Monday, 27 January 2014

१५ ऑगस्ट आणि अमेरिका

अमेरिकेत १५ ऑगस्ट म्हणजे इंडिया डे, इतिहास इथे कोणाला जास्त माहित नाही, तसा आपल्या देशातही म्हणा सध्याबऱ्याच जणांना १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन की प्रजासत्ताक हे माहित नाही तो भाग वेगळा. तर सांगायची गोष्ट अशी कि सातासमुद्रापार, इकडे आपला 'इंडिया डे' जल्लोषात साजरा केला जातो. इथल्या भारतीय संस्था वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अमेरिकन सरकारच्यामदतीने आयोजित करतात. 
भारताच्या स्वातंत्र्य दिवशी इथे तर काही सुट्टी नसते म्हणुन त्या नंतर येणाऱ्या रविवारी न्युयॉर्क  मधील रस्त्यातुन स्वातंत्र्यदिनाची परेड काढली जाते. न्युयॉर्क मधील इम्पायर स्टेट इमारत जी सध्याची शहरातली १०६ मजली उंच इमारत आहे त्यावर तर १५ तारखेला चक्क तिरंग्याची रोषणाई करतात.

मी १५ तारखेच्या रात्री होबोकेनच्या वॉटरफ्रंटवरुन इम्पायर स्टेट इमारत बघायला गेलो. इथुन रात्रीची न्युयॉर्क सिटी  बघण्यात एक वेगळीच मजा आहे. आपण नदीच्या ह्या किनाऱ्यावर आणि समोर विजेच्या प्रकाशात सजलेली न्युयॉर्क,  उंचच उंच इमारती आणि वेगवेगळ्या रंगातली रोषणाई. आज तर आणखीच मजा होती ती म्हणजे शहराच्या सर्वात उंचावर आपल्या देशाचा तिरंगा. विचार केला होता त्यापेक्षाही अतिशय उत्कृष अशी ती इमारत पुर्ण शहरांच्या इमारती मध्ये उठुन दिसत होती. सर्वात उंचीवर भगवा प्रकाश, त्यानंतर पांढरा पट्टा आणि त्याखालोखाल हिरवा. बरेच भारतीय वॉटरफ्रंटवर इम्पायार इमारत बघायला येत होते.  ह्या इमारती वर प्रत्येक दिवशी त्या त्या दिवशाच्या महत्त्वानुसार रोषणाई करतात.




नंतरच्या रविवारी मी  न्युयॉर्कच्या परेड गेलो. ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा हजारे आणि विद्या बालन उपस्थित राहणार होते. परेडचा रस्ता पूर्ण भारतीयांनी गजबजलेला होता. काही अमेरिकन पण परेड  पाहण्यासाठी आले होते. इथल्या पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या सुनियोजित बंदोबस्तात परेड दिमाखात चालु होती. मी पोहचलो तेव्हा परेडला नुकतीच सुरुवात झाली होती. कुठलातरी मिस अमेरिकन इंडिया असा काहीतरी होता. इथे काही स्पर्धा असेल त्यातल्या विजेत्या मुली असतील. त्या नंतर मी छान अशी जागा शोधुन परेड बघण्यासाठी उभा राहिलो. रथ एकमागून एक येत होते. पण ते बघुन हळुहळू भ्रमनिरास होऊ लागला कारण मुख्य म्हणजे देखावे हे भारताविषयी माहिती देणारे नसुन एका प्रकारे जाहिराती होत्या.स्टेट बँक ऑफ इंडिया, सोनी टीवी, बँक ऑफ बरोडा असे रथ, रथांवर एखाद दुसरा महात्मा गांधी, सुभाषचंद्र भोस ह्यांचे फोटो आणि हे रथ डीजेच्या बॉलीवुड  संगीताच्या तालावर पुढे सरकत होते. पुढे पुढे हद्द म्हणजे एक रथ तेलंगना राज्य निर्मितीच्या बाजुने असणारा आणि त्यानंतर एक रथ अखंड आंध्र टिकवा म्हणून घोषणा देणारा. अरे हा तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करत आहात की विभाजन दिन. त्यात पुढे राजकीय पक्षांचे रथही होते.  कॉंग्रेस, आप पार्टी.








मला सर्वात जास्त आवडलेला रथ म्हणजे भारताच्या संस्कृतीची खरीखुरी ओळख करून देणारा रथ आणि तो म्हणजे 'जय भारत ढोल ताशा पथक' ह्यांचा. ह्यांचा रथ जेव्हा परेड मध्ये सामील झाला तेव्हा संचलनात खरी जान आली. पथकाच्या सुरुवातीला दोन भगवे झेंडे दिमाखात डौलत येत होते. त्यानंतर ताशांचा कडकड आवाज आणि पाठोपाठ ढोल,  पथकामध्ये महिलाही नऊवारी साड्या नेसुन सामील झाल्या होत्या,  त्यांच्या  हातात लेझीम , सगळ्याचं लक्ष सहज वेधुन घेत होता, त्यांनी मुख्य गर्दीच्या ठिकाणी रथ आला तेव्हा जी काही ताल धरली ती तर लाजवाब, एका क्षणाला तर असे वाटले कि गणपतीच्या मिरवणुकीतच उभे आहोत. त्यांनी पुर्ण न्युयॉर्कचा तो रस्ता दणाणून सोडला. लेझीम, फुगडी, ढोल, ताशा सर्वांनाच नवीन होत. सर्वानीच ह्या पथकाची वाहवा केली आणि त्यांनीच खरी म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख अमेरिकेला करून देण्याचा  प्रयत्न केला . रथावर एक चिमुकला शिवाजी महाराजांच्या पेहरावात उभा होता.





ह्यांचा रथ पुढे सरकल्यावर मग पुन्हा तेच यादव महासभा, जय भीम, युप्प टीवी वगैरे.

सगळे रथ संपल्यावर सर्वांची पावले रस्त्याच्या टोकाला असलेल्या स्टेजपाशी वळली. जिथे काही कार्यक्रम होणार होते आणि अण्णा हजारे हि तिथेच येणार होते. मी सुद्धा तिकडे जाण्यास निघालो तर रस्त्यात मला जय भारत ढोल ताशा पथकाचे  कार्यकर्ते  सामानाची आवरावर करताना करताना दिसले. मी त्यांच्याशी जाऊन गप्पा मारू लागलो. त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे कश्या साध्य केल्या, सराव कुठे आणि कशी केली ह्याची माहिती घेतली. त्याच वेळी इतरही काही लोक त्यांच्याशी येऊन माहिती घेऊ लागले. त्यानंतर तर त्यांना स्टेज वर परफोर्मंस देण्यास निमंत्रितही केले. 

मी स्टेज कढे निघालो. तिथे भारतीय खाद्यपदार्थांचे दुकानेही लागलेली होती जिथे भयंकर गर्दी होती आणि नियोजन तर बिलकुल नव्हते. सगळे तिथे तुटून पडले होते. कसाबसा मी त्या गर्दीतून स्वतःसाठी एक बिर्याणी घेतली. नंतर स्टेजवर चालणारे कार्यक्रम बघायला गेलो. तिथे भांगडा ग्रुपचे डान्स परफोर्मंस चालू होते, त्यानंतर गरबा डान्स. ढोल तशा पथकाचा परफोर्मंस हि जबरदस्त झाला त्यांनी अपेक्षेप्रमाणे इथेही अप्रतिम ताल सादर केली.




थोड्यावेळानी विद्या बालन स्टेजवर आली पण अण्णा हजारे काही आले नाहीत, ते विद्या बालन बरोबर स्टेज वर येणार पण कसे, असो. थोडफार इकडच्या तिकडच्या गप्पा आणि आपल्या येणाऱ्या सिनेमाचा प्रमोशन करून झाल्यावर ती पुढच्या वर्षीही परत येईन असे सांगुन निघाली. अश्या कार्यक्रमात हि मंडळी मुख्य म्हणजे आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठीच येतात. ती निघाल्या निघाल्या लोकांनी लगेच एकच गलका केला, विद्या एक परफोर्मंस हवा, मग तिनेही थोडेसे आढेवेढे घेत डर्टी पिक्चरच्या गाण्यावर २-३ ठुमके दिले आणि आली तशी निघून गेली. परत १-२ लोकल परफोर्मंस झाल्यावर शेवटी एकदाचे अण्णा मंचावर आले. त्यांचा सत्कार झाल्यावर त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि त्यांच्या शैलीत भ्रष्टाचारावर भाषण द्यायला सुरुवात केली. लोकांनी हि मनमुरादपणे त्यांना दाद दिली. भाषण संपल्यावर ते तिथून निघाले तसा मीही तिथून निघालो. मी स्टेजच्या पाठीमागच्याबाजूला आलो तर अण्णांची गाडी तिथेच उभी होती. त्यांना कडेकोट बंदोबस्तात गाडीत बसवले. त्या वेळी काही अमेरिकन लोकांनी त्यांचा हा लवाजमा पाहिला आणि मला कुतुहलाने विचारलं कि कोण आहेत. मी हि थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला कि "He is great Indian Leader" तर त्यावर त्यांनी मला विचारला "Is he President of India?" मग मला तर काय सांगाव हेच समजल नाही. मी आपला नाही म्हणालो आणि तिथून काढता पाय घेतला. 




मी तर म्हणेन हा मजा आतापर्यंतचा सर्वात इंजोय केलेला स्वातंत्र्य दिन होता. दिल्लीची नाही तर न्युयॉर्कची  परेड आणि अण्णा हजारे, विद्या बालन.  आणखी काय!!!

Sunday, 19 January 2014

अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन

४ जुलै , अमेरिकेचा  स्वातंत्र्य दिवस. १७७६ साली हा देश ब्रिटीशांच्या शासनातुन मुक्त झाला. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटुनही अजूनही इथे हा दिवस साजरा करण्याचा उत्साह टिकुन आहे. आपल्यासारखाच काही प्रमाणात देशाला उद्देशुन राजकीय भाषणे, सार्वजनिक सुट्टी, परेड इथे केले जातात. पण त्याचबरोबर ह्या दिवशी इथल्या मोठमोठ्या शहरात होणारी आकर्षक आतिषबाजी हे मुख्य आकर्षण. देशाची राजधानी वॉशिंग्टन, तसेच मियामी, न्युयॉर्क ह्या शहरांमध्ये होणारी आतिषबाजी बघायला लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातुन  येतात. त्यातल्यात्यात न्युयॉर्कमध्ये होणारी आतिषबाजी  हि सर्वात मोठी आणि आकर्षक मानण्यात येते.

ह्या ४ जुलैला मी न्युयॉर्कमध्ये असल्याने हि संधी मला आयतीच चालून आली होती.  फटाक्यांचा पुर्ण खर्च देशातील नावाजलेली 'मेसीज' नावाची कंपनी दरवर्षी करते. न्युयॉर्क  आणि जर्सी सिटी च्या मधुन वाहणाऱ्या हडसन नदीचा मोकळा परिसर, हे इथल्या आतिषबाजीचा ठिकाण, जेणेकरून नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरून ह्याची मजा घेऊ शकतो. तरीही गर्दी इतकी असते कि कधी कधी मनासारखी जागा मिळत नाही आणि अग  आतिषबाजी पाहण्याचा आनंद गमावून बसतो, म्हणुन नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर दुपार १२-१पासूनच सगळे गर्दी करू लागतात जरी वेळ हि रात्री ९ ची असते. व्यावसायिक आणि हौशी फोटोग्राफर तर सकाळपासुनच आपले ट्रायपॉड लावुन मोक्याची जागा अडवतात. मला हि ऑफिसमधल्या सर्वांनी सांगितले होते कि जर जाणार असशील तर लवकर जा आणि प्रत्येकाने आपापल्या परीने मला कुठून पाहिल्यास चांगला व्यु दिसेल ह्याच्या सूचना दिल्या. मी दुपारी ४ वाजता जर्सी सिटी बाजूच्या किनाऱ्यावर आलो आणि पाहतो तर हो, काही जण आधीपासूनच जागा अडवून बसले होते. 




नदीच्या वॉटर फ्रंटवर ठराविक अंतरावर पिअरस होतो, म्हणजे छोटे छोटे पाण्यावरचे धक्के. मी एका पिअरच्या टोकापर्यंत गेलो आणि एक बऱ्यापैकी जागा शोधुन उभा राहिलो. प्रत्येकाने छोट्या खुर्च्या, सतरंज्या घरातुन आणल्या होत्या आणि मस्त तिथे बसून गप्पागोष्टीत, बैठी खेळ खेळून वेळ घालवत होते. ऊन हि चांगलं पडलं होत तर सगळे मस्तीच्या मूड मध्ये होते. माझ्या पुढे काही इतर देशांचे फोटोग्राफर दुपारी १२ वाजल्यापासूनच ठाण मांडुन बसलेले. आता मुख्य प्रश्न होता कि ९ वाजेपर्यंत वेळ काढायचा कसा! सुरवातीला असाच आजूबाजूचा परिसर न्याहळत बसलो, वॉटर फ्रंट ला अलिशान इमारती होत्या, त्यात राहणाऱ्यांची तर मजाच होती, सगळे रूम च्या बाल्कनीत जमून दंगामस्ती करण्यात गुंग होते.बाजूच्या वॉटर पीअर वर तर बार होता आणि पुढे गार्डन. तिथे तर लोकांचा जल्लोष चालू होता. असाच थोडा वेळ गेल्यावर मोबाईल वर गेम खेळण्यात थोडा वेळ घालवला.  



पोलिसांचा बंदोबस्त हि चोख होता. ठराविक वेळेनंतर पोलिसांची एक गाडी राउंड मारून जायची. न्युयॉर्क आणि जर्सी राज्याचे पोलिसांचे मोटारबोटीही नदीतुन किनाऱ्यावर चालणाऱ्या  घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. पाण्यात एखादी अनोळखी बोट दिसल्यास लगेच तिकडे जाऊन त्यांना तिथून जाण्यास सांगत होते. आकाशातुनही हेलीकॉप्टर नजर ठेवून होते. 



६ च्या दरम्यान न्युयॉर्कच्या दोन फायरब्रिगेडच्या बोटी समोर आल्या आणि त्यांनी पाण्याच्या तुषारांनी जोरदार किनाऱ्यावर उभे असलेल्यांना सलामी दिली. वेगवेगळ्या रंगाचे फवारे ते आकाशात सोडून मनोरंजन करत होते.  थोड्या वेळानी मेसीजचे ३ फटाके भरलेल्या बोटी सर्वांच्या समोर आल्या.  प्रत्येकाची जागा ठरलेली होती. एक बरोबर आमच्या पिअरच्या समोरच येउन थांबली. 





८ च्या दरम्यान सूर्य मावळतीला लागला.आतापर्यंत गर्दीही बऱ्यापैकी  झाली होती. माझ्यासमोर तर दोन जणांची जागेवरून वादावादी सूर झाली. माज्या समोर बसलेला दुपारी १ वाजल्यापासून आला होता आणि त्यांच्या नंतर जवळ जवळ मी आल्यानंतर १ तासांनी दुसरा येऊन सगळ्यांच्या पुढे जाऊन उभा राहिला. पहिल्यांदा सर्वाना वाटले, तिथे सेट केलेला ट्रायपॉड त्याचा आहे म्हणून कोणी काही बोलेले नाही पण जेव्हा कळले कि तो त्याचा  नाहीये तेव्हा सगळे त्याच्यावर चिडले आणि त्यात आणखी भर म्हणजे तो ज्याने ट्रायपॉड सेट केलेला होता त्याच्याशीच भांडू लागला कि इथून ट्रायपॉड  काढ, मग माझ्यासमोरचा सरळ उठून त्याला तिथुन जायला सांगु लागला पण तो काही ऐकत नव्हता, शेवटी मग त्याला सरळ पकडुन तिथुन हकलवल. थोड्यावेळाने तो पोलिसांना घेऊन आला पण सर्वांनी त्याच्याविरुद्ध बाजु घेऊन पोलिसांना सांगितले आणि मग पोलिसांनीही त्याला तिथून जायला सांगितले. हे सगळ झाल्यावर वातावरणात पुन्हा मस्ती आणण्यासाठी एक बाई खुर्ची वरउभी राहून सगळ्यांना अमेरिकेचा राष्ट्रगीत गाण्यास सांगुन ती गाऊ लागली आणि सगळे तिच्या सुरत सूर मिसळू लागले. 




हे सगळ झाल्यावर मी कॅमेराकडे लक्ष देऊ लागलो आणि अंधारात फटाक्यांचे फोटो काढण्यासाठी वेगवेगळी सेटिंगस ट्राय करून बघत होतो . इतक्यात माझ्या  बाजूला उभी असलेली मुलगी, जी प्रोफेशनल फोटोग्राफर वाटत होती तिच्या लक्षात हे आले आणि ती मला स्वतःहूनच मार्गदर्शन करू लागली. शेवटी तिने सांगितलेली एक कन्फ्युगरेशन सेट केला. माझ्याकडे ट्रायपॉड  नव्हता पण मी पीअरच्या कठड्याची सुरक्षाभिंतीलाच  माझा ट्रायपॉड बनवला आणि त्याच्याच सपोर्ट घेऊन कॅमेरा सेट केला. 

जवळजवळ ९ वाजत आलेच होते, आणि चांगला अंधारही आता झाला होता. पलीकडच्या न्युयॉर्कमधल्या गगनचुंबी इमारती विजेच्या प्रकाशात उठून दिसु लागल्या. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर लाल, निळ्या आणि पांढऱ्या रंगाची रोषणाई केली होती. बरोबर ९ वाजता मेसीजच्या तिन्ही बोटीतून रॉकेट सुर्रकन आकाशात  झेपावले आणि एकाच वेळी पूर्ण आकाश उजळून टाकला. त्या पाठोपाठ मग पुढचे काही मिनिटे तिन्ही बोटीतून पुन्हा एकामागे एक असे लयबद्ध पद्धतीने फटाके वर जाऊन रोषणाई करत होते. मध्येच एक पुर्ण आकाश व्यापून टाकणारा रॉकेट तर मध्येच एखादा आकार निर्माण झाल्याचा भास देणारे ४-५ रॉकेटस. प्रत्येकाचा रंग तर वेगळा होताच, निळा, पिवळा, लाल, हिरवा असे अनेक रंग. प्रत्येकाचं लक्ष आकाशात, माना वर, मध्येच एखाद मन थक्क करणारी रोषणाई झाल्यास त्याला मनापासून लोक दाद देत होते. फोटोग्राफरचे सेट असलेले कॅमेरे पटापट हे सर्व काही टिपत होते. मी सुद्धा हे सर्व कॅमेरात पकडत होतो पण माझे डोळेआकाशात आणि हाताचे बोट क्लिक करण्याचा काम करत होता , माझ मालाच माहित नव्हता कि मी काय फोटो घेत आहेत, आणि मला त्याची पर्वा ही नव्हती कारण मला हे सर्व कॅमेराच्या लेन्स आडून न पाहता उघड्या डोळ्यांनी  पाहायच होत. जवळजवळ १० मिनिटे झाल्यावर त्या तिन्ही बोटींनी उसंत  घेतला आणि सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला , मला वाटल संपल, पण नाही त्या बोटी  पुन्हा धडाडू  लागल्या, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न, कधी पाऊस पडल्याचा आभास, तर कधी शेकडोच्या संखेने लुकलुकणारे तारे. पुन्हा १० मिनिटानंतर एक १०-१२ सेकंदाचा ब्रेक आणि पुन्हा १० मिनिटे रोषणाई. अर्धा तास हे चालू होत. 













आतिषबाजी संपल्यासंपल्या नदीत असणाऱ्या सर्व बोटी, क्रुझेस ने २-३ मिनिटे भोंगे वाजवून दणदणीत सलामी दिली. त्या बरोबरच इम्पायार स्टेट बिल्डींगवर लाईट शो चालू झाला. तो ५-१० मिनिटे चालू होता. मुख्य करून लाल, नीळा आणि सफेद, अमेरिकेच्या झेंड्याचे रंगात लाईट शो सुरु होता. 



शेवटी सगळ संपल्यावर मुख्य परिक्षा म्हणजे आता एवढ्या गर्दीतुन घरी जायच. पोलिस आपापल्या परीने नियोजन पद्धतीने लोकांना रस्ता दाखवत होते, पण रस्त्यावर वाहतूक कोंडी हि झालीच होती. मला हि येताना जिथे फक्त ३० मिनिटे लागली होती तिथे जाताना १ तासापेक्षा जास्त वेळ लागला. पण शेवटी काही म्हणा मज आली. 

Monday, 6 January 2014

Atlantic City, New Jersey

अटलांटिक  सिटी, मजा-मस्ती आणि उत्साहाने भरलेले असे अमेरीकेतील न्युजर्सी राज्यातील शहर. न्युयॉर्क पासून फक्त २-३ तासाच्या अंतरावर असल्यामुळे एका दिवसात हे शहर फिरून होण्याजोगे आहे.
या शहरची विशेष ओळख म्हणजे इथे असणारे कॅसिनो आणि सुंदर असा समुद्रकिनारा, ह्या शहरात जवळपास १२ कॅसिनोज आहेत. आठवडाभर काम करून थकल्यावर एक दिवस इथे येऊन कामाचा ताण घालवण्यासाठी उत्कृष्ट जागा.

न्युयॉर्क  सिटी मधुन इथे यायला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या बस कंपनी, ट्रेन किवा स्वत:ची गाडी असेल तर २-३ तासाची ड्राईव्ह. त्यातल्यात्यात अकाडेमी नावाच्या कंपनीची बस सेवा उत्तम. $४० मध्ये परतीचे तिकीट आणि त्यात अटलांटिक शहरात $३० चे कॅसिनोज मध्ये खेळण्याचे कुपन मिळतात.  म्हंजे  तसा बघायला गेलो तर फक्त $१० मध्ये तिकीट मिळते.

मी आणि माझ्या पत्नीने एका शनिवारी तिथे जायचे  ठरवले. शनिवारी ९ च्या दरम्यानची बस आम्हाला मिळाली. तसा घरातून निघताना १० च्या बसचा विचार केला होता पण १ तास आधीची मिळाली कारण बिलकुल गर्दी नव्हती. मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा बस साठी भली मोठी रांग होती. त्यावेळी तिसऱ्या बस मध्ये नंबर लागला होता आणि आता पहिलीच बस भेटली होती.

बसने न्युयॉर्क  सोडले की आजुबाजूला फक्त गर्द अशी झाडी. पानगळतीचा हंगाम असल्याने रस्त्याचा दुतर्फा निसर्गाने रंगाची उधळण केलेली होती. पानांचा वेगवेगळा रंग आकर्षित करत होता. असा  २-३ प्रवास केल्यावर आमची बस अटलांटिक सिटी मध्ये आली, बसचा शेवटचा थांबा हा कॅसिनोच होता. आमची बस 'ताज महाल' नावाच्या कॅसिनो मध्ये गेली. हो 'ताज महाल', ह्या कॅसिनोचा इंटेरिअर पुर्ण भारतीय मुघल साम्राज्याप्रमाणे केलेले आहे. प्रत्येक कॅसिनो आपली अशी स्वतःची ओळख इथे जपतो. सीझर नावाच्या कॅसिनोचा इंटेरिअर रोमन साम्राज्याला शोभेल असा आहे. बस थांबल्यावर बसचालक लगेच तुम्हाला उतरून देणार नाही तो बसचा दरवाजा बंद करून कॅसिनोच्या माणसाला घेऊन येतो जो बसची तिकीट चेक करून प्रत्येकाला कॅसिनो मध्ये खेळण्याचे कुपन देतो. इथे माझी अंधश्रद्धा मला सांगत होती ह्या कॅसिनोच कुपन घेऊ नकोस कारण मागच्या वेळी ब्याली  नावाच्या कॅसिनो मध्ये मी $३५ जिंकलो होतो आणि मला पुन्हा तिथेच जायची इच्छा  होती. पण त्याने गाडीचं दारच अडवलं असल्यामुळे माझा नाइलाज झाला.

अटलांटिक  सिटी मध्ये मुख्यत्वे ३ गोष्टी फिरण्यासारख्या आहेत, एक म्हणजे कॅसिनो, दुसरा समुद्रकिनारा आणि तिसरा फिरण्यापेक्षा खिशाला कात्री लावणारा मोठ्या कंपनीजची आउटलेट्स . आम्ही प्रथम समुद्रकिनारी जायचा ठरवले. हवामान तसं थंड असल्यामुळे किनारा शांत शांत होता. उन्हाळ्यात मात्र इथे धमाल असते. पार्टीज, समुद्रातले खेळ इत्यादी चालू असतात. त्यावेळी किनार्यावर बर्यापैकी गर्दी असते. उन पडलेलअसेल तर इथल्या लोकांसाठी ती एक पर्वणीच असते. मग काय एकच काम, पाण्यात मनसोक्त डुंबणे आणि मग वाळूवर पडून बीयरचे घोट घेत ऊन शेकत बसायचे . पण सध्या हे सगळ बंद होते. किनाऱ्याला  लागुनच बोर्डवॉक बनवलेला आहे. बोर्डवॉक म्हणजे लाकडाचा पायी चालण्यासाठी बनवलेला मार्ग. बोर्डवॉकला लागुनच बरेच छोटी मोठी दुकाने आणि कॅसिनोज आहेत. बोर्डवॉक वरून एक फेरफटका मारला की जवळ जवळ सगळी अटलांटिक  सिटी फिरलो असा आपण म्हणु शकतो. तिथल्या एका मॉल मध्ये संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे आहे ज्याचा शो दर तासांनी मोफत असतो आणि बाजूला एका सरकारी इमारतीवर रात्रीचा लाइट शो असतो तो सुद्धा मोफत.

इथल्या कॅसिनोज मध्ये लहान मुलांना बंदी आहे तर त्यांच्यासाठी एक छोटासा आपल्या इकडे जत्रेत जसे खेळ असतात तश्या खेळांचा कॅसिनो आहे. जिथे खेळण्यासाठी पैसे टाकायचे असतात पण आपण पैसे न जिंकता वस्तु जिंकतो. तिथेही थोडावेळ आम्ही धमाल केली.

मग त्यानंतर आम्ही ताजमहाल कॅसिनो मध्ये गेलो ज्या कॅसिनोची कुपन मिळाले होते.  हि माझी दुसरी वेळ असल्यामुळे काही त्रास झाला नाही पण जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तर सर्वप्रथम काही समजेच ना की काय चालू आहे. भला मोठा तो कॅसिनो आणि बऱ्याच प्रकारचे खेळ,  काय खेळायच आणि कसा खेळायचं, काहीच कळेना, थोडावेळ असेच इकडे तिकडे फिरत बसलो. आपण हॉलीवूड सिनेमात पाहिलेले जवळपास सर्वच खेळ तिथे होते. म्हणूनच तर अटलांटिक सिटीला अमेरिकेतील पुर्व किनारपट्टीवरील जुगरांची राजधानी म्हणुन हि संबोधतात. पत्त्यांचा टेबल, आकड्यांचा चक्र, अजून बरेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळांचे टेबल होते आणि ह्या खेळामध्ये बेटिंग पण जबरदस्त चालू होती. मी मग तेव्हा आपली एक स्वयंचलित मशीन निवडली होती. जिचा फक्त खटका ओढायचा आणि स्क्रीन वर येणारे कार्ड बघायचे. जर त्यांच्या नियमात ते बसत असतील तर मशीन लगेच आपल्याला आपण जिंकलो म्हणून सांगते आणि आपल्याला जिंकलेले पैसे काढायची संधी देते अन्यथा ते पैसे पुढच्या डावासाठी आपण वापरू शकतो. एका डावावर $ ०:२५ पासून ते आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढे पैसे आपण लावू शकतो आणि जर आपण जिंकलो तर त्या पटीत  आपल्याला पैसे परत मिळतात. शेवटी म्हंटलाच आहे ना 'High Risk High Gain'.

मी पुन्हा एकदा अशीच मशीन निवडली आणि आमच्या सौंना नियम समजावून दिले. पहिल्यांदा ती माज्या बाजूला बसून माझे डाव पाहत बसली. माझा खेळून झाल्यावर तिने तिला मिळालेले कुपन खेळायला सुरु केले आणि बघता बघता तिने $३० चे $८० केले. त्यानंतर आम्ही दुसरे मशीन बघितले आणि असेच थोडाफार वेळ खेळून सगळ्या मशीनची मजा लुटली. पण दुसऱ्या मशीनमध्ये जिंकण्याचे प्रमाण कमी, त्यामुळे पुन्हा अंधश्रद्धा जागृत झाली आणि ज्या मशीन मध्ये जिंकलो तिथेच परत खेळायचं असा हिने ठरवलं. परत त्याच ठिकाणी परत आलो तर ती जागा कोणी एका दुसरीने घेतली होती, म्हणुन आम्ही बाजूच्या जागी बसून वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. ती व्यक्ती उठल्यावर बायकोने लगेच ती जागा पटकावली आणि खेळु लागली पण ह्यावेळी नशीब म्हणावी तशी साथ देत नव्हता. आणि त्यात ती आधीची बाई परत मागे येऊन उभी राहिली आणि विचारतेय 'Any Luck??'. शेवटी हि वैतागुन उठली आणि ती बाई लगेच तिथेच बसली. तिची हि श्रद्धा त्या मशीन बरोबर जोडली असेल. आम्ही पुन्हा दुसऱ्या खेलाजवळ गेलो आणि एका मशीन मध्ये तर मी $१ चा डाव लावला आणि मला त्यातून $१४ परत मिळाले. डाव जिंकला कि मजा येते आणि वाटत जास्त पैसे लावले असते डावावर तर किती फायदा झाला असता आणि असा विचार करून पुढच्या डावावर आपण जास्त पैसे लावतो आणि नेमके हरतो आणि हरल्यावर असे वाटते कि पुढच्या खेपेस तर नक्कीच जिंकु आणि परत हरतो असे ५-६ डाव खेळले कि १ जिंकतो. शेवटी सगळा नशिबाचा खेळ आहे. ज्याने आपली सीमा ओळखली तो वाचतो नाहीतर काहीजण वाहवत जातात आणि सगळा गमावुन बसतात.

त्यानंतर जिंकलेले पैसे खर्च करण्याच्या उद्दिष्टाने आम्ही आउटलेटस मध्ये गेलो. ह्यामध्ये नाइके, अदिदास, राल्फ लॉरेन, अरमानी, गुची, अल्डो, रोलेक्स आणि बरेच असे ब्र्यान्डेड वस्तूंची दुकाने आहेत. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे जास्त फिरता आलं नाही पण थोडीफार खरेदी करुन आम्ही आमची बस पकडण्यासाठी तिथुन निघालो. दिवसभर मजा केल्यावर आता परत जायची वेळ आली होती. खरच चांगला अनुभव होता. मुख्य म्हणजे काहीही गमावलेलं नव्हता आणि थोडेफार कमावुनच परत निघालो होतो.

शेवटी ह्या मजेशीर आठवणी मनात घेऊन परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो