तंबुत पहिल्यांदाच झोपायचा अनुभव, आदल्या दिवशी तसही भल्या पहाटे प्रवासाला केलेली सुरुवात आणि दिवसभराच्या मौजमस्तीमुळे आलेला थकवा तर काय मस्त झोप लागली तंबुत. सकाळी पहाटे लवकर उठुन किल्ल्यावर जायचा बेत तंबुतल्या उबदार वातावरणाने कधीच धुळीला मिळवला होता.
कसेबसे आम्ही ८:३० वाजता नाश्ता करुन तयार झालो. रोहीडागडाची चढाई तशी फार अवघड नाही. १:३० तासात किल्ल्यावर पोहचतो माणुस. किल्ल्यावर जायला गावात जाऊन रस्ता आहे.
पण मागेच टेकडी आहे, किल्ला पण दिसतोय तर आम्ही विचारल, “काल त्या टेकडीवर गेलो होतो तिथुन नाही का रस्ता”
”तिकडुन पण जाता येईल पण गावातुन गेला तर बर होईल”
“अरे! इथुन पण आहे रस्ता तर इथुनच जातो की, इथुनच ट्रेक सुरु होईल, रस्त्याने कशाला जायच”
ते आम्हाला तरी सांगत राहीले की जाऊ शकता पण गावातुन जावा. गाडी घेऊन जावा आणि गावातल्या शाळेजवळ लावा, सोप पडेल.
पण आम्ही त्या टेकडी वरुनच सुरुवात केली. दिसायला समोरच तर दिसतोय की किल्ला. ह्या आधी तर आम्ही कळसुबाई पण रात्रीच्या अंधारात सर केलाय तर मग हा आरामात होईल. काल ज्या जागेवर गेलतो तिथं पर्यंत तर आरामात पोहचलो पण आता समोर किल्ला तर दिसतोय पण पायवाट कुठली घ्यायची. तिथं आसपास कोणी विचारयला पण नाही. आम्ही आडवाटेने चाललो होतो तर तिथे कशाला कोण असेल.
हां ही पायवाट जाईल किल्ल्याला असा निर्धार करुन आम्ही एक पायवाट निवडली. थोड पुढे गेलो आणि ती पायवाट गवतांमध्ये गुडुप.
आत्ता काय करायच, अरे ती बघ वरुन दिसतेय एक पायवाट, चला तिकडे. अस करुन ती पकडली, ती पण थोडीसी पुढे जाऊन गायब. नक्की पायवाटा आहेत की असच आम्ही पायवाट समजतोय ते ही कळेना.
एकतर त्या डोंगरावर गवत सगळ सुकलेल, नाही म्हटल तर चांगल गुडघाभर वाढलेल ते गवत आणि त्याच्या काड्या पायाला जाम टोचायला लागल्या. घातलेल्या बुटात त्या तुटुन तळपायांना तर जाम त्रास देऊ लागले.
एका ठिकाणी बसुन शुज काढुन मी ते सगळ साफ केल तर पुढे पाचच मिनिटात नवीन गवत त्यात घुसुन मला त्रास द्यायला मोकळे
कसबस आम्ही त्याची सवय करुन घेतली आणि मिळेल त्या पायवाटेने, हीच पायवाट किल्ल्याला जातेय अस ठरवुन पुढे जात राहीलो. अजुन १५-२० मिनिट चालल्यावर आमच्या पुर्ण लक्षात आल की आता आपण रस्ता पुर्ण चुकलोय. तरी आम्ही त्या किल्ल्याच्या डोंगरालाच वळसा मारत होतो. डोंगराच्या एका कोपऱ्यात थोड्या विश्रांतीसाठी बसलो. पावसाळयात मस्त धबधबा होत असेल त्या जागेवर. १० मिनिटाचा आराम करुन पुढे निघालो.
“अरे हे बघ इथुन वर जायला रस्ता दिसतोय, इथुन वर गेलो की आपल्याला तो मुख्य रस्ता लागेल”
सगळ्यांना ते पटल आणि मग अश्या ठिकाणी आम्ही चढाई करुन बसलो की आता वर जायला पण काही जागा नाही आणि आलो त्या रस्त्यावर मागे जायला घसरून जायची भीती. ५ मिनिट आम्ही सगळे स्तब्ध उभे राहीलो आणि चारही बाजुला नजर टाकली. खर सांगायच तर मी आता जाम घाबरलो, आता काय करायच. शेवटी अजुन एक पायवाट दिसली, आता तिने जाऊ अस सगळ्यांनी ठरवल. आजुबाजुच्या झाडांना पकडुन, त्यांच्या फांद्याच्या आधार घेऊन, थोडासा ढुंगणाचा पण आधार घेऊन घसरत, धडपडत त्या पायवाटेला लागलो.
थोड पुढे चालल्यावर एकाच्या लक्षात आल अरे आपण ते बसलो होतो तिथे सनग्लासेस राहीले.
मी लगेच, “आता जाऊदे चल”
“अरे जवळच आहे ते, आपण ते मध्ये वर चढलो म्हणुन लाभ वाटतय, चल जाऊन येऊ पटकन”
“तुम्हीच या जाऊन, मी नाही येत आता”
आणि दोघे जण परत गेले. आम्ही दोघे तिथेच बसलो. १० मिनिटात परत आले ते सनग्लासेस घेऊनच. पुढे पुढे ती पायवाट जरा चांगलीच स्पष्ट होत गेली. गावरान जागेचे मोजणीचे खांब दिसले, चला आलो एकदाचे जवळ. आणि मग पटकन झुडुपांमधुन आमची ती पायवाट किल्ल्याच्या मुख्य पायवाटेला लागली, माणसांची वर्दळ जाणवली आणि जीव भांड्यात पडला.
त्यानंतर नो टेन्शन. पटापट गड चढु लागलो. आमच्या हा जो काही पराक्रम केला होता त्यात ऊन खुपच वर आल होत, घामाच्या धारा सुरु झाल्या पण रस्ता फार चढणीचा असा नव्हता. बरेच लहान मुल ही आरामात किल्ला चढु शकतील किंवा कौटुंबिक ट्रेक साठी ही उत्तम पर्याय. फक्त आम्ही जो पर्याय निवडला तो निवडु नका.
वर पोहचल्यावर पहिल्यांदा मुख्य दरवाजांतुन तुम्ही किल्ल्याच्या आत येतां. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार हे तीन दरवाज्यांनी बनवल आहे. पहिल्या प्रवेशद्वारात गणेशपट्टी आणि मिहारब आहे. आत गेल्यावर लगेचच उजवीकडे दुसरा दरवाजा आहे ज्यातुन आत गेल्यावर उजवीकडे एका खडकात कापलेला पाण्याची टाकी आहे. पिण्याच्या हेतूने हे पाणी वर्षभर उपलब्ध असते. दुसऱ्या दरवाजावर सिंह आणि शरभाच्या मूर्ती आहेत. अजुन काही पायऱ्या चढल्यावर तिसरा दरवाजा लागतो. दोन्ही बाजूला हत्तींच्या डोक्याच्या मूर्ती आणि फाटकच्या बाहेरील बाजूस फारसी आणि मराठीत शिलालेख आहेत. तिसऱ्या दरवाज्यातुन आत गेल्यावर डावीकडे थोड चालले की चांगल्या स्थितीत रोहिडामल्लाचे मंदिर आहे.
गडावर सात बुरुज आहेत, आपल्याला सहा दिसतात, पुढे तीन आणि मागे तीन. बुरुजांची भक्कम तटबंदी अजुनही शाबुत आहे. ह्या बुरुजांची नावे म्हणजे शिरावाले बुरुज, पाटणे बुरुज, दामुगडे बुरुज, वाघजाई बुरुज, फत्ते बुरुज आणि सदर बुरुज. काही पुस्तकांमध्ये शिरजा बुरुजच्या उपस्थितीचाही उल्लेख आहे, परंतु त्याचे स्थान अज्ञात आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूस दगडी पाण्याच्या कुंडांची मालिका आहे. गड पुर्ण फिरायला जवळपास एक तास लागतो.
ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला यादव काळात बांधला गेला. तिसऱ्या दरवाजावरील पारसी भाषेतल्या शिलालेखानुसार, विजापूरच्या आदिलशाहने मे १५५६ मध्ये या किल्ल्याची डागडुजी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडाच्या बांदल-देशमुखांच्या हातून हा किल्ला जिंकला. लढाईनंतर, बांदलचे मुख्य प्रशासक बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक अधिकारी स्वराज्य चळवळीत सामील झाले. पुरंदरच्या तहात महाराजांनी मुघलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये रोहिडाचा समावेश होता. २४ जून १६७० रोजी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला गेला. हा किल्ला भारत स्वातंत्र्य होईपर्यंत भोर राज्याच्या पंतसचिवांच्या ताब्यात होता.
किल्ल्यावर फिरुन झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता ह्यावेळी काही तुफानी न करता सरळ मार्गाने परतायच ठरवल. वाटेत चांगले ३-४ ग्लास ताकाचे ग्लास रिजवले आणि एक तासाच्या आतच गड उतरलो.
गावातुन आमच्या टेन्ट कॅंम्पला जाताना एक हातपंप लागला, पाणी छान थंडगार. हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारल, पुर्ण थकवा निघुन मस्त मोकळ वाटल. कॅंम्पला पोहचलो तर जेवण तयारच होत. भुक तर लागलीच होती. लगेच जेवणावर ताव मारला. साधासुधा ट्रेक पण आमच्या अतरंगीपणा मुळे अगदीच साहसी करुन टाकला.
कॅंम्पवर काही शेवटचे ग्रुप फोटो काढले आणि आमची गाडी आमच्या पुढच्या रोड ट्रीपसाठी निघाली.
❤❤❤
ReplyDelete