सह्याद्री पर्वताच्या रांगेतील सर्वात उंचावर असलेला किल्ला. १३व्या शतकापासून हा किल्ला दिमाखात उभा आहे. ४६०३ फुट समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेला हा किल्ला नक्कीच आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या किल्ल्यांमध्ये मिरवत असेल की अरे मीच तो ज्याला छत्रपतींनी अवघ्या वयाच्या १६व्या वर्षी जिंकुन १६४३ साली हिंदवी स्वराज्याच तोरण बांधल.
आम्ही ४ मित्रांनी पावसाळ्यात किल्ल्यावर जायचा बेत आखला. ४-५ तासाचा प्रवास म्हणुन सकाळी ५ वाजताच निघायच ठरवलं. पण वेळ ठरवणं आणि पाळणं ह्यात फरक आहे. तरी ६ वाजता आम्ही घर सोडलं. मित्राची नवीन गाडी आणि नेहमीपेक्षा बदल म्हणजे आज मी गाडीच्या मागच्या सीटवर बसुन आराम करत होतो. द्रुतगती मार्गावर लागलो तेव्हा थोडंसं उजाडायला लागलं होतं. पाऊस पण मस्त पडत होता. अहाहा!! मागच्या वर्षी ह्याच पावसाने पाठ फिरवली होती म्हणुन ह्यावेळी तर अजूनच हवाहवासा वाटत होता.
गेल्या १५ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सगळं हिरवंगार झालं होतं. डोंगरांमधून छोटे छोटे ओहोळ वाहु लागले होते. ढगांनी डोंगराच्या माथ्यावर गर्दी केली होती. ह्यातच आम्ही घाट चढायला सुरुवात केली होती. रस्त्यावरुन दिसणारे धबधबे आम्हाला खुणावत होते. जाऊदे तो एवढा प्रवास, इथेच पाण्यात डुंबायचं का हा विचार मनात येत होता पण मनावर ताबा ठेवुन पुढे जात राहिलो. घाट चढून तळेगाव टोल नंतर आम्ही आपला पहिला विसावा घेतला. गाडीत पेट्रोल भरुन आम्हीही भरपेट नाश्ता केला. गाडीचा चालकसुद्धा बदली झाला. पण मी काही मागची आराम करायची सीट सोडली नाही. द्रुतगती मार्ग संपल्यावर बालेवाडी - चांदणी चौक - वारजे - कात्रज - खेड शिवापूर कापत गाडी सुसाट जात होती पण शेवटी एक ठिकाणी ट्रॅफिक जाम लागलंच. नवीन पुलाच काम आणि त्यात पर्यायी रस्त्यावर खड्डे. जवळपास एक तास आमचा त्या जाम मध्ये गेला. नंतर लगेचच नसरापूर फाट्याला मुख्य हाईवे सोडून उजवीकडे वळण घेतलं.
नसरापूर ते व्हेल्हे (तोरणाच्या पायथ्याशी असलेलं गाव) रस्ता एकपदरी पण छान होता. अधेमध्ये खडबडीत रस्ता सोडला तर गुळगुळीत रस्ता होता. पायथ्याशी पोहचायला आम्हाला ११ वाजले. गावातुन एक रस्ता पुढे गडाकडे जात होता पण खुपच चढणीचा रस्ता वाटत होता. आजुबाजूला चौकशी केली तर बोलले की आहे चांगला रस्ता, वरती पठारापर्यंत जाते गाडी. तिथे पार्किंगची सोय आहे. मी मागे लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा अश्या चढणीवर गाडी चढवली होती, त्यामुळे मी गाडी हातात घेतली. समोर दिसणारा चढ लगेचच पार केला पण एक मिनिट! रस्ता इथेच संपला नव्हता, पुढे रस्ता अजूनच निमुळता होता आणि त्यात चढणीचे यु-टर्न. जसजसा पुढे जात होतो माझ्या पोटात भीतीचा गोळा येत होता. असा वाटत होतं, बस!! इथेच गाडी सोडून दयावी. पण एक तर गाडी कुठे बाजूला पार्क करायची सोय नाही आणि परत मागे ही घेता येणार नव्हती. शेवटी कसेबसे आम्ही त्या पार्किंगच्या पठारावर पोहोचलो आणि सुटकेचा निःश्वास टाकला.
थोडाफार पिण्याचं पाणी, खाण्याचे डबे घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात पावसानेही हजेरी लावली. थोडावेळ छत्री घेऊन चालण्याचा प्रयत्न केला पण नंतर म्हणालो जाऊदे आणि बिनधास्तपणे सर्व भिजतच पुढे चालु लागलो. थोडीशी चढाई केल्यावर एक नजर आम्ही आमच्या डावीकडे टाकली आणि प्रवासामुळे आलेला थकवा कुठच्या कुठे पळाला. समोर बरेचसे पांढरेशुभ्र फेसाळणारे पाणी हिरवी चादर ओढलेल्या डोंगराच्या कडेकपारीतुन कोसळत होते. खाली शेतांमध्ये साचलेलं पाणी बघुन मन प्रसन्न होत होत की ह्यावेळी बळीराजा नक्कीच खुश असणार. पावसामुळे आम्हाला फोटो काढायला जमत नव्हते पण काही हरकत नाही.
थोडस पुढे गेल्यावर एक सपाट भाग लागतो. इथे दोन्ही बाजुला दरी आणि मध्ये पायवाट. तिथुन वर पाहिलं तर तोरणा ढगांच्या धुक्यात हरवून गेला होता. चश्म्यावर पाण्याचे थेंब आणि त्यात धुकं ह्यामुळे जास्त पुढच दिसत नव्हत. पावसाने चांगलाच जोर पकडला, त्यातच आम्ही पुढे पुढे जात राहिलो. वाटेत आम्हाला एक कुटुंब भेटलं जे खाली उतरत होतं. त्यात ४-५ वर्षाची एक मुलगा आणि मुलगी होते. त्यांना विचारलं, "कसा वाटलं वरती?". त्यांनीही उत्साहात उत्तर दिलं "झकास". मध्ये एक कातळ लागलं त्यात कसेबसे चढुन आम्ही वर गेलो. थोडा पुढे गेल्यावर डाव्याबाजूला उभा डोंगर आणि उजव्याबाजुला दरी, पावसामुळे रस्ताही निसरडा. दबकत दबकत पावले टाकत पुढे जात होतो. थोडं आणखी रस्ता कापल्यावर कानावर पाण्याचा आवाज येऊ लागला. तो पुढे पुढे वाढतच गेला आणि मग एके ठिकाणी तर आईशपथ! एक मोठा धबधबा डावीकडच्या डोंगरावरून कोसळत होता, त्याच पाणी पायवाटेवरून वाहत उजव्या दरीत जात होता. तिथे मात्र आम्हाला राहवलं नाही. मित्राच्या मोबाईल मध्ये फोटो टिपले. पाण्यात थोडं भिजल्यावर हुरहुरी आली. पुढे १५ मिनिटातच तोरणा किल्ल्याचा पहिला दरवाजा लागला. आत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. आधी पासून आलेले बरेच जण तिथे होते. समोरच्या घरात चहा-पोहे भेटत होते. भुक लागलीच होती. चांगला पोह्यांवर ताव मारला आणि बॅगमध्ये आणलेले जिन्नस फस्त केले. मग गडावर फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला पण धुक्यामध्ये काहीच समजत नव्हत आणि त्यात पाऊस, त्यामुळे फोटो ही काढता येत नव्हते. तरी २-३ बुरुजांवर गेलो. समोर दिसणारी दरी किती खोल ह्याचाही अंदाज येत नव्हता. धुक्यात हरवण्यापेक्षा आम्ही परतण्याचा निर्णय घेतला.
चढताना ज्या गोष्टी अवघड वाटत होत्या तिथे आरामात खाली उतरलो. पुन्हा वाटेतल्या धबधब्यावर मनसोक्त भिजुन घेतलं. थोडस खाली आल्यावर गडावर जाणारे आम्हाला विचारत होते अजून किती वेळ, आम्हीपण मुद्दामून १ तास जास्त सांगत होतो. थोड्यावेळाने वर जाणाऱ्यांना आम्ही उगाचच आजून खाली किती आहे असा विचारत होतो. एक गुजराती ग्रुप आम्हाला भेटला, बहुतेक त्यांचा गोंधळ झाला असेल, त्यांना वाटत असेल गाडी गडावर जाते पण एवढी चढाई करायची आहे हे त्यांना माहीत नसावं. बरेच जण तर मागे फिरले होते. त्यात लहान मुलेही होती जी रडत होती. तरी नशीब ते जास्त वर आले नव्हते. आम्ही परत आपल्या गाडीपाशी पोहचलो. पूर्णपणे भिजलेलो, तिथे परत कांदाभजी खाऊन पोटाला शांत केल. पाऊस थोडा थांबल्यावर गाडीजवळच कपडे बदलले. परत त्या खतरनाक रस्त्यावरुन गाडी खाली उतरवली. गाडी व्हेल्हे गावात आल्यावर जिवात जीव आला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
संध्याकाळ आणि त्यात रविवार, वाटेत पहिल्यांदा नसरापुरच्या बाजारामुळे १५ मिनिटे गेली. नंतर खेड-शिवापुरला नाश्ता केला आणि पुढे निघालो तो पुण्यात गाडी फसली. तिथे जवळपास १ तास गेला. तिथुन निघाल्यावर सरळ आम्ही घरी.
पाऊस, वाटेतला प्रवास, सह्याद्रीचे हिरवेगार पर्वतरांगा, त्यातुन दुधासारखे पडणारे पांढरेशुभ्र पाणी आणि तोरणाची चढाई सगळच एकदम मस्त!!!
No comments:
Post a Comment