Sunday, 27 September 2026

केदारनाथ — एक Trek, जो Trek नव्हताच

महाभारत संपल्यावर पांडव महादेवांना भेटायला गेले. पण महादेव त्यांच्यावर रुष्ट होते आणि ते नंदीचं रूप घेऊन हिमालयात लपून बसले.

पांडवांनी खूप परिश्रमानंतर त्यांना शोधलं. पण पांडव आपल्याला शोधत आहेत हे बघून नंदीच्या रूपातील महादेव जमिनीत लुप्त होऊ लागले. तेव्हा भीमाने पळत जाऊन नंदीची कुबड पकडली आणि तो भाग जमिनीवर राहिला, तर पूर्ण नंदी जमिनीत लुप्त झाले.

हीच नंदीची कुबड म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक — केदारनाथ.

ह्याच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचं म्हणजे जवळपास २१ किलोमीटर चालत जायचं, आणि तीही बहुतांश चढाई.

भक्तांसाठी श्रद्धास्थान, एक पवित्र यात्रा आणि चार धामांपैकी एक…

पण माझ्यासाठी? तो होता एका मस्त मोठ्या Trek चा destination!

मी दर महिन्याला एक Trek करत असतो. त्यामुळे केदारनाथची २१ किलोमीटरची चढाई म्हणजे एक वेगळा Trek अनुभव असेल, हिमालयातला निसर्ग अनुभवता येईल, असं मला वाटलं.

त्यातच मागच्या वर्षी आई-बाबा केदारनाथला जाऊन आले होते. त्यांच्याकडून बरंच काही ऐकलं होतं. आणि हळूहळू माझा Instagram Feed सुद्धा केदारनाथच्या Reels आणि Posts ने भरायला लागला.

अल्गोरिदम काहीही बदलो… पाच-सहा दिवसांनी परत —

केदारनाथ! केदारनाथ! केदारनाथ!

मग एक दिवस मनात आलं —

“चल, केदारनाथ करूयाच!”

सह्याद्रीमध्ये दर महिन्याला भटकंती असतेच. नुकतेच माझे सलग ३६ Trek पूर्ण झाले होते. हिमालयातही एक Trek केला होता, पण तो दोन वर्षांपूर्वी.

म्हटलं…

“चला, आता एक मोठा Trek करूया. सगळेच केदारनाथला जातात, तर आपण Trek म्हणून जाऊया. हिमालयाचा निसर्ग अनुभवूया.”

माझ्यासाठी तो खरंच फक्त एक Trek होता.

प्लॅन बनवला, तयारी केली, मित्रांना विचारलं… एक-दोन करत अजून १४ जण सोबत जोडले गेले आणि आम्ही केदारनाथच्या पायथ्याशी पोहोचलो.


केदारनाथच्या पायथ्याशी म्हणजे सोनप्रयाग/सीतापूर, तिथून लोकल वाहनाने गौरीकुंड आणि गौरीकुंडपासून सुरू होतो खरा Trek.

वाहनातून उतरलो आणि सगळ्यांनी आधी काठ्या घेतल्या.

मी विचार करत होतो —

“कशाला? आपल्याला काय गरज? आपण इतके Trek करतो!”

पण Instagram Reels मध्ये बघितलं होतं की सगळ्यांकडे काठी असते आणि फोटोमध्येही कुल दिसेल, म्हणून मी पण एक घेतली.

त्यानंतर आली मुख्य गोष्ट — बुटांना कव्हर!

पावसामुळे चिखल, आणि त्यात घोड्यांचं… बरंच काही… त्यामुळे बूट वाचवण्यासाठी कव्हर घातले. ज्यामुळे बुट ओले होणार नाही.


आणि मग…

सुरू झाला आमचा Trek!

सुरुवात अगदी माझ्या नेहमीच्या सगळ्या Trek सारखीच झाली.

पहिला १ किलोमीटर थोडी धाप लागली, शरीर गरम होईपर्यंतची. २१ किमी म्हणजे अर्धमॅरेथॉनच. चार वेळा केलीये मी… मग काय अवघड आहे?

आम्ही १५ जण मागे-पुढे एकत्रच चालत होतो.

२ किलोमीटर झाले…

मग सगळ्यांनी आपापला वेग पकडायला सुरुवात केली.

कोणी पुढे, कोणी मागे…

आणि मी माझ्या नेहमीच्या Trek-mode मध्ये.


पण या Trek मध्ये एक गोष्ट वेगळी होती…

हिमालय!

रस्त्याच्या एका बाजूला उंचच उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, मध्येच दिसणारी खळाळत जाणारी नदी आणि अचानक एका वळणावर कोसळणारे धबधबे.

लांबवर कुठे धुकं डोंगरांना अलगद कवेत घेत होतं, कुठे हिरवाई अक्षरशः डोळ्यांना भरून येत होती.

पाऊस, ढग, धबधबे, नदीचा आवाज आणि त्या सगळ्यांच्या मध्ये चालणारे आम्ही…

Trek तर होता… पण निसर्ग त्याहून मोठा अनुभव देत होता.

फोटो काढत, गप्पा मारत, निसर्ग अनुभवत पायपीट सुरू होती.

चार किलोमीटर झाल्यावर आम्ही सहा जण बऱ्यापैकी पुढे आलो होतो.

चालताना नेहमीच्या गप्पा मारून झाल्या, आता बोलायलाही काही नवीन विषय उरले नव्हते.

मग काय… रस्त्यातून समोरून येणाऱ्या, बरोबर चालणाऱ्या प्रत्येकाला अभिवादन करायला सुरुवात केली.

“हर हर महादेव…”

“जय भोले…” 

कधी समोरूनही तोच आवाज यायचा.

आणि त्या क्षणी जाणवायचं…

आपण एकटे नाही.

सहा किलोमीटर झाले आणि थोडा थकवा जाणवायला लागला.

आणि मग आला…

रामबरा पूल.



इथून पुढे समोर दिसत होती एक लांबच लांब चढाई.

याचे कितीतरी Memes मी आधीच Instagram वर पाहिले होते —

“रामबरा पुलानंतर महादेव नाही, यमराज दिसतात!”

पण माझा आत्मविश्वास अजूनही तसाच होता.

“काय एवढं? ३६ Trek केलेत आपण. हा डोंगर दिसतोय मोठा, पण अर्ध्या तासात होऊन जाईल.”

थोडी विश्रांती घेतली. मॅगी, भजी, लोकल सरबत…

२०-२५ मिनिटांचा मस्त ब्रेक.

आणि मग रामबरा पूल ओलांडला.

माझा अंदाज साफ चुकला.

खालून जेवढी चढाई दिसत होती तेवढी चढून आलो…

तर समोर अजून एक.

ती चढलो…

तर अजून एक.

आणि त्यापुढे पुन्हा एक.

तेव्हा जाणवलं —

Instagram चे Memes खरंच होते! 😂

आता मात्र पाय सांगायला लागले,

“बस… आता नाही जमणार.”

रामबारा पुलाच्या आधी असलेला आत्मविश्वास थोडासा डळमळीत व्हायला लागला पण मनाला खंबीर ठेवत स्वतःलाच सांगत होतो,

“अरे, चालत राहा. एवढं आलोय म्हणजे आता संपतच आला.”

आणि या सगळ्या चढाईत अजून एक गोष्ट आमची परीक्षा घेत होती…

घोडे आणि खेचर!

त्यांचे मालक २-३ खेचरांना अक्षरशः पळवत आणायचे की कधी वाटायचं,

“हा आता आपल्याला धडकणार!” 

कधी इतक्या जवळून जायचे की आपल्याला वाटायचं,

“आता गेलो आपण दरीत!” 

कधी त्यांच्यासाठी बाजूला व्हायचं, तर कधी त्यांच्या मागे अडकून चालावं लागायचं. 

चढाईचा त्रास वेगळा आणि या घोडे-खेचरांची traffic वेगळीच. 

पण खरं सांगायचं तर, त्यांच्यामुळे हा प्रवास अजून वेगळा झाला. शेकडो लोक, घोडे-खेचर, जय भोलेच्या घोषणा, पावसाने ओले झालेले रस्ते आणि समोर सतत उभा असलेला हिमालय…

केदारनाथची वाट म्हणजे फक्त चढाई नव्हती; ती स्वतःमध्येच एक वेगळी दुनिया होती.

आणि मग सुरू झाले माझे नेहमीचे Mind Games.

५ किलोमीटर बाकी…

“एवढंच ना? घरापासून इथपर्यंत चालायचं आहे. रोजचं काम आहे हे.”

३ किलोमीटर बाकी…

“मी रोज ३ किलोमीटर १५ मिनिटांत धावतो. यात काय मोठं?”

असं स्वतःला समजावत, शरीर अक्षरशः खेचत पुढे जात होतो.

पार जिरली होती माझी.

आणि तेव्हा पहिल्यांदा मनात आलं —

“साधा Trek समजण्याची मी खूप मोठी चूक केली.”

पण आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता.

फक्त २ किलोमीटर बाकी.

घोडापडाव आला आणि तिथून रस्ता थोडा मोकळा झाला. खेचरं, घोडे थांबले होते.

आता शेवटचा टप्पा…

फक्त १ किलोमीटर बाकी.

आणि अचानक…

समोर काहीतरी दिसलं.

शुभ्र बर्फाने झाकलेले हिमालयाचे पर्वत.

आणि त्याच्या कुशीत होता केदारनाथ मंदिराचा कळस.

 तो कळस त्या प्रचंड पर्वतरांगांसमोर किती छोटा दिसत होता…

पण त्या वेळी माझ्यासाठी संपूर्ण हिमालय त्याच कळसाभोवती उभा आहे, असंच वाटत होतं.

मंदिराचा कळस दिसला त्याक्षणी डोळ्यांतून पाणी सुरू झालं.

का?

मला आजही माहीत नाही.

आणि ते थांबायलाच तयार नव्हतं.

एवढे Trek केले.

एवढे किल्ले चढलो.

एवढे डोंगराचे माथे गाठले.

पण ह्या मंदिराचा कळस पाहून जे काही आतून हललं…

ते याआधी कधीच अनुभवलं नव्हतं.

आज हे लिहितानासुद्धा अंगावर शहारे आलेत.

कारण तो कळस अजूनही डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट दिसतोय…

मंदिराजवळ पोहोचलो…

आणि पायरीवर आपसुकच डोकं टेकलं.

त्या क्षणी काही मागावंसंही वाटलं नाही.

फक्त…

“महादेव… मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद.”

थोडा वेळ तिथे बसलो.

श्वास स्थिर केला.

नंतर मंदिरात दर्शन घेतलं.


मंदिराच्या मागे आलो आणि तिथे ती प्रचंड भीमशीला दिसली.

२०१३ च्या त्या प्रलयाची आठवण झाली.

ज्या पुरात केदारनाथचं जवळपास संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं, त्या प्रचंड पाण्यासोबत दगड-मातीचे लोंढे आले होते.

पण त्या सगळ्यातही…

केदारनाथ मंदिर उभं राहिलं.

मंदिराच्या मागे आलेली ही प्रचंड भीमशीला मंदिराच्या अगदी मागे थांबली आणि तिच्यामुळे पुराचा प्रवाह दोन बाजूंनी वळला, अशी स्थानिक श्रद्धा आहे. त्या प्रलयात मंदिराच्या मुख्य रचनेने मात्र मोठा आघात सहन करूनही आपली जागा सोडली नाही.

आज त्या मंदिराकडे पाहताना एकच विचार मनात येतो —

ज्याने एवढ्या मोठ्या प्रलयातही आपलं अस्तित्व टिकवलं, तो आपल्याला या २१ किलोमीटरच्या चढाईत कसं काय सोडणार?

ज्या अट्टहासाने मी हा Trek करायला निघालो होतो…

तो अट्टहास त्या एका दर्शनाने पूर्ण झाला.

आतापर्यंत मी सतत स्वतःला पटवून देत होतो की हा फक्त एक Trek आहे.

पण आता…

मी हरलो, मन जिंकलं.

हा फक्त Trek नाहीये… तो कधीच नव्हता.

तो फक्त केदारनाथकडे जाणारा रस्ताही नव्हता.

तो होता एका सर्वोच्च शक्तीकडे जाणारा प्रवास.

आणि त्या क्षणी एक गोष्ट अगदी मनापासून जाणवली…

मला वाटत होत —

हा Trek मी Plan केला.

पण नाही…

Plan त्यानेच केला होता.

मला वाटलं —

मित्र माझ्यासोबत आले.

पण नाही…

त्यानेच आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं होतं.

मला वाटलं —

मी केदारनाथकडे चालत होतो.

पण कदाचित…

महादेवच आम्हाला आपल्याकडे बोलवत होते. 🔱

कदाचित म्हणूनच…

थकलेल्या पायांनीही चालणं थांबवलं नाही.

कारण काही प्रवास आपण ठरवत नाही…

ते आपल्यासाठी ठरवलेले असतात.

आणि काही Trek…

आपण पूर्ण करत नाही.

ते आपल्याला पूर्ण करून जातात.

हर हर महादेव! 🙏🔱




No comments:

Post a Comment