Sunday, 6 July 2025

गड, जंगल आणि विहिरीतलं स्वर्गसुख – अवचितगड ट्रेक

सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला अजुन एक रांगडा गड. फार कमी लोकांना परिचित पण पावसाळ्यात ज्याच सौंदर्य अगदी अफलातुन बहरत असा हा किल्ला. हा किल्ला शिलाहार राजांनी बांधला असं मानलं जात आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहच्या ताब्यात गेला. पुढे छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात सामील केला आणि अखेर १८१८ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून जिंकून घेतला. नवी मुंबईपासून सुमारे ९० किमी आणि रोह्यापासुन अगदी जवळ असलेला हा किल्ला अवचितगड.

एप्रिलमध्ये मृगगड करून आमच्या ट्रेकचा दुसऱ्या सिझनमधला नववा टप्पा पूर्ण झाला होता. आता मात्र समोर होता वर्षातला सगळ्यात खडतर महिना – तो म्हणजे मे महिना. ह्या महिन्यात थंड हवेची ठिकाणे जास्त पसंत केली जातात. हंगामी ट्रेकर्स, ज्यांना आपण पावसाळी बेडकं म्हणतो ते चातकाप्रमाणे आकाशाला डोळे लावुन बसलेले असतात की कधी पाऊस पडतोय आणि एकमेकांना रील पाठवण्यात बिझी झालेले असतात की ह्या पावसाळ्यात कुठले गडावर जाऊन डराव डराव करायचे. 

पण माझं ठरलं होतं - दर महिन्याला एक ट्रेक हवाच. मला बरेच जण बोलत असतात अरे फेब्रुवारी नंतर का ट्रेक करतो, काय मजा असते. सगळं कोरड ठणक, रखरखीत. पण मी मागच्या वर्षीही हा नियम चुकवला नाही आणि ह्या ही वर्षी चुकवणार नाही.  वाटलंच तर एखादी दुर्ग भेट द्यायची – म्हणजे ट्रेक जरी नाही झाला तरी किल्ला तरी होईल.

मित्रांसोबत कोकणातही जायचा प्लॅन बनत होता म्हणून आधी गोपाळगड मनात आला. पण काही कारणास्तव तो बेत बारगळला. मग म्हटलं जवळच वसईच्या किल्ल्याला जाऊ. बऱ्याच दिवसांपासुन हा ही किल्ला यादीत होताच. पण अचानक मनामध्ये कुठुन तरी आठवलं अरे आपल्या त्या रोह्याजवळचा अवचितगड आहे ना. मागे मुरुडला जाताना ह्या किल्ल्याची पाटी बघितली होती तेव्हा पासुन मनात घर करुन होता. झटपट माहीती काढली तर अगदी सोपा, छोटा ट्रेक आणि पायथ्याला जंगल. उन्हाळ्यासाठी उत्तम. ठरलं तर मग, ह्या महिन्याचा किल्ला ‘अवचितगड’! इतक्यात वरुण राजा पण मदतीला धावुन आला. सहसा ७ जूनला येणारा पाऊस, यंदा २२ मेलाच दाखल झाला! त्याही आधी मान्सूनपुर्व सरींनी कोकणाला झोडपुन काढल होतंच. तर हवेत गारवा आला होता, थोडीफार हिरवळ सुद्धा पसरली होती, मुख्य म्हणजे मेच्या रणरणीतून सुटका! 

आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर होता – ट्रेकचा दिवस कोणता घ्यायचा? मे महिन्याचा शेवटचा दिवसच म्हणजे ३१ मेच शिल्लक राहीला होता. आधीचे दिवस काही ना काही कारणामुळे शक्य नव्हते. पण तो महिन्यातला पाचवा शनिवार होता, आणि काहीजणांसाठी तो वर्किंग डे असतो!
आता काय करायचं?
“मे महिन्याचा ट्रेक, मे महिन्यातच हवा” – हा माझा सिरीयस नियम!
पण शेवटी मीच स्वतःच्या नियमात अपवाद घेत ट्रेक १ जून, रविवारी ठेवला.
ट्रेक होणं जास्त महत्त्वाचं होतं, आणि माझ्या डायरीत हा ट्रेक तरीही “मे ट्रेक” म्हणूनच नोंदवणार होतो! 

हळूहळू टीम तयार झाली. मी, रिआ, रेयांश, प्रथमेश, ध्रुवी आणि महेश. हे सगळे साखळीतील नियमित चेहरे. ह्यावेळी ओंकारही सामील झाला. त्यात भर – दोन खास पाहुणे. प्रथम – दिल्लीहून आलेला माझा सोशल मीडियावरचा मित्र.

कंपनीच्या ट्रेनिंगसाठी मुंबईत आला होता, मी ट्रेकची कल्पना दिली आणि लगेच तयार!
पॉल – गुवाहाटीहून आलेला, प्रथमचा मित्र.
तोही ट्रेनिंगसाठी आलेला आणि ट्रेकसाठी तयार!
एकूण ९ जणांची टीम तयार!

रविवारी पहाटे लवकरच म्हणजे ५ वाजता निघण्याचा बेत होता. प्रथम आणि पॅाल मुंबईतून येणार होते तर त्यांना मी वारंवार बजावले की वेळेत निघा. तुम्हाला माझ्याकडे यायला एक तास तरी लागेल. त्या हिशेबाने निघा. माझ्या सुचने प्रमाणे ते बरोबर पहाटे ४:३५ वाजता त्यांना सांगितल्या ठिकाणी पोहचलेसुद्धा.

मी मात्र "नेहमीप्रमाणे" थोडा मागेच होतो. आता कोणावर खापर फोडु. हा रिआ, रेयांश. मुलं आहेत तर आवरायला उशीर झाला थोडा. महेश आणि ओंकारला घेऊन ५ः०५ वाजता प्रथम आणि पॅालला भेटलो आणि मग प्रथमेश. तो सुद्धा नेहमीप्रमाणे १० मिनिटे उशीराच आला जिथे त्याला भेटणार होतो. "उशीर कोणामुळे झाला?" हा आमचा ठरलेला वाद! थोडी मिश्कील कुरबूर करत आम्ही पुढे निघालो.

अवचितगडला जाण्यासाठी रोह्याचा रस्ता पकडायचा. पनवेल वरुन नागोठणे पर्यंत गोवा रस्ता जो आता पुर्ण सुसाट सिमेंटचा रस्ता. मध्येमध्ये अजुन काही पुलांची काम चालु आहेत. वडखळ सोडल्यावर एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. नागोठण्यावरुन गोवा रस्ता सोडुन रोह्याचा रस्ता धरला. हा जेमतेम २० किमीचा रस्ता. पण दोन आठवड्यांच्या पावसामुळे हा पुर्ण निसर्गाने नटलेला होता. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी आणि मधुन जाणारा डांबरी रस्ता. मध्येच छोटासा घाट. अगदी मस्त वाटत होत ड्राईव्ह करायला इथुन.

सातच्या दरम्यान अवचितगडाच्या पायथ्याला म्हणजे मेढे गावी पोहचलो. मेढे गावात शिरल्यावर गावकऱ्यांना विचारत विचारत विठ्ठलाच मंदीर गाठलं. तिथेच गावकऱ्यांनी गाड्या पार्क करायला सांगितल्या. विठ्ठलाच्या मंदीराजवळ जाताच गावातली ७-८ कुत्र्यांनी गाडीचा पाठलाग सुरु केला. पण ती सगळी मस्तीच्या मुड मध्ये होती आणि आमच्याकडुन काहीतरी भेटेल ह्या अपेक्षेने मागेपुढे करीत होती हे आम्हाला समजल. थोडीशी आवारआवर करुन तिथुनच ट्रेकला सुरुवात झाली. सगळी कुत्री आमच्या बरोबर. दोन मिनिट चालल्यावर गावची एक प्रशस्त विहीर लागली. विहीर बघुन सगळ्यांच्याच मनांत पटापट उड्या मारण्याचा मोह झाला पण आपण ट्रेक साठी आलोय हे स्वतःला समजावून पुढे निघालो.

विहिरीच्या पुढे गावची हद्द संपते आणि सरळ पायवाट घनदाट जंगलात शिरते. नुकताच पाऊस पडुन गेल्यामुळे सगळीकडे हिरवगार झाल होत. पायवाटेवर वेली पसरायला सुरुवात झाल्या होत्या. हाच पावसाळ्यात धोका असतो. पायवाटेवर वेली पसरून, गवत उगवून रस्ता झाकोळला जातो आणि रस्ता चुकण्याचे शक्यता वाढतात. पण ठिकठिकाणी पाट्या लावल्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता तशी कमीच होती. ह्या जंगलात बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर आहे अस ऐकल होत पण आम्हाला वाटेत दिसले ते म्हणजे फक्त खेकडे. जंगलाची मजा घेत, रमतगमत चालत आम्ही पाऊणतासांनी वीरगळीच्या ठिकाणी पोहचलो. ही जागा छान स्वच्छ करुन ठेवलेली होती. बसायला ही जागा होती. थोडावेळ दम खाऊन गप्पागोष्टी मारुन पुढे निघालो. आता उंचीवरुन आजूबाजूच्या परिसर दिसु लागला होता. रोहा शहर पावसात भिजताना दर्शन होत होत. प्रत्येक वळणावर फोटोसाठी स्पॉट, पण जबाबदारीने फोटो घेतले – निसर्गसौंदर्याचा आदर ठेवत आम्ही पोहचलो किल्ल्याच्या महादरवाजाला.








महादरवाज्यातुन प्रवेश करताच समोर एक तोफ आपल्या स्वागताला दिसते. तिथुन दोन-तीन वाट फुटतात. आम्ही डावी कडेची वाट निवडली आणि पुढे आलो. आश्चर्याची बाब म्हणजे ती कुत्री अजुनही आमच्या बरोबर होती. आमच्यापेक्षा कुत्र्यांचीच संख्या जास्त होती. पावसाची रिपरिप अधुनमधुन चालु होती. आता खरंच वाटत होतं की जोरात पडावा पाऊस आणि पुर्ण चिंब व्हाव. एक चक्कर मारुन आम्ही गडाच्या सर्वोच्च बुरुजावर आलो. एक ध्वज स्तंभ होता तिथे. तिथेही कुत्रे आमच्या बरोबर पण तिथे त्यांचा वानरांबरोबर टाईमपास चालु होता. वानर त्या कुत्र्यांना खेळवत होते. त्यांना हुल देऊन झाडावर उड्या मारत त्यांना डिवचत होते आणि कुत्री त्यांना पकडायचा प्रयत्न करत होते. त्या बुरुजावरुन तिन्ही बाजुचा परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता. तिथुनच आम्हाला एक लाकडी पुल दिसला जो बाजुलाच असलेल्या डोंगरावर जात होता. खाली उतरुन परत आम्ही त्या लाकडी पुलावर गेलो. मनसोक्त फोटो काढल्यावर परतीच्या वाटेत पाण्याच्या टाक्या, पिंगळाई देवीचे मंदीर, महादेवाच मंदीर, एक भला मोठा पाण्याचा तलाव आणि दिंडी दरवाजा बघत बघत पुन्हा महादरवाज्याजवळ आलो. हा पुर्ण फेरा आम्हाला करायला दोन तास लागले.

उतरायला सुरुवात केली. परतीची वाट ओळखीची होती. दमट हवामानामुळे घामाने पुर्ण अंग भिजल होत. आरामात खाली आलो. आणि मग काय, विहीर आमची वाटच बघत होती. आता आम्हाला राहवल नाही. पटापट कपडे काढले आणि दिल झोकुन त्या थंड विहिरीच्या पाण्यात. दिल्लीच्या प्रथमने तर पहिल्यांदाच अश्या विहिरीत पोहण्याचा अनुभव घेतला होता. तो भलताच खुश होता. मी, रेयांश आणि महेश एकामागे एक विहीरीत उड्या टाकत होतो. मस्त १ तास मजा केल्यावर शेवटी आम्ही तिथुन निघालो. रेयांशला तर ती स्वर्गातली विहीर सोडुन जावत नव्हत. बाबा फक्त एकदा, फक्त एकदा बोलुन ३-४ वेळा उड्या मारल्या. बरोबर आलेली कुत्र्यांनी शेवटपर्यंत सोबत केली जणू काही आमची गाईड बनुन आली होती. त्यांचा मोबदला त्यांना वरतीच ब्रेड, बिस्कीट्सच्या रुपात देऊ केला होता. आता ती पण पांगली. 

ट्रेक तसा छोटाच होता पण किल्ला फिरायला थोडा वेळ लागला आणि त्यात आमच्यासारख्या फोटो शौकीन असले म्हणजे झाल. तर एक दिवस मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासुन शांतता पाहीजे असेल तर ह्या किल्ल्याचा नक्की विचार करा. तर चला, मला आता लागायला पाहीजे पुढच्या ट्रेकच्या नियोजनाला.