Wednesday, 15 April 2020

कानडी मुलगी आणि कन्नड

आम्ही एकदा आमच्या ऑफिस मित्रांनी कुर्गची सहल काढली. म्हणजे आम्ही ७ जण फक्त. बाकीच्या ६ जणांचा बॉस मीच होतो म्हणुन सुट्टी तर मिळणारच होती. 

गुगल मॅपवर पुर्ण भारतभ्रमंती केल्यावर आम्ही सर्वांनी कुर्ग निवडलं. सहल कमी दिवसात आटपत होती आणि मुख्य म्हणजे विमानाने जाऊनही  स्वस्तात पडत होती. ह्याचे पुर्ण श्रेय आमच्या "झपरी प्लॅनर्स" ग्रुपला. 

झपरी प्लॅनर्स हे आमच्या ऑफिस मधले स्वयंघोषित इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या ऑफिस मधले सगळे इव्हेंट्स अगदी उत्तमरीत्या 'कुठलाही वादविवाद न होता' पार पाडणे. पण आता इव्हेंट म्हंटलं तर वाद हा आलाच (कुठलाही असो, ऑफ़िसचाच असं नाही) आणि त्यात माझ्यासारखे काही नग असले की नसलेले वाद ही उकरुन काढायचे आणि मग तो आपणच मिटवल्याचा भास निर्माण करायचा. त्याशिवाय मजा नाही. 

असो पण ही कुर्गची सहल मात्र अगदी उत्तमरित्या आमच्या लाडक्या झपरी प्लॅनर्सने आयोजित केली कुठलाही वाद न होता. म्हणजे आम्ही गेलोच ७ जण होतो तर कसला वाद आणि मी बराच प्रयत्न ही केला पण माझे सगळे पासे त्यांनी उलटे पाडले. उलटा मीच त्यांच्या तावडीत बऱ्याचवेळा सापडलो. त्यातलाच एक प्रसंग.

आम्ही कुर्गला पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी कुठल्याश्या मंडलपट्टी नावाच्या शिखरावर जाणार होतो.शिखरावरुन उतरताना पाऊस सुरु झाला. पाऊस धोधो  व्हायच्या आधी आम्ही गाडी पार्किंग जवळ तर पोहचलो पण तिथे आपली साधी गाडी जात नसल्यामुळे आम्ही पिकअप करुन आलो होतो. 
पिकमध्ये पुढे केबिन ज्यात ५ जण बसु शकतात आणि मागे ओपन.

आता आतमध्ये सगळे बसल्यावर आम्ही ३ जण मागेच बसणार होतो आणि पाऊस एवढा आणि त्यात रस्ता पण खाचखळग्यांचा. बाजुनेच तेव्हा अजुन एक जीप चालली होती आणि त्यात दोनच जण होते तेव्हा आमच्या ड्राइवरला सांगितलं, त्याला तुझ्या भाषेत विचार आणि बघ आम्हाला तिघांना घेतो का तो पुढे चौकापर्यंत. रस्ता तिथपर्यंतच खराब आहे आणि चौकात चहाच्या टपऱ्या आहेत तर तिथे आरामात बसता येईल पाऊस जाई पर्यंत. 
आमच्या ड्राइवरने बाजुच्या जीपवाल्याला थांबवलं आणि मग ते दोघे त्यांच्या मातृभाषेत २-३ मिनिटे बोलले. 
काय बोलले एक चकार आम्हाला कळलं नाही पण शेवटी आम्हाला त्या जीप मध्ये बसायला परवानगी मिळाली. 

१०-१५ मिनिटानंतर आम्ही चौकात पोहचलो. त्याने तर एकदम विमान उडवल्यासारखी जीप तिथे आणली. आम्हाला उतरवला आणि निघुन गेला. आमचा पिकअपवाला आणि त्यातली आमची अर्धी मंडळी बरेच मागे राहिले होते. आता तुम्ही विमनातुन आल्यावर असच होणार. 
तोपर्यंत पाऊसही थांबला होता मग आम्ही तिघे, मुलेच होतो, तिकडे टाइमपास करु लागलो. चौकात ३-४ चहाच्या टपऱ्यांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. आम्ही चौकाच्या मधोमध उभं राहुन मागच्या पिकअपची वाट बघत होतो. 
तेवढ्यात एका टपरीतून एक कानडी सुंदरी बाहेर आली. आमच्या दिशेने रोखुन तिने बोलायला सुरुवात केली. 
अर्थात कानडी भाषेत. 
मी थोडा गोंधळलो. मी माझ्या सहकाऱ्याला विचारलं,  "काय बोलतेय ही?"
"चाय पिनेको बुला रही होगी"
तीच आपलं चालुच होतं
"नही, मुझे लगता है कुछ और बोल रही है"
माझा सहकारी, "और क्या बोलेगी "
"शायद बोल रही होगी की आपकी गाडी आने तक बैठो यहा पे, मेरी पर्सनॅलिटी देखके"
माझा सहकारी, "पुछो आप"
मी मग बळच हसलो, एकतर टिपिकल भारतीय 'साऊथची' मुलगी एवढं आपल्याशी बोलतेय आणि भाषेची अडचण. तिच्याकडे बघुन बोललो "नो कन्नड"
तरीही ती थांबेना. 
मग मी थोडासा धीर करुन अजुन जोरात बोललो "नो कन्नड"
तेव्हा ती, "नो नो" असा बोलुन "तुझ्या मागे" असा हाताचा इशारा केला. 
मी मागे वळुन बघितला तर ती मागच्या चहाच्या टपरीवाल्याबरोबर बोलत होती. 
पोपट बोलतात तो, खुप मोठा पोपट.
मी गप मान खाली घालुन दुसरीकडे वळालो. 
माझे दोन्ही सहकाऱ्यांना तर चांगलीच संधी मिळाली. जे मला चिडवलं त्यांनी. फक्त रस्त्यावर लोळायचे राहिले होते हसताना. 

मी तर मनोमन ठरवलं इथुन पुढे आपल्याला वाटलं की कोणी अनोळख्या भाषेत आपल्याशी बोलतंय तर आधी दाही दिशांना नजर फिरवायची आणि खात्री करुन घ्या, नक्की आपल्याशीच बोलतेय ना. 

त्या दोघांना बोललो, "बस अभी"
तरीही त्यांचं थांबायचं नाव नाही. 
"में बॉस हुं तुम्हारा, चुप अभी"
तरीही काही फायदा नाही झाला. मागुन आमची गाडी आली तर ह्या कार्ट्यांनी पहिल्यांदा "मयुरेश के साथ क्या हुआ पता है" करून अजून मिर्चमसाला टाकुन हा वृतांत ऐकवला 

प्रत्येक वेळी घटनेला हे काहीतरी फोडणी टाकुन अजुन लज्जतदार बनवुन सांगु लागले. 
"मयुरेश को जैसे लगा वो लडकी बात कर रही है, गॉगल निकालके पेहना"
"एकदम स्टाईल मे खडे हुए"


पुढे आम्ही सहलीवरुन परतल्यावर ऑफिस मधले सगळे विचारायला आले की ट्रिप कशी झाली, तर हे टपलेलेच 
"संध्याकाळी चहाला चला आमच्याबरोबर, सांगतो"

सोडणार नाही मी एकेकाला. 

--- मयुरेश मांजरे 


Thursday, 9 April 2020

नवलाई

आधीच जेटलॅग त्यात इथे युकेला मे महिन्यात सूर्य सकाळी ५ वाजताच उजाडला. अरे रात्री १० वाजेपर्यंत उजेड आणि सकाळी ५ वाजल्यापासून परत. झोपायचं कधी इथे उन्हाळ्यात. त्याच्यावर कहर म्हणजे रूम मध्ये पंखा नाही. कट्टर मुंबईचा राहणारा माणूस हा कितीही थंडी (म्हणजे त्याला मुंबईत थंडी पडते असा एक गैरसमज आहे) असली तरी पंखा त्याला फुल स्पीड मध्येच लागतो आणि असा मी कट्टर मुंबईकर बिना पंख्याचा कसा झोपलो असेल माझे मलाच आठवत नाही. एकतर ती भयाण शांतता आणि रस्त्यावरून गाडी गेली कि तिचा सुईंगगगगगग आवाज.
त्यामुळे माझी चुळबुळ ४ वाजल्यापासूनच सुरु होती. शेवटी ६ वाजता उठून आवरायला घेतलं. मी तयार होईपर्यंत प्रणाली पण उठली. मी नको नको म्हणेपर्यंत तिने माझ्यासाठी डबा बनवला. माज्यापेक्षा कदाचित तीच जास्त काळजीत होती. आपला छोटा भाऊ पहिल्यांदा शाळेत जातोय तेव्हा जशी काळजी घेतली जाते तशी ती घेत होती. नंतर रेल्वे स्टेशनला सोडायला पण आली. तिला वाटलं असेल जाईल कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी. 
स्टेशन मध्ये गेल्यावर खरी मजा सुरु झाली. मी तिकिटाच्या रांगेत उभा राहिलो. माझा नंबर आल्यावर मी तिकीट खिडकीच्या पलीकडे बसलेल्या बाईला मला काय हवं आहे ते सांगितलं. बर हे आपल्यासारखं डायरेक्ट सांगायचं नसतं, मी बाहेरून एका माईक मध्ये बोलणार, त्याला ती उत्तर पण तिच्या माईक मधुन देणार आणि आमच्या दोघांच्या मध्ये एक काच. देवाण घेवाणसाठी काचेत एकदम छोटीशी फट.
माईक मधुन मी बहुतेक पहिल्यांदाच बोलत असेल माझ्या उभ्या आयुष्यात. मागे एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात गाणं बोलायचा योग आला होता पण तेव्हा ऐनवेळी शिक्षकांनी माझ्या हातातला माईक हिसकावुन दुसऱ्याच्या हातात दिला. कदाचित माझ्या शिक्षकांनी पुढे काय होणार हे आधीच हेरलं असावं. 
माईक मध्ये माझा आवाज तिला कसा ऐकायला गेला हे मी तरी सांगु शकणार नाही पण तिचा आवाज मला सगळ्या स्पीकर मधुन आवाज येतो तसाच  म्हणजे अस्पष्ट, थोडासा फाटलेला ऐकु आला. त्यात मी सांगितलं ते माझ्या भारतीय अस्सल इंग्रजीत. आपल्याला मुंबईत तेरेको मेरेको हिंदी ऐकायची सवय झाली असताना जर कोणी येऊन अस्खलिखित हिंदीत बोलायला लागलं तर त्याला बोलु
"क्या बोलणेका हे तेरेको, सीधा सीधा बोल" 
तशीच काहीतरी तिची अवस्था झाल्यासारखी मला वाटली. तरी आम्ही थोड्याफार वाटाघाटी करत एकमेकांना काय हवं ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.   
पास काढताना कोणी "हावस" विचारेल का? शेवटी ते हावस नसुन हाऊस आहे हे मला जेव्हा कळलं तेव्हा आमची कोंडी फुटली आणि एकदाच तिकीट घेतलं.
तिकीट घेतल्यावर परत मी दबकतच तिथे एकाला विचारलं "साल्सबरी ट्रेन?" अगदी नेमकं आणि मोजक्या शब्दात. नशीब त्यालाही कळलं आणि त्याने मला प्लॅटफॉर्म नंबर सांगितलं. 
त्या प्लॅटफॉर्मवर पोहचल्यावर पुढची पंचाईत म्हणजे तिथे दोन ट्रेन उभ्या होत्या. हो एका प्लॅटफॉर्मवरच २ ट्रेन. शेवटी हा पेच स्वतःहूनच सोडवायचा मी ठरवलं. प्लॅटफॉर्मवरचे इंडिकेटर बघितले, अजून २-३ इंडिकेटर बघितले आणि समजले कि त्यांनी प्लॅटफॉर्म दोन भागात विभागले आहेत. 
अ आणि ब आणि माझी ट्रेन ब वर होती. 
पण आपल्याला जे समजल ते बरोबर आहे ह्याची खात्री केलेली बरी म्हणुन ट्रेन मध्ये चढायच्या आधी परत विचारून घेतलं 
जवळपास ४० मिनिटाच्या प्रवासानंतर ट्रेन साल्सबरीला पोहचली. स्टेशन बाहेर आल्यावर सरळ टॅक्सी केली. त्याला ऑफिसचा पत्ता टेकवला. प्रवास चालु असताना अस्सल मुंबईकर विचार मनात चालु होते. हा बरोबर सोडेल ना? उगाच फिरवणार तर नाही ना? परत मीटर प्रमाणेच पैसे घेईल कि काहीही सांगेल. वाद घालायची वेळ आलीच तर कशी घालणार. पण मला त्याने २-३ मिनिटात तिथे सोडल आणि मीटर जेवढ दाखवत होता तेवढेच पैसे त्याने माझ्याकडून घेतले. 
ऑफिस मध्ये पोहचल्यावर एका मित्राने माझं स्वागत केलं. 
मी पोहचायच्या आधीच ऑफिस भरलेले होते. सगळॆ आपापल्या कामात मग्न. एकदम चिडीचुप शांतता.
मित्राने मला ऑफिसची ओळख करून दिली. माझ्यासाठीचा टेबल आधीच ठरलेला होता. त्यानंतर ब्रेकआऊट एरिया, चहा कुठे भेटतो (व्हेंडिंग मशीन वाला फुकटचा), वॉशरुम सगळी ओळख करुन दिली.
सगळं झाल्यावर तो आपल्या कामात. मग मी पण आपलं डोकं मला जो टेबल दिला त्याच्यावरच्या कंप्युटर मध्ये घातलं. त्यानंतर थोड्यावेळाने गाठीभेटी, तसे सगळे ओळखीचेच होते. ज्यांच्याशी एवढे दिवस भारतातुन फोन वर बोलत होते ते प्रत्यक्ष भेटत होते. जुजबी बोलणं, कसा झाला प्रवास वगैरे वगैरे आणि त्या नंतर परत शांत.
आयटी क्षेत्रात टेबलवर फायलींचा खच नसतो तर आउटलुक मध्ये ई-मेल्सचा खच असतो. कामांची देवाणघेवाण ई-मेलनेच होत असते. अगदी बाजुला बसलेल्या माणसाला ही माझ्याकडून काय हवं असेल तर तो ई-मेल पाठवेल आणि मी सुद्धा उत्तर ई-मेलनेच देईल. हे फक्त तिकडेच नाही तर संपुर्ण आयटी मध्ये असच आहे.
१२:३० च्या दरम्यान ही शांतता भंग झाली ती एका माणसाच्या ओरडण्याने, मी बघितलं एक वयस्कर इसम काहीसा ओरडत ओरडत पुर्ण मजल्यावर फिरत होता. मजल्यावरची अर्धीएक जण ब्रेकआऊट एरिया दिशेने गेली. मी माझ्या मित्राकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तर त्याने जवळ येऊन सांगितलं सॅन्डविचवाला आहे.
मित्राला विचारलं जेवायला कधी जातोस, मला सांग तर तो "इथे सगळे आपलं आपलं जेवून घेतात."
"तु पण तुला भुक लागेल तेव्हा जेव इथे टेबलवरच"
मी आजुबाजुला बघितलं तर बऱ्याच जणांनी आपलं सँडविच टेबलवरच बसून खायला सुरुवात केली. काही जन काम करत करत तर काही जण बातम्या वाचत, पुस्तके चाळत. पण आपल्यासारख गप्पांचा फड नाही.
मी मात्र ब्रेकआऊट मध्ये जाऊन जेवण उरकल.
त्यानंतर परत आपल्या कामात गुंग झालो. ३ च्या दरम्यान मला त्या चिडीचुप शांततेत बाजुच्याने विचारलं
"ऐनी थिंग टू ड्रिंक?"
हे त्याने ई-मेल मध्ये नाही तर प्रत्यक्ष विचारलं.
आली का आता पंचाईत, भर दुपारी कसलं ड्रिंक.
मी आपला त्याच्याकडे ठोंब्यासारखा बघत राहिलो, त्याने परत विचारलं
"ऐनी थिंग टू ड्रिंक? आय मीन टी कॉफी"
हात्तिच्या चहा होय, चालेल की
पुढे त्याने विचारलं "व्हॉट नंबर?"
एक समजतंय तर दुसरं कोड असतंच पुढे.
शेवटी माझा मित्र मदतीला धावुन आला.
आणि आम्ही तिघे चहाच्या व्हेंडिंग मशीन जवळ आलो. तिथे समजलं कि आपला ड्रिंक चा नंबर टाकायचा आणि त्याप्रमाणे तुमची चहा/कॉफी तयार होऊन बाहेर येते.
पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला पाहिजे ते सेट करा म्हणजे किती साखर, किती दूध, किती स्ट्रॉंग आणि मग त्याचा नंबर दिसतो. तो लक्षात ठेवला कि पुढच्या वेळी तसाच चहा बाहेर.
चला चहाचा प्रश्न पण सुटला कारण स्टेशन वरुन येताना रस्त्यात मला कुठे चहाची टपरी दिसली नव्हती.
आणि आता वाटत होत उगाच चहाची काळजी करत होतो. आपल्याला चहाची देण तर ह्यांचीच आहे म्हणजे हे तर चहा मारत असणारच आणि सोय केलेली तर असेलच.
पुढे लगेचच ४ नंतर ऑफिसमधली गर्दी कमी व्हायला लागली. ४:३० ला तर ऑफिस रिकामंच झालं, माझा मित्र पण माझा निरोप घ्यायला आला आणि बोललं निघ आता. इथे सगळे जण ८ तास पेक्षा जास्त काम करत नाहीत. सकाळी लवकर येणार आणि संध्याकाळी लवकर कल्टी घेणार.
फिटनेस वाले जिम गाठणार, कुटुंब वत्सल आपल्या कुटुंबाला वेळ देतील, पार्टी करणारे एखाद्या पब मध्ये जाऊन बसतील.
मी पण मग निघालो. ऑफिसमधून निघताना त्याच्याकडूनच मी स्टेशनला चालत कस जायचं हे विचारून घेतलं. आता दिवसभारामुळे चांगला हुरुप आला होता. मस्त ऐटीत स्टेशनला जायला निघालो. चालत जाण्याची मजाच वेगळी, सगळं परिसर मस्त जवळुन बघता येतो. रस्त्यात एक छोटा ओढा लागला, त्यात हंस मुक्त विहार करत होते. संध्याकाळची वेळ होती तर काही हौशी तरुण जॉगिंग करत होते. तर ऐन्शीच्या आसपासची वृद्धमंडळी त्याच्या सुसज्ज व्हीलचेयर वरुन फेरफटका मारत होते. रस्ते एकदम मोकळे, कुठे गोंगाट नाही, काही नाही, सगळं शांत शांत.
त्यातच मला आता रस्ता ओलांडायचा होता. समोर मला झेब्रा क्रॉसिंग दिसलं तर विचार केला कशाला आपली भारतीय वृत्ती इथे दाखवा पहिल्याच दिवशी. झेब्रा क्रॉसिंग वरूनच ओलांडू रस्ता. मी एका टोकाला पोहचलो तेव्हा एक गाडी रस्त्यावरून येत होती तर मी थांबलो. त्या गाडीने आपला वेग कमी केला. 
मी आपला मनात "अरे जा कि पटकन, तुझ्यासाठी थांबलोय".
तर ती गाडी चक्क येऊन क्रॉसिंग च्या आधी थांबली. 
मला काही कळेच ना. मी पटकन बघितलं कि सिग्नल तर नाही ना  तर तसं ही काही नाही. 
नंतर धाडकन ट्युब पेटली की हा माझ्यासाठी थांबलाय. तिथे झेब्रा क्रॉसिंगला पादचाऱ्यांना आधी जाऊन देत असतील. मी त्याला धन्यवादचा इशारा करून रस्ता ओलांडला (सकाळ पासून निरीक्षणातुन हे शिकलोकी छोट्या छोट्या गोष्टीला धन्यवाद बोला) त्यानेही माझ्या धन्यवादला मान डोलावली. 
स्टेशनला पोहचलो, आता स्टेशनची पुरेपूर ओळख झाली होती. लगेच ट्रेन पकडली आणि घरी आलो.
पहिला दिवस तरी ह्या विदेशातला मजेत गेला आता ओढ होती ती लंडन फिरायला जायची