जिंदगी तुफानी है, जहां है डकवर्थ
गाडिया, लेझर, हवाई जहाज, ये है डकवर्थ
रहस्य सुल्झाओ, इतिहास बनाओ
डकटेल्स!!!!………….
हे गाणं किती जणांना आठवतय, बहुतांश मुलांचा आवडता कार्टुन, अंकल स्क्रुज. नाही म्हणालात तरी सगळ्यांच्या मनात कधी न कधी इच्छा आलीच असेल कि आपल हि अंकल स्क्रुज सारखी एक भली मोठी पैशांनी भरलेली तिजोरी असावी आणि मस्त आरामात जगावं. त्याच्या बरोबरच दुसरं पात्र ज्याने मनात घर केलं ते म्हणजे 'बलु'. हे दोन्ही कार्टुन्स मला जाम आवडायचे, म्हणजे अजूनही आवडतात. आताही जर परत दाखवायला सुरुवात केली तर लहानमुलांच्या आधी मी बसेन बघायला.
हे कार्टुन्स लहानपणी बघत असतानाच मनोमन ठरवलं होतं कि डिस्नेलँडची वारी एकदा तरी करायचीच आणि माझं हे स्वप्न दोन वेळा पुर्ण झालं.पहिल्यांदा पॅरिस आणि त्यानंतर अमेरिकेतल्या फ्लोरिडाचा डिस्नेलँड. पॅरिसला मी एकटाच गेलो होतो, पण अमिरिकेत माझी अर्धांगिनी माझ्याबरोबर होती.
नोव्हेंबर महिना म्हणजे अमेरिकेत उत्तरेला कडाक्याची थंडी आणि त्यातच माझी सौ अमेरिकेत येणार होती. थंडीत कुठे फिरायच हे ठरवत असताना मनात विचार केला कि डिस्नेची सैर परत करु. ओरलान्डोचा डिस्ने इतर डिस्नेपेक्षा सर्वात मोठा आहे हे मी ऐकुन होतो आणि लहानपणी तर मी सुद्धा अमेरिकेच्या डिस्नेला भेट द्यायचा स्वप्न मनी बाळगलं होत. ठरल तर, एका आठवड्याच्या शेवटी डिस्ने. लगेच इंटरनेटवर तिथे कसा जायचा, कुठे राहयचं ह्याची माहिती गोळा करू लागलो. इंटरनेटवर कितीही माहिती असली तरी ती वाचण्यापेक्षा कोणी प्रत्यक्ष आपल्यास समजावुन सांगितली तर बर पडत म्हणुन सरळ फोन उचलला आणि डिस्नेलँडच्या ग्राहक केंद्रावर फोन केला.
तिकडुन एक मुलगी शक्य तेवढ्या सौम्य भाषेत माझे प्रश्न काय आहेत ह्याची चौकशी एकदम आस्थेने करू लागले. माझा एकच प्रश्न होता कि ओरलान्डोच्या विमानतळावर उतरलो कि पार्क मध्ये कसा यायचा. तिचं उत्तर,
"विमानतळावरून पार्क मध्ये यायला डिस्नेच्या खास बसेस असतात, त्याने तुम्ही येऊ शकता".
मी आभार मानुन फोन ठेवणार त्यात तिनेच पुढची माहिती द्यायला सुरुवात केली.
"जर तुम्ही डिस्नेच्याच रेसोर्ट मध्ये राहणार असाल तर बस सेवा मोफत आहे नाहीतर तिकीट काढावी लागेल. तुमची तिकीट बुक करू का?".
मी पुढे चौकशी केली कि रेसोर्टची एका रात्रीची किंमत किती. तिने मला वेगवेगळ्या रेसोर्टची माहिती दिली. त्या एका पार्क मध्ये बरेचसे रेसोर्टस होते. अगदी ५ स्टार पासून ते मध्यमवर्गाला परवडतील असे. मी मग रेसोर्ट लगोलग बुक करायचं ठरवलं. तिने दिलेल्या विक्ल्पापैकी मी 'ऑल स्टार मुव्ही रेसोर्ट' बुक केलं. तिचा ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे डिस्ने मध्ये ५-६ प्रकारचे पार्क आहेत, थीम पार्क, वॉटर पार्क; मी कुठल्या पार्कला भेट देणार आहे. मी मॅजिकल किंग्डम आणि हॉलिवुड स्टुडिओ पक्कं केलं. तिचा पुढचा प्रश्न, तुमचा विमानाचं बुकिंग झाला आहे का, नसेल तर ती मला चांगले डील शोधायला मदत करू शकते. मी होकार दिला. ती शोधत असताना, मी सुद्धा त्याचबरोबर इंटरनेट वर चेक करत होतो. तिने जे विमान मला सुचवलं ते मला $४० ने महाग पडणार होतं जर मी स्वतः बुक केला तर. मग काय मी तिलाच बुक करायला सांगितला. तर शेवटी एक प्रश्न विचारायला फोन केला आणि पुर्ण प्रवास, राहण आणि पार्क सगळ्यांची तिकीट झाली. एका अर्थाने बरंच झालं म्हणजे मलाही दहा ठिकाणी फोन करायचा त्रास नाही.
त्यानंतर प्रवासाचा दिवस उजाडे पर्यंत डिस्ने मधून दर २-३ दिवसांनी रोज काही न काही पत्र येत असत, आज काय तर पार्कची तिकिटे, नंतर पार्कच्या माहितीची पुस्तके, एका दिवशी सामानाला लावायचे लेबल्स. अस करता करता प्रवासाचा दिवस आला. शुक्रवारी रात्री आम्ही प्रवासाला सुरुवात केली. दोन दिवसासाठी जाणार होतो तर त्यात काय सामान असणार. एकच बॅग मुश्किलीने १२ किलो भरली. १२ किलो साठी कुठे कॅबला पैसे घालवायचे, आरामात बस/ट्रेन जिंदाबाद करून विमानतळावर गेलो. तेवढेच डॉलर्स वाचले. विमानतळावर २ तास आधी पोहचलो होतो आणि जास्त गर्दीही नसल्याने चेकइन, सिक्युरिटी चेक ह्या गोष्टी आरामात पार पडल्या. आतमध्ये गेल्यावर आता वाट पाहण्यातच वेळ घालवायचा होता. आम्ही ज्या टर्मिनल वर होतो ते ही एकदम साधं. विंडो शॉपिंग करत वेळ घालवण्याची ही सोय नाही. २-३ खाण्याची हॉटेल्स आणि थोडीफार छोटी दुकाने. गप्पागोष्टी, टर्मिनलच्या काचेतुन बाहेरची विमाने पाहण्यात वेळ निघून गेला आणि आम्ही विमानात बसलो.
ओरलान्डोला विमानतळावर उतरल्यावर पहिलं स्वागत आमचं तिथल्या भल्यामोठ्या नाताळासाठी सजवलेल्या ट्रीने केला. नाताळ आता जवळ आला आहे ह्याची चाहुल विमानतळाच्या सजावटीवरून समजत होतं. मग एका ट्रेनने आम्ही विमानतळाच्या मुख्य इमारतीत आलो. तिथुन आम्ही सामान घेतलं आणि डिस्नेची बस कुठून भेटते हे शोधायला लागलो. तिथल्याच एका ऑन ड्युटी पोलिसाला विचारल, तो ही एकदम आत्मियतेने सांगु लागला कि कसा जायचा पण माझ्या चेहऱ्यावरचा हावभाव त्याला सांगत होता कि मी गोंधळलो आहे, तो आम्हाला मग सोडायलाच निघाला, वाटेत आम्हाला अजून ४-५ जण मिळाले, ते सुद्धा डिस्नेची बस शोधत होते.
त्याने आम्हाला सोडल्यावर त्याचे आभार मानुन बसची बुकिंग कन्फर्मेशन दाखवुन आम्ही बस मध्ये बसलो. बस फुल झाल्यावर विमानतळावरून निघाली. पार्क मध्ये एन्ट्री घ्यायच्या थोड्या आधी आम्हाला बस चालकाने आमचे कॅमेरे डिस्नेच्या गेट वर केलीली रोषणाई टिपण्यासाठी तयार ठेवायला सांगितले पण गेट वर पोहचल्यावर सगळ्यांचा हिरमोड झाला कारण खुप रात्र झाल्यामुळे रोषणाई बंद केली होती. बसने आम्हाला आमच्या 'ऑल स्टार मुव्ही' रेसोर्टवर सोडलं. ह्या रेसोर्ट मध्ये डिस्ने च्या माईटी डक, दि लव बग आणि वन हंड्रेड वन डालमेशन्सच्या सिनामांची सजावट केली आहे. तिथे आम्ही कन्फर्मेशन दाखवल्यावर त्यांनी लगेचच आमच्या नावाने तयार असलेलं दोन छोटे पेटारे समोर ठेवले. त्यातुन त्यांनी आम्हाला माझ्या नावाचं एक आणि बायकोच्या नावाची एक, मनगटाला बांधायची राखाडी रंगाची पट्टी दिली, त्यावर मधोमध एक मिकीचा आकार कोरलेला होता. त्यांनी सांगितल आता पुढचे दोन दिवस हेच तुमच्या रूमची चावी, बसचं तिकीट आणि पार्कच तिकीट. कुठेही प्रवेश हवा असल्याच तिथे ह्या पट्टीवर असलेला मिकी आणि तिथल्या गेट वर असेलेला मिकी एकमेकांसमोर आणा म्हणजे तुम्हाला तिथे प्रवेश मिळेल. सगळे सोपस्कर झाल्यावर आम्ही आमच्या रूम वर गेलो. रात्र हि खूप झाली होती जवळपास रूम वर पोहचायला आम्हाला २ वाजले असतील. आता २ दिवस फुल तू धमाल हाच विचार करत झोपी गेलो.
मयुरेश