ह्या वाढदिवसाला काही तरी वेगळ करायचा मी विचार केला. काय कराव, काय कराव सुचत नव्हत. एकतर मी घरी एकटा होतो कारण घरचे गेले होते पंढरपूरला आणि सोमवार येत असल्यामुळे मित्र कामावर. शेवटी एक कल्पना सुचली आणि पक्की केली. महडच्या वरदविनायकाला जायचं आणि ते म्हणजे सायकल वरुन. ५० किमी एका बाजुने.
पहाटे चार वाजताच उठलो. आवरुन साडेचारला सायकल वर टांग मारली. नाही नाही, सायकल वर बसलो, मला टांग मारुन बसता येत नाही. सोसायटीच्या बाहेर निघताना, सोसायटी मंदीरातल्या गणपतीला प्रार्थना केली, सुखरूप परत आण, तुलाच भेटायला येतोय. रनकिपर नावाचा एक ॲप आहे तो चालु केला. १-१ किमी झाला की तो सांगायचा. पुढे जेएनपीटीच्या रस्त्यावर आल्यावर ट्रेलर्सची वर्दळ वाढली. निवांत कडेकडेने सायकल पुढे नेत होतो. त्या ट्रेलर्सच्या आवाजामुळे ॲपचा आवाज यायचा नाही पण अचानक शांततेत जेव्हा आवाज यायचा तेव्हा कळायचं अरे वा ३-४ किमी झाले.
जवळपास सव्वातासाने मी पळस्पे फाट्याजवळ पोहचलो. अजुन उजाडायच होत आणि उत्साह पण होता. २१ किमी झाले होते. न थांबताच प्रवास सुरु ठेवला. शेडुंग फाटा ओलांडल्यावर मात्र एक मनातली भीती खरी झाली. रस्त्याची कडेची बाजु अचानक खाली गेली, डांबरीकरण करुन करुन त्याच्या थरामुळे एक भाग वर. सायकल आवरेपर्यंत तोल जाऊन मी गुडघ्यांवर आपटलो. वेग तसा नियंत्रणात होता त्यामुळे हळूच पडलो पण गुडघ्याला लागल हे जाणवत होत. अंधारात बघता ही आल नाही नक्की किती लागलंय. दोन मिनिट थांबलो, एक घोट पाण्याचा घेतला आणि आता माघार नाही स्वतःला बोलुन पुढे निघालो.
चौकच्या पुढे आल्यावर पुढे आता उजाडायला लागलं होतं. अजुन १२ किमीचा प्रवास बाकी होता. पाच मिनिटाची विश्रांती घेतली कारण सायकलची सीट खुपच त्रास द्यायला लागली होती. बसायलाच जमत नव्हत. पुढचा प्रवास सतत ढुंगणं थोडंसं सीटवर मागे पुढे करुन, कधी कधी उभ राहुनच पेडल मारत मारत चालु ठेवला आणि त्यात आता बरेच चढ उतरणीचे रस्ते. चढाला सायकल लागली की वाटायच का आलोय मी, का करतोय मी. सरळ गाडीने का नाही आलो. उतरण लागल्यावर हायस वाटायच. ६ किमी राहीले तेव्हा परत एक विश्रांती घेतली. आता सुर्य पुढच्या डोंगररांगातुन वर आला होता. आता पुढचा थांबा मंदीरच. ४४ किमी पार केलेत आता ६ किमी काय आहे त्या समोर. महडचा फाटा आला आणि एकदम आनंदाची लहर संचारली. तिथुन पाच मिनीटात सायकल मंदीर. साडेसात वाजता मी पोहचलो. बरोबर तीन तास लागले. सायकल मंदीरासमोरच लावली आणि दर्शनासाठी आत गेलो.
मंदीरात मोजून ३-४ जण. गाभाऱ्यात फक्त पुजारी. वाढदिवसाच्या दिवशी एवढ छान दर्शन. धक्काबुक्की नाही, मोठी रांग नाही, गाभाऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी रेटारेटी नाही. पाच मिनिटे मी गाभाऱ्यात एकटक वरदविनायकाकडे बघत उभा होतो. पुढे बाहेर येऊन बाप्पासमोर परत बसलो. मनसोक्त दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालुन बाहेर आलो. आता जाम भुक लागली होती. तिथे मंदीराबाहेर एक महिलांचा ग्रुप होता. त्यांनी फोटो साठी विनंती केली. त्यांचे फोटो काढुन मी माझ्या महडच्या नेहमीच्या ठरलेल्या हॅाटेलात आलो. मिसळपाव, वडापाव आणि एक कॅाफी. आता गुढघ्याला नक्की किती लागलय ते बघितल. जास्त खोल जखम नव्हती, वरचेवर खरचटल होत आणि थोडंसं रक्त आलं होतं पण ते ही सुकल होत. तिथेच थोडा वेळ बसुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मेसेजेसना धन्यवाद पाठवले. घरच्यांशी बोललो. समाजमाध्यमांवर महडचे आणि जखमी झालेल्या गुढघ्याचे फोटो टाकले आणि साडेआठ वाजता परतीचा प्रवास सुरु केला.
आता खरी कसोटी होती. सुर्य बऱ्यापैकी वर आला होता. ऊन सुद्धा वाढत जाणार होत. मी माझे विश्रांतीचे पाडाव आधीच ठरवले. चौकच्या पुढे पोहचल्यावर एक झाडाखाली उसाची गाडी बघुन तिथे थांबलो. इथे येईपर्यंत एक जाणवल ते म्हणजे परतीच्या रस्त्याला उतरणं जास्त आहे. बराचवेळा बिनापेडल सायकलने खुप अंतर पार केल. पण चढ लागल्यावर उभं राहुन पेडल मारत सायकल वर आणावी लागायची. त्या उसाच्या गाडीवर रस प्यायलो आणि १५ मिनिटे उसंत घेतली. आता पर्यंत माझ्या मित्रांना माझ्या गुडघ्याचा पराक्रम मी टाकलेल्या फोटो मुळे समजला होता. त्यांचे फोन सुरु झाले. कुठे आहेस आता, न्यायला येऊ का, जास्त लागलय का. त्यांना सांगितला काही नाही मी फीट आहे. पुढे शेडुंग फाट्या जवळ एक पाडाव घ्यायचा विचार होता पण छानशी जागा मिळाली नाही म्हणुन सायकल रेमटवत राहीलो. रसायनी फाट्यापासुन तर जी वाहतुक कोंडी सुरु झाली ती पळस्पे फाट्यापर्यंत. तिथे थांबायचा प्रश्नच नव्हता. मला तसा त्या कोंडीचा त्रास झाला नाही. मी बाजु बाजुने सायकल काढत पळस्पे फाटा ओलांडला. आता रस्ता मोकळा होता, तिथे सावलीत एक शहाळेवाला बघुन तिथे थांबलो.
आता शेवटचे २० किमी राहीले होते. उत्साह पुर्ण ओसरून त्याची जागा थकव्याने घेतली होती. कधी एकदा घरी पोहचतोय असं वाटु लागल. बाजुने एखादा टेम्पो, छोटा हत्ती गेला तर मनात एक क्षणिक विचार येऊन जायचा की त्यांना बोलाव, अरे मला घेऊन जा. पण नाही घेतला संकल्प पुर्ण करायचा. एवढा पण थकलेलो नव्हतो. सकाळी जो जेएनपीटीचा रस्ता आरामात पार केला तोच आता सगळ्यात जास्त त्रास देत होता. वरती ऊन, विमानतळाच्या कामामुळे हवेत पसरलेली धुळ आणि त्यात सारखे रस्त्यावर असणारे पुल. पुर्ण दमछाक. जिथे शक्य तिथे पुल न घेता खालूनच गेलो. मनाला मजबुत करत, स्वतःलाच प्रोत्साहन देत साडे अकरा वाजता उळवेला आलो. बस थोडच राहीलय आता. फक्त तीन पुल ओलांडायचे. उळवेच्या पुलाखाली लिंबुसरबत घेतला. आता घराची खुपच ओढ लागली.
शेवटचे ते तीन पुल पुर्ण ताकदीनिशी पार केले आणि पामबीचला आलो. जीव भांड्यात पडला. हे तर आपलं नेहमीचच आता. तरीही सीवुड्स मॅाल समोर परत एकदा ऊसाचा रस घेतला आणि आलो घरी एकदाचा. साडेबारा वाजले होते. काहीतरी वेगळ केल्याचा आता अभिमान वाटत होता. सायकल घेतल्यापासुनचीच ही एक माझी इच्छा होती जी पुर्ण केल्याचा आनंद वाटत होता. बाप्पाचे मनोमन आभार मानले. आंघोळ केली आणि झोपुन गेलो.