ही चालला मजा बघायला.

आम्ही बाल्कनीत आमच्या रुमच्या दारासमोर उभे होतो. बाजुचे त्यांच्या रुमसमोर बाल्कनीत खेळत होते.

थोड २-३ मिनिटे आम्ही तिथेच थांबलो. रेयांश तेवढ्यात, “इथे का उभा आहेस बाबा? काय करायच आहे?”

महेश पण त्यात, “जा ना, आता जा. हो त्या किलकिलाटाचा भाग”

“हा हा जातो” बोलुन थोडस धाडस करुन मी त्यांच्या जवळ गेलो. माझ्या मागे मागे हे सगळे रांगेत येतच होते.

शेवटी मी थोडा अंदाज घेतला आणि विचारलं, “काय खेळताय?” त्यांचा एवढा गोंगाट होता की त्यांना ऐकु गेल नाही. सापशिडी-ल्युडोचा फासा असतो ते एकएक करुन टाकत होते आणि खेळणाऱ्या प्रत्येकाकडे एक कागद होता, एवढ मी तो पर्यंत बघितल.

परत मी विचारल, “काय खेळताय?”

तेव्हा एकीने सांगितल, “फासे टाकायचे, ज्याचे ६ पडले, त्याने कागदावर आकडे लिहायला सुरु करायचे, जो पहिला १०० पर्यंत पोहचेल तो जिंकला.”

“बर, बर”

मी अजुन थोडा वेळ घेतला. आता खेळ पुर्ण समजला. मुख्य उद्दिष्ट होत की किलकिलाटाचा भाग व्हायचा आहे. त्यासाठी स्वतःला त्या खेळात एक खेळाडु म्हणुन बसाव लागणार होत. पण अस कस बोलणार, मला खेळायच आहे. अश्या वेळी आपल ब्रम्हास्त्र बाहेर काढायच मी ठरवल.

“रेयांश, खेळायच का तुला?”

“नाही” क्षणाचाही विचार न करता रेयांशच उत्तर आलं. एका झटक्यात माझ ब्रम्हास्त्र फुसका झाला.

“अरे, खेळ की, सोप्पा आहे.” मी त्याची मनधरणी करु लागलो.

“अरे हा बाळा, खेळायचा का तुला, ये खेळ, काही नाही तुला फक्त फासे फेकायचे आहेत” त्या कुटुंबातल्या एकीने रेयांशला बोलवल.

मस्त मस्त ब्रम्हास्त्र एकदमच फुसका नाही जात आहे. पण हा माझा बाळा काय तयारच होईना. “नाऽऽऽऽऽही.”

त्याला हळुच बोललो मी, “अरे तु फक्त हो बोल, बाकी मी सांभाळतो.” पण नाही म्हणजे नाही. माझ्याबरोबर महेश पण रेयांशला बोलत होता, “अरे बाबा खेळेल, तु हो बोल”. पण ते काही तयार होईना. तेवढ्यात त्यांच्या खेळात एक जण जिंकला आणि ते खेळ आटोपण्याच्या तयारीत आले.

आता काय! चला परत. किलकिलाटाचा भाग व्हायच राहुनच गेलं. रेश्मा, माझी एक मैत्रीण मागे एकदा बोललीच होती, “हा रेयांश तुझी इज्जतच काढत असतो सगळ्यांसमोर.” त्याचीच आज पुनरावृत्ती.

रुम मध्ये परत आलो. त्यांचाही खेळ आटोपला होता तर शांत झाल होत बाहेर. चला आता झोपुया.

पण नाही! इथे तर नवीनच डाळ शिजायला लागली.

“काय रे दादा, किलकिलाटाचा भाग व्हायला गेला होता ना? त्यांनी तुला साधा भाव दिला नाही.” महेशने सुरुवात केली

सिद्धेशने पण लगेच त्याची रीऽऽ ओढली, “हो ना! मी हा अपमान अजिबात सहन नसता केला”

“अरे कुठला अपमान? काय भाव नाही दिला? सांगितल की त्यांनी विचारल्यावर.” मला काही कळेचना.

 “पुर्ण दुर्लक्ष केल त्यांनी तुझ्याकडे, आधी विचारल तु, काय खेळताय तर त्यांनी सांगितल नाही, मी तर तसाच मागे आलो असतो पण तु तिथच उभा राहुन सारख सारख विचारत होता म्हणुन वैतागुन त्यांनी सांगितल असेल तुला, चार वेळा विचाराव लागल तुला”

“काही पण, चल पळ! दुसऱ्यांदा विचारल तेव्हा सांगितल आणि मुख्य म्हणजे विचारल ना त्यांना. आता ह्या रेयांशने दगा नसता दिला तर खेळलो पण असतो”

“नाही तु चार वेळा विचारल”

“दोन वेळाच विचारल”

शेवटी हाच लुटुपुटुचा वाद आमचा पुढे चालु राहिला. महेश आणि सिद्धेश, दोघे एका बाजुला झाले आणि मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते. अगदी माझी नक्कल वगैरे करुन की मी कसा चालत गेलो, कस विचारल वगैरे वगैरे. पण ते सगळ खोट आहे हे तुम्ही जाणताच.

बर हे आंजर्लेला थांबल नाही. परत माघारी आल्यावर महेशने त्याच्या पद्धतीने हे खोट (हो हो, साफ खोट, मी लिहतो आहेना हे) बाकीच्या मित्रांमध्ये पसरवायला लागला. जाऊद्या आता. आपलच नाणं खोट निघाल तर दुसऱ्यांना काय बोलणार.


Sunday, 24 March 2024

खोल दरीत घेतलेली एक साहसी उडी आणि ….

शेवटी मी एकटाच निघालो माझ्या साहसी सहलीवर, ऋषिकेशला. तस एकट्यानेच जायच अस काही ठरवले नव्हते पण बरोबर कोणीच यायला तयार नाही म्हणुन आपण आपली सहल रद्द का करायची? आणि निघालो.

बत्तीस तास मुंबईवरून रेल्वे प्रवासकरुन हरिद्वार गाठलं. स्टेशनच्याच बाहेरुन एक स्कुटी दोन दिवसासाठी भाड्याने घेतली. कोण बसच्या वेळा सांभाळत बसणार आणि परत लोकल फिरण्यासाठी रिक्षा शोधत बसणार. आपली स्कुटी असलेली कधीही चांगली. 




स्कुटीच्या टाकीत पेट्रोल आणि माझ्या टाकीत आलु पराठे भरुन निघालो. फक्त पंचवीस किमीचा प्रवास आणि रस्ता पण चकचकीत तर आरामात हिमालयाचे प्रवेशद्वार असलेल्या आध्यात्मिक आणि योग राजधानी - ऋषिकेशला पोहचलो. ऋषिकेशला पोहचताच पुर्ण पहाडी भाग सुरु झाला, गाडी घाट रस्त्यातुन जाऊ लागली. नुकताच पाऊस पडुन गेला होता त्यामुळे रस्ते पण ओले झाले होते. एका बाजुला डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजुला गंगा नदीला सोबत घेऊन मी माझ्या सहलीचा जो मुख्य उद्देश होता ते करायला म्हणजेच बंजी जंपिंग साईटला पोहचलो.

तिथे पोहचुन सगळे त्यांचे सोपस्कर पुर्ण केले, जे की जंपची माहीती घेणे, जंपिंगच्या वेळी काय करावे, काय करु नये त्याचबरोबर जुजबी  आरोग्याविषयी माहीती देणे. ह्या नंतर तिथुन मग मी उडी मारतात त्या जागेवर आलो. सुरक्षेसाठी हार्नेस चढवले. मला ज्या काही परत छोट्या शंका होत्या त्याच निरसन करुन घेतल. मुख्य मला भीती होती ती पायला झटका बसण्याची पण त्यांनी सांगितल की असं काही होत नाही. आपल्या वजनाच्या हिशेबाने बंजी (म्हणजेच ताणत जाणारी दोरी) लावलेली असते जी झटका बसुन देत नाही.

आता मी एकदम टोकावर आलो. मला वाटल होत  की थोडी भीती वाटेल पण त्यावेळी मला आठवलं ते म्हणजे अरे कॅमेरा कुठय. कॅमेरामध्ये मी दिसतोय का?  मग कॅमेरामनकडे हात दाखवुन उडी मारयला तयार झालो. एक.. दोन… बंजी…

याहुहुहुहुहु……….. मागुन बंजी बोलताच स्वतःला झोकुन दिल मी त्या दरीत १०० मीटर उंचीवरुन. वेग वाढत वाढत गेला. आकाशातून सुसाट पडण्याचा तो अनुभव खतरनाकच. आता खाली नदीत पडतोय की काय असं वाटत असतानाच ताणत आलेल्या त्या दोरीने परत वर फेकल. बिलकुल झटका बसला नाही. परत खाली खाली खाली आणि परत वर. असं २-३ वेळा झाल्यावर मी स्थिर झालो. हळुहळु मला खाली उतरवल. सगळ मिळुन १ मिनिटाचा खेळ पण आयुष्यभरासाठी पुरुन उरणारा. खाली उतरल्यावर मला माझ्यात धाडस आहे अर्थाच बॅज दिल गेल आणि एक पाण्याची बाटली.

तिथुन छोटा ट्रेक करुन परत त्यांच्या कार्यालयात आलो. माझा जंपिंगचा विडीयो तयारच होता. तो बघुन स्वतःलाच बोललो, मस्त बसलीये जंप. विडीयो घेतला, प्रमाणपत्र घेतल. थोडस काहीतरी खायचं म्हणुन सॅंडविच खाल्ल आणि तिथुन निघणार तोच गाराचा जोरदार पाऊस. जवळपास ३ तास तो चालु होता. आता अडकतोय की काय इकडेच अस वाटत असताना सुदैवाने तो कमी होत गेला आणि रिमझिम पावसातच परत ऋषिकेश शहराच्या दिशेने कुच केली. वाटेत पाऊस पुर्ण थांबला पण हवा थंड होती. हात पुरते गारठले होते. रस्त्यातच एका ठिकाणी थांबुन गरमागरम चहा आणि बनमस्का घेतला. 




ऋषिकेशला पोहचुन पहिल्यांदा मस्त गरम पाण्याने आंघोळ केली. शरीराला गरम पाण्याचा शेक देऊन जरा हायस वाटल आणि तयार होऊन त्रिवेणी घाटावरच्या गंगा आरतीसाठी गेलो. तिथे गेल्यावर कळाल की ऋषिकेशला आध्यात्मिक राजधानी का म्हणतात ते. अगदी मन प्रसन्न करुन टाकणार आल्हाददायक वातावरण. सहा वाजता सुरु झालेली आरती भाविकांच्या भक्तिमय वातावरणात १५-२० मिनिटे चालली. नंतर राम-कृष्णांच्या भक्तीगीतांच्या किर्तनात सगळे छान अर्धातास दंग होऊन नाचले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करुन ऋषिकेशमधले इतर ठिकाणे फिरलो. त्यात लक्ष्मण झुला, राम झुला, गोवा बीच, आणि योग साधनेसाठी प्रसिद्ध असलेल परमार्थ निकेतन आश्रम. थोडावेळ गंगा नदीच्या किनारी शांत बसुन वेळ घालवला आणि जवळच्या प्रसिद्ध चोटीवाला मध्ये जेवुन हरिद्वारला निघालो.




हरिद्वारला पोहचुन, स्कुटी परत केली. तिकडुन हर की पौडी म्हणजेच विष्णुचे चरण जे की हरिद्वारमधील गंगेच मुख्य घाट आहे तिथे निघालो. ह्या ठिकाणाला हिंदु संस्कृती मध्ये धार्मिक दृष्ट्या खुप पवित्र मानले जाते कारण समुद्रमंथनातुन निघालेले अमृताचे काही थेंब इथेही गंगा नदीत पडले होते. आणि इथेच गंगा नदी हिमालयाच्या पर्वतरांगा सोडुन मैदानी भागात प्रवेश करते. इथे गंगा नदी मध्ये स्नान केल्याने आपले सगळे पाप धुऊन निघतात अशी मान्यता आहे. मलाही माझे पाप धुवायचे होते पण थंडी इतकी की मी विचार केला काही काळ पाप घेऊनच जगुयात. बाकी अबालवृद्ध धडाधड नदीत डुबक्या घेत होते. कस काय त्यांनाच माहीत. मी आपली आरतीसाठी जागा पकडुन बसलो. बरोबर ६ वाजता आरती सुरु झाली. मुख्य गंगा आरती करुन सगळे पांगले. मी थोड्स मार्केट फिरुन आरामात वेळ घालवुन हॅाटेलात जेवुन परत रुम वर आलो.

सकाळी साडेसात वाजता परत घाटाच्या दिशेने निघालो. चहा नाश्ता करुन घाटावर आलो. छान ऊन पडलं होत आणि वातावरण कालपेक्षा उबदार होत. आता परत कधी एवढ्या लांब यायला जमेल? तर करुया धाडस आणि हर हर महादेव बोलुन घेतली डुबकी. अजुन दोनवेळा डोक्यावरुन पाणी जाईपर्यंत नदीत डुंबलो, जेणेकरुन सगळे पाप नदीत वाहुन जातील. बाहेर आल्यावर सुर्यदेवांच्या कृपेमुळे थंडी वाजली नाही. कपडे घालुन परत घाटावर फेरफटका मारला आणि रुम वर आलो. तयारी केली आणि आता परतीची वेळ आलीच होती. सामान घेऊन स्टेशनला पायीच निघालो. स्टेशनच्या समोरच एका हॅाटेलात जेवुन घेतलं. स्टेशनवर पोहचल्यावर कळाल की ट्रेन २ः३० तास उशीरा आहे.





वाट पाहण्याशिवाय आता काहीच पर्याय नव्हता. फलाटावरच एक बाकडा पकडुन मोबाईलमध्ये काढलेले फोटो/विडोयोज बघत बसलो. माझी सोलो ट्रिप यशस्वी झाल्याचा आनंद होत होता. आता परत ३२ तासांचा परतीचा प्रवास. पुढली ट्रीप कुठे काढायची हेच शोधत असताना ट्रेन आली आणि मुंबईच्या दिशेने निघालो.