२
प्रवासाचा दिवस उजाडला. विमानाची वेळ दुपारी एकची. सकाळी आवरुन झाल्यावर बॅग परत एकदा चेक केली. सगळे महत्त्वाचे फोन नंबर्स हाताशी लागतील असे ठेवले. लंडनला उतरल्यावर पहिल्यांदा प्रणालीला फोन करायचा होता ती साऊथऍम्पटन बस स्टॉपला न्ह्यायला येणार होती. तिचा फोन नंबर सर्वात वर ठेवला. हृदयात आता धडधड वाढली होती. वऱ्हाड निघालाय लंडनमधील एक डायलॉग सारखा मनामध्ये सुरु होता. 'काय होईल! कस्स होईल?' निघताना सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन सोसायटीतल्या गणपती मंदिरात डोक टेकवलं. व्यवस्थित ने रे बप्पा!
मुंबईची गर्दी, विमानतळावर जायला जागणारा वेळ ह्याचा अंदाज घेऊन घरातुन सकाळी ९ वाजताच निघालो. रस्त्यामध्ये सुचनांचा पाढा चालु होता.
'रात्रीचा एकटा इकडे तिकडे भटकत बसु नकोस.'
'खाण्यापिण्यावर लक्ष ठेव'
'रोज घरी फोन करत जा'
'बरोबर दिलेले बदाम, काजु खा नाहीतर आणशील तसेच परत'
'फळं खात जा' वगैरे वगैरे
मी सुद्धा निमुटपणे हो हो करत होतो. विमानतळाच्या गेट जवळ गाडी थांबली. गाडीतुन सामान उतरवलं. पप्पा गाडी पार्क करुन येईपर्यंत मी तिथल्या काउंटरवर चौकशी केली. विमानतळाच्या एका टोकाला वेटिंग रुम होती. बॅग्स चेक इन करुन वेटिंग रुम मध्ये थांबुन गप्पा मारत बसता येतील म्हणुन मी आत गेलो आणि मम्मी-पप्पा वेटिंग रुम मध्ये. एका डेस्क वर जाऊन तिकीट दाखवलं, त्यांनी बॅग किती आहेत विचारुन बॅग वजन काट्यावर चढवायला सांगितली. वजन मापात बसलं, त्यांनी बॅगवर लेबल लावुन सरकत्या बेल्ट वर बॅग ढकलली. पासपोर्टला त्यांनी कसली तरी एक पावती लावली आणि बोर्डिंग पास दिला. मी आधीच खिडकीच्या बाजुची जागा मागितली होती. वेटिंग रूम मध्ये गेलो . मम्मी-पप्पा माझी वाट बघतच होते. रूमची दोन भागात विभागणी केली होती. एका बाजुला प्रवासी आणि एका बाजुला प्रवास्यांबरोबर त्यांना सोडायला आलेले व्हिजिटर्स. तिथे जाऊन मम्मी-पप्पांशी बोलत बसलो. पहिला प्रश्न बॅग चेक इन करताना काही त्रास नाही ना झाला. सगळं गेलंना बरोबर. नंतर एक-एक चहा घेतला. चहावाल्याने लगेच हेरलं कि पहिल्यांदा चाललोय. त्याच्याजवळही जास्त गिऱ्हाईक नव्हते. तो आमच्याबरोबर गप्पा मारत बसला. पासपोर्टला लावलेली छोटी पावती बॅगची हे त्याने सांगितलं. जर का लंडनला बॅग नाही भेटली तर ही पावती त्यांना दाखवायची. मग त्याला चहाचे गिऱ्हाईक आले आणि तो निघुन गेला. विमानतळावरच्या टीव्ही स्क्रिन वर लंडनच्या विमानाची स्थिती आता सुरक्षा जांच झाली, शेवटी निघायची वेळ आली. बोलतात ना आपल्या भारतात डोळे ओले केल्याशिवाय निरोप घेऊ शकत नाही तसंच आतापर्यंत मम्मीने थांबुन ठेवलेले अश्रु डोळ्यांतुन वाहु लागले. पप्पांचेही डोळे पाणावलेच. मी कसाबसा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवुन पुढे निघालो. परत परत मागे वळुन हात हलवुन निरोप घेत घेत पुढे गेलो. शेवटी मी त्यांना आणि ते मला गर्दीत दिसेनासे झाले.
इमिग्रेशनच्या रांगेत लागायच्या आधीच इमिग्रेशनचा फॉर्म भरून घेतला. इमिग्रेशन ऑफिसर कुठे चाललायस? काय काम आहे तिकडे वगैरे प्रश्न. मी आपली उत्तरं दिली. शेवटी त्याने पासपोर्ट वर स्टॅम्प मारला आणि मी पुढे सरकलो. सिक्युरिटी चेक मधुन कॅरी बॅग आणि मी दोघेही क्लिअर झालो आणि विमानाच्या गेट वर येऊन बसलो. अजुन बराच वेळ होता. पप्पाना मोबाईलवर फोन करुन सगळं व्यवस्थित झालं आहे सांगितलं. तेही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहचले होते.
थोड्यावेळाने सहजच विमानतळावरची दुकाने फिरत बसलो. उगाचच प्रत्येक गोष्टींची किंमत बघुन 'बापरे किती महाग' हे चेहऱ्यावर भाव आणायचो. जस स्वस्त असत तर मी लगेच घेणारच होतो. ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये वीस रुपयात मिळणारं सॅन्डविच कुठे आणि इथे १८० रुपयाचं कुठे. मी बॅग मधुन आणलेली बिस्कीट खाऊन पोटाला शांत केला. तस पण विमानात तर जेवण भेटणार होतच.
विमानाची वेळ होत आलेली. गेटवर हवाईसुंदरींची चहलपहल सुरु झाली आणि नंतर त्यातल्या एकीने माईक वर बोर्डिंग सुरु केल्याची घोषणा केली. आम्ही सगळे लाईनने आत जाऊ लागलो. बोर्डिंग पास आणि पासपोर्ट वर नजर टाकुन मला आत सोडल. विमानाच्या दारात गेल्यावर परत एकदा एकीने स्वागत करताना बोर्डिंग पास बघुन , मला माझ्या सीट पर्यंत कस जायच सांगितलं. मी आपल्या सीट पर्यंत पोहचलो आणि बसताच क्षणी माज्या लक्षात आलं माझं जॅकेट कुठंय, हातातच तर होतं, कुठे गेलं? आणि मी तसाच परत मागे गेलो. त्यात माझं एक वळण चुकलं आणि भलतीकडेच कुठेतरी गेलो. माझ्या मागे लगेच एक कर्मचारी आली तिचे चेहऱ्यावरचे हावभाव बघुन नक्कीच तिने मला दहशतवादी तर नाही समजलं असणार. तिने काय झालं विचारलं. मी सांगितलं माझा जॅकेट कुठे तरी पडलं, ती दरवाज्यात घेऊन गेली. तिथे आधीच त्यांनी एका बाजुला उचलुन ठेवलेल. मी ते घेऊन परत माझ्या जागेवर जाऊन बसलो. नंतर झालेला प्रकार आठवुन स्वतःच हसत बसलो.
थोड्यावेळाने बोर्डिंग पुर्ण झाल्यावर सुरक्षा सुचना दिल्या गेल्या. सगळ्यांनी सिटबेल्ट्स लावले आहेत की नाही हे तपासुन क्रु मेंबर आपल्या जागेवर बसले. कॅप्टन ने 'वी आर रेडी फॉर टेक ऑफ' ची सुचना देऊन विमान धावपट्टी वर आणलं. अचानक एखाद्याने पुढे जोरात खेचल्यासारखा आभास झाला. विमानाने वेग धरला होता आणि क्षणार्धात ते हवेत झेपावलं. खिडकीतुन बाहेर मुंबई बघु लागलो. पण काही समजायच्या आतच विमान अरबी समुद्रावर आलं. जुहु चौपाटी फक्त ओळखता आली. पाठीमागे मुंबई दुर जाऊ लागली. पाच मिनिटांनी तर खाली सगळं पाणीच पाणी. विमान उंचीवर स्थिर झाल्यावर सीट बेल्ट्सची साइन बंद झाली. मी विमानातून खाली बघण्यात गुंग होतो. पण १०-१५ मिनिटांनी त्याचाही कंटाळा आला. काय फक्त पाणी बघायच. समोरच्या स्क्रीनवर काही बघण्यासारख आहे का ते शोधुन त्यातला एक सिनेमा चालु केला. क्रु मेंबर्सनी सगळ्यांना जेवण द्यायला सुरुवात केली. एका ट्रॉलीमधुन प्रत्येकाला छोट्याश्या जेवणाच्या प्लेट देत ती ट्रॉली पुढे सरकत होती. खाऊन झाल्यावर मी परत सिनेमा बघायला लागलो. मध्ये मध्ये खाली काही नवीन दिसत आहे का तेही बघत होतो. स्क्रिन वर नकाशा हि होता ज्यात विमानाची सध्याची स्थिती, लंडन पासुनचे अंतर दिसत होते. थोड्याच वेळात विमान अरबी समुद्रावरून जमिनीवर येणार होत. ते अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान ते माहित नाही पण उत्सुकतेपोटी मी खाली बघत होती. पाणी संपुन जमीन सुरु झाली. पण सगळं उजाड दिसत होतं. लांब लांब कुठेही ना रस्ता दिसत होता ना कुठलं गाव. तेवढ्यात विमानाच्या लाईट्स बंद केल्या गेल्या. क्रु मेंबर्सने सगळ्यांना खिडक्यांचे फ्लॅप्स बंद करायला सांगितले. विमानात आता बऱ्यापैकी अंधार झाला होता. बरेच जण झोपी गेले. मी स्क्रीन वर मधे नकाशा मधेच सिनेमा करत वेळ मारू लागलो.
नकाशात जवळपास कुठलं शहर दिसलं तर फ्लॅप्स थोडे वर करून खाली दिसतंय का ह्याचा प्रयत्न करायचो. थोड्या वेळाने मी सुद्धा एक डुलकी काढली. ५-६ तास गेल्यावर विमान आता युरोपवर आल्याचं नकाशातून दिसत होत. खाली बघितलं तर सगळे ढग. त्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं. मग पुन्हा स्क्रीन मध्ये डोळे घातले. जर्मनीच्या वर आलो असु तेव्हा विमानाच्या लाईट्स लागल्या. क्रु मेंबर्स परत आपल्या ट्रॉलीज घेऊन पॅसेज मधुन सरकु लागले. टी ऑर कॉफी सगळ्यांना विचारून त्याच्या बरोबर स्नॅक्स द्यायचा काम चालु होत. चहा पिल्यानंतर थोडासा फ्रेश झालो. तेवढ्यात कॅप्टनची अनाऊन्समेंट झाली, १ तासात आपण पोहोचु. फ्लॅप्स वर केले पण ढगांची गर्दी अजुनही होतीच. सिटबेल्ट्सची साइन चालु झाली. विमानाची जमिनीपासुनची उंची हळुहळु घटु लागली. ज्या लोकांच लंडन हे प्रवासाचं शेवटचं ठिकाण आहे त्यांना युके इमिग्रेशन फॉर्म दिले आणि ज्यांना लंडनच्या पुढे प्रवास करायचा आहे त्यांना माईक वरून सुचना देण्यात येत होत्या. मी फॉर्म भरून टाकला. नकाशात दिसत होत कि आता विमान इंग्लिश खाडी वर आहे पण खिडकीतून खाली ढगच होते. इंग्लिश खाडी मागे टाकून युकेच्या जमिनीवर विमान आल. क्रु मेंबर्सनी शेवटची एक फेरी मारून सगळ्यांची सिटबेल्ट्स चेक केले आणि आपापल्या जागेवर गेले. विमानाची जमिनीपासून उंची कमीकमी होऊ लागली. विमान ढगांमध्ये घुसल. आजुबाजुला सगळा धुकं दिसत होत. अजुन विमान खाली आल्यावर पहिल्यांदा युकेची जमीन दिसली. पण विमान इतक्या खाली आलं होत कि लंडनचा नजरा वरून बघता आला नाही. विमानाने अलगद आपले चाक धावपट्टीवर टेकवले आणि वेग एकदम कमी केला. विमान आपल्या गेटवर आलं. चला, विमानप्रवास तर उत्तम झाला.
विमानातुन बाहेर आल्यावर, आता काय? मी सगळे विमानातुन बाहेर पडलेले ज्या दिशेने जात होते त्या दिशेने चालत राहिलो. पुढे इमिग्रेशनच्या काउंटर वर लाईन लावली. पासपोर्ट, इमिग्रेशन फॉर्म आणि सगळी कागदपत्रे हातातच ठेवली. नंबर आल्यावर त्याने माझा पासपोर्ट मागितला आणि माझ्याकडे एक नजर टाकून "व्हाय यु हॅव कम टु युके?" मी उत्तर दिल. त्याने पासपोर्ट वर स्टॅम्प मारला पण मला एका मेडिकल रुम मध्ये जायला सांगितलं. तिकडे गेल्यावर एकीने मला काहीतरी विचारल जे मला काहीच समजलं नाही. हा माझा मुख्य त्रास होता आणि मला ह्याचीच भीती वाटत होती. त्यांचे उच्चार नाही समजलं तर काय. तिने माझा पासपोर्ट घेतला आणि काहीतरी कॅम्पुटरवर नोंद केली आणि मला जायला सांगितलं. आता नक्की माहीत नाही कि तिला जे पाहिजे होतं ते भेटलं की नाही. पुढे मी बॅगेज क्लेमच्या दिशेने गेलो. तिथे बॅग यायची वाट बघत बसलो. मला तर वाटत की स्वतःच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारा हा वेळ असतो. आपल्या समोर सगळ्यांच्या बॅग्स येत असतात. सगळे आपापली बॅग घेऊन जात असतात आणि आपल्या बॅगचा काही पत्ता नसतो. ह्या वेळी सगळे विचार येऊन जातात. आपली बॅग ह्यांनी भारतातच तर नाही ना सोडली. आपल्या बॅगला ह्यांनी काही केलं तर नसेल ना. भलतीकडेच तर पाठवली नाही ना. हा सगळं विचार चालु असताना शेवटी बॅग येते आणि आपण सुटकेचा निःश्वास टाकतो.
बॅग घेऊन बाहेर पडताना गेटवर दोन सुरक्षा रक्षक दोन भले मोठे कुत्रे घेऊन उभे होते. त्यांना बघुनच भीतीने गाळण उडत होती. ते दोन्ही कुत्रे बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या बॅगचा वास घेत होते. मी विचार केला माझ्या बॅग मध्ये तर बरंच काही आहे. लोणचं, बिस्किटे, लाडु... जर ह्यांच्यापैकी कुठल्या वासामुळे हा भुकायला लागला तर. पण त्याने मला जाऊ दिल. आता बस स्टेशनच्या दिशेला कुठला रस्ता जातो हे कुठं सांगितलंय का ह्याचा बोर्ड शोधायला लागलो. ट्रेन स्टेशन, टॅक्सी स्टॅन्ड, पीक अप पॉंईंट असे सगळे बोर्ड दिसले पण बस स्टेशन नाही. बसचे चित्र असलेला पण त्यावर कोच स्टेशन लिहिलेली पाटी दिसली पण मला जे पाहिजे ते आणि कोच स्टेशन एकच की वेगवेगळे? शेवटी तिथे उभा असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं. अनोळखी व्यक्तींना विचारण्यापेक्षा ह्याला विचारणं जरा जास्त भरवस्याच वाटलं. त्याला सांगितलं, मला नॅशनल एक्स्प्रेस बस पकडायची आहे , कस जायच? त्याने व्यवस्थित समजावुन सांगितलं. त्याचे उच्चार समजले ही एक मोठी गोष्ट. शेवटी कोच स्टेशन म्हणजेच बस स्टेशन ह्याचा उलगडा झाला. विमानतळावरून ट्रेन/बस स्टेशन आणि बाकीचे टर्मिनल्स अंडरग्राउंड रस्त्याने जोडले आहेत. जवळ्पास १५ मिनिटे चालल्यावर बस स्टेशनला पोहचलो. तिथे तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट घेतली. तिने मला सुट्टे पैसे दिले. त्यात एक आपल्या जुन्या पाच रुपये सारखा कॉइन होता. आपल्या सारखे स्पष्ट दिसतील असे नंबर त्या वर नव्हते. तिला विचारला "इज धिस ५ पाउंड?" ती बोलली, "नो इट्स १ पाउंड." अरे बापरे! नंतर बारकाईने पाहिल्यावर छोट्याश्या अक्षरात वन पाउंड लिहिलेल दिसल. बसला अजुन दीड तास होता. तिथे एका पब्लिक फोन वरून प्रणालीला फोन करायचा प्रयत्न केला पण मला काही जमलं नाही. शेवटी त्या दुकानदारालाच विचारल, फोन कसा ऑपरेट करायचा. त्याने नंबर लावुन दिला. प्रणालीला सांगितलं, एअरपोर्टला पोहचलोय आणि बसची वेळ सांगितली. तिने मस्त झोपुन यायला सांगितलं. लास्ट स्टॉप आहे. त्यानंतर थोडासा फ्रेश झालो. बॅग मध्ये ठेपले होते त्यातला एक मटकावला. मघाशी मिळालेले सुट्टे पैसे परत बघितले आणि कुठल नाणं कितीचं समजुन घेतलं. बाहेर थंडी जाणवत होती. कबुतरांचा सर्वत्र वावर होता. एकदम बिनधास्तपणे माणसांच्या एकदम जवळ जाऊन खाली पडलेले अन्न टिपत होते. बरेच लोक आपापल्या बसची वाट बघत बसले होते. कोणी पेपर वाचण्यात गुंग तर कोणी पुस्तक. काही लोक डाराडुर झोपले होते. समोरच्या टीव्ही स्क्रिनवर वेळापत्रक आणि कुठल्या फलाटावर बस लागणार आहे ते बघायची सोय होती. त्यामुळे मी निवांत होतो.
स्क्रिन वरून एक एक करून आधीच्या बसेस गायब होत होत्या. माझ्या बसला १० मिनिटे राहिली तेव्हा मी सावरून बसलो कारण आता कधीही बोर्डिंग सुरु होईल. पण ७ वाजले तरीही काहीही हालचाल नाही. मनात शंका आली म्हणुन लगेच काउंटरवर जाऊन विचारलं तर तिथला बोलला ७ तर वजुन गेले, बस गेली असेल. मी बोललो शक्यच नाही मी लक्ष देत होतो आणि तेवढ्यात बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली. तो बोलला मग उशीर झाला असेल बसला. मी लगेच फलाटावर गेलो. तिथे माझी बॅग बस मध्ये ठेवली आणि सीट वर जाऊन बसलो. बस मध्ये बसल्यावर ड्राइव्हरने पण सेफ्टी अनाऊन्समेंट केली आणि सीटबेल्ट लावुन बसायला सांगितलं. इथे बसच्या प्रत्येक सीटला सीटबेल्ट असतो आणि तो लावुन बसावा लागतो. आपल्या कडे तर ड्राइव्हर पण कधी लावत नाही.
एक चांगली गोष्ट म्हणजे ७ वाजले तरी उजेड होता. दोन तासांनी बसने पहिला स्टॉप घेतला. पुढच्या स्टॉपचा नाव त्याने पुकारलं साऊथऍम्पटन युनिव्हर्सिटी. आता आली का पंचायत परत, मी गोंधळलो. हाच तर आपला स्टॉप नाही ना. पण बरीच लोक बसुन होती आणि प्रणाली पण बोलली होती शेवटचा स्टॉप आहे बसचा. पण ड्राइव्हर तर साऊथऍम्पटन बोलला. समोरच्या सीट वर एक मध्यमवयीन जोडपं होत त्यांना विचारला तर त्यांनी माझा गोंधळ दुर केला. हा स्टॉप साऊथऍम्पटन युनिव्हर्सिटी आहे, पुढचा स्टॉप साऊथऍम्पटन. मी शांत झालो. तरीही मनात शंकांच काहुर माजलं होत. प्रणाली आली असेल ना घ्यायला. ती नसेल तर काय करायचं, मोबाईल फोन आहे पण तोही बंद कारण सिम कार्ड भारताचं जे इकडे चालणार नाही. आता १० वाजत आले होते. अंधार पडला होता. रस्त्यावर तर शुकशुकाट दिसत होता. टॅक्सी तरी असतील का जायला. त्यातच बसच्या लाईट्स लागल्या आणि ड्राइव्हर ने साऊथऍम्पटन आल्याचं सांगितलं. बस डेपोमध्ये जात असतानाच प्रणाली बाहेर उभी असलेली दिसली आणि जिवात जीव आला. बाहेर येऊन पहिल्यांदा तिला भेटलो. जवळपास १४ तासांनी कुणातरी ओळखीच्या व्यक्तीला भेटलो होतो. बॅग बसमधुन घेतली आणि प्रणालीने आधीच बुक करून ठेवलेल्या टॅक्सीने घरी आलो. घरी आधीच जेवण करून ठेवलं होत. ओव्हन मध्ये गरम करून मस्तपैकी ताव मारला. ती जर तिथे नसती तर रात्री काय हालत झाली असती ह्याची कल्पना हि करवत नाही.
शेवटी साडेअकरा वाजता बिछान्यावर पडलो. आतापर्यंतचा पुर्ण प्रवास डोळ्यासमोरून सरसर जात होता आणि त्यातच कधी झोप लागली कळलं नाही.
मयुरेश मांजरे
कृपया उजवीकडील फॉलो बटन क्लिक करा.
आपला अभिप्राय नक्की खाली नोंदवा.
आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.
Very nice. Ya veli me govyaat hoto.
ReplyDeletehehehe, Thanks
DeleteAwesome
ReplyDeleteThank you
Deleteमस्तच...flight jet aireways ची होती का 10.50 वाली?
ReplyDeleteVery nice mayuresh..
ReplyDeleteWow !!!i was not knowing, you can write such a fantastic travel memory.... great
Deleteclassic
ReplyDelete